सोलापूर - टंचाईमध्ये टँकर देणे ही नियमित योजना नसून ही पाणीटंचाईवरील शेवटची
आपत्कालीन योजना आहे. यामुळे विकासही होत नाही आणि समस्याही संपत नाही. टँकर तात्पुरती उपाययोजना असून विकासासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या पाहिजेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केले.
शिवछत्रपती रंगभवन सभागृहात पाणीटंचाई, म.ग्रा.रोहयो, जलयुक्त शिवार अभियान, चारा टंचाईबाबत दक्षिण सोलापूर तालुक्यातील सरपंचांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी दिनेश भालेदार, कृषी अधिकारी बसवराज बिराजदार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मुंढे म्हणाले की, टंचाईबाबत भूजल कायद्याचे पालन झाले पाहिजे. जेथे काहीच उपाय नाही तेथे शेवटी टँकर. यावर्षी टंचाईबाबतच्या ते उपाययोजना १०० टक्के यशस्वी केल्यास पुढील वर्षी टंचाई भासणार नाही. पुढील वर्षी टंचाईचा आराखडा करण्याची वेळ येणार नाही. १४ व्या वित्त आयोगातील निधीचा उपयोग पाणीपुरवठा योजनांसाठी करा. ज्या योजना आहेत त्या चालू करा, जेथे दुरुस्ती आहे तेथे दुरुस्ती. विहीर,विंधन विहीर, हातपंपाचे पुनर्भरण करा. टंचाईवर प्रभावीपणे मात करण्यासाठी प्रभावी नियोजन करण्यासाठी शासन, प्रशासन आपल्यासोबत आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी मुंढे यांनी दिली.
पाण्याचा उपसा वाढला, त्यामुळे टंचाई जाणवते. निसर्गाचा नियम मोडल्यामुळे त्याचे परिणाम भोगावे लागतात. सर्वांनी निसर्गाचे नियम पाळले पाहिजेत. कोलमडलेले नियोजन बसवावे लागेल. पाण्याशिवाय शेतीचा विकास होऊ शकत नाही. पावसाच्या प्रमाणातच पिके घेतली पाहिजेत. पावसाचा प्रत्येक थेंब अडवावा लागेल. पाणी अडविणे हाच एकमेव उपाय आहे. तरच जीवनात प्रगती होईल. यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मुंढे यांनी केले.
उपजिल्हाधिकारी दिनेश भालेदार यांनी टंचाईवर मात करण्यासाठी गावातील पाण्याची गरज लक्षात घेऊन नियोजन करावे. पाण्याचा योग्य वापर, पाणी व्यवस्थापन करुन जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे करावीत असे आवाहन केले. यानंतर कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी शेतीचा, पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नासाठी विविध जलसंधारणाच्या उपाययोजना केल्या पाहिजेत. याबाबत गावात १०० टक्के काम करून घेण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
सिंचन क्षेत्र वाढवावे
शासनानेविविध योजनांद्वारे पाणी साठे, प्रकल्पांद्वारे उपाययोजना केल्या आहेत. तरीही टंचाई जाणवते आहे. याबाबत डोळसपणे विचार करावा. उपलब्ध पाण्याचा अधिकाधिक उपयोग करून घेतला पाहिजे. कमी पाण्यावर येणारी बागायती पिके घ्यावीत. ठिबक सिंचनाचा वापर करावा. याद्वारे सिंचनाचे क्षेत्र वाढवावे, त्याद्वारे उत्पन्न वाढून आपल्या कुटुंबाचे जीवनमान उंचवावे. ठिबक सिंचनासाठी जिल्हा अग्रणी बँकेच्या वार्षिक आराखड्यात भरीव तरतूद केली आहे. डिसेंबरअखेर हजार ८९ कोटींचा पतपुरवठा केल्याचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
ग्रामसभेत करा नियोजन...
गावातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सरपंचांचा पुढाकार आवयक आहे. शाश्वत कायमस्वरूपी पाणी मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. २६ जानेवारी रोजीच्या ग्रामसभेत पाणी पुरवठ्याचे नियोजन करून मंजुरी द्यावी त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन श्री. चंदनशिवे यांनी केले.
छायाचित्र: रंगभवन सभागृहात झालेल्या कार्यशाळेत मार्गदर्शन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, समोर उपस्थित सरपंच