आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवस्थान समितीचे चक्री उपोषण सुरू, आंदोलनकर्त्यांची पोलिसांशी हुज्जत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सिद्धेश्वर यात्रेच्या वादातून देवस्थान समितीचे दोन दिवसांचे चक्री उपोषण शनिवारपासून सुरू झाले. होम मैदानालगत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलनकर्ते ठाण मांडून होते. पोलिसांनी रस्ता सोडून बाजूला बसण्याची सूचना केली. त्यावरून आंदोलनकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. सायंकाळी पाचच्या सुमारास उपोषण संपले. उद्या सकाळी पुन्हा सुरुवात होणार आहे.

या वेळी सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, माजी आमदार नरसय्या आडम, शिवशरण पाटील, माजी कुलगुरू डाॅ. इरेश स्वामी, नगरसेवक जगदीश पाटील, मल्लिनाथ जोडभावी, गुंडप्पा कारभारी, तम्मा गंभीरे, नरेंद्र गंभीरे, काशिनाथ दर्गोपाटील, बाळासाहेब भोगडे, अॅड. आर. एस. पाटील, अॅड. अमित आळंगे, बसवराज शास्त्री, राजकुमार हौशेट्टी, सुभाष मुनाळे, अनिल पल्ली, रामकृष्ण नष्टे, आप्पासाहेब कळके, रेवणसिद्ध आवजे, सिद्धप्पा कलशेट्टी आदी उपस्थित होते.

आंदोलनाची वेळ सकाळी दहाची होती. मात्र, लोक अकरापासून येऊ लागले. पावणेअकराच्या सुमारास श्री. काडादी आले. शांततेत उपोषणास सुरुवात झाली. तुकाराम मुंढे हाय हाय, धिक्कार असो - धिक्कार असो, जिल्हाधिकाऱ्याचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आला. सिद्धेश्वर यात्रेच्या नियोजनावरून देवस्थान समिती आणि प्रशासन यांच्यात वाद सुरू आहे. धुळीसाठी मैदानावर मॅट टाकणे आणि संकटकाळासाठी रस्ता मोकळा सोडणे यासह २८ सूचना केल्या होत्या. त्यास समितीने विरोध केला. त्यामुळे वाद वाढला. त्यातच समितीने निषेध म्हणून यंदा यात्रा भरवणार नसल्याचे जाहीर केले. मात्र, याचे जिल्हाधिकारी पोलिस आयुक्त यांनी स्वागत करत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. त्यावरून समितीने पुन्हा आंदोलन सुरू केले आहे.

बाई शब्दावरुन सुरु झाला गोंधळ
सहाय्यक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा घारगे यांनी ‘वाहने ये-जा करण्यास जागा सोडा आंदोलन करा’ असे सांगितले. पण माजी आमदार शिवशरण पाटील यांनी, ’तुम्ही कोण आम्हाला सांगणार, यात्राकाळात हे मैदान आमचे आहे आणि या बाई काय सांगतात’, असे म्हणत हुज्जत घातली. घारगे यांनी स्त्रियांशी बोलायचे कसे कळत नाही का? अशी विचारणा करत पोलिस अधिकारी असल्याचे बजावले. त्यावर पाटील यांनी ‘मी माजी आमदार आहे, तुम्ही नीट बोला’, असे सांगितले. त्यावरून वाद वाढला. घारगे यांनी अतिरिक्त कुमक मागवून घेतली.

आंदोलन कर्त्यांसाठी चहा, उसाचा रस
आंदोलन कर्त्यांना पाणी, चहाची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास उसाचा रस आला. त्याची छायाचित्रे काढल्याचे लक्षात आल्याने नगरसेवक जगदीश पाटील यांनी ‘आताच रस देत आजचा समारोप झाला आहे, उद्या १० वाजता यायचे लक्षात ठेव’ असे उपस्थितांना सांगितले.

काही क्षणचित्रे
आंदोलनास कुठे बसायचे? यावरही दुमत होते. दुपारी पाऊणच्या सुमारास मांडवाचे साहित्य आले. कॅमेरे दिसताच यांच्या घोषणांचा अावाज येत होता. सव्वा तीनच्या सुमारास आमदार प्रणिती शिंदे यांनी भेट दिली. अस्वस्थ वाटत असल्याने चारच्या सुमारास धर्मराज काडादी परत गेले. पावणेपाचच्या सुमारास उसाचा रस पिऊन आंदोलन संपले.

... आणि पळापळ झाली
पोलिस उपायुक्त बालासिंग रजपूत यांनी रस्ता मोकळा सोडण्याची विनंती केली. आंदोलनकर्ते दाद देत नसल्याचे पाहून त्यांनी जवानांना येण्याचा इशारा केला. ते पाहून निम्मे समर्थक बघे पळापळी करू लागले. काहींनी गाडीला कीक मारत धूम ठोकली.
बातम्या आणखी आहेत...