आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिर संस्थानतर्फे मेडिकल कॉलेज सुरू करा, पुजारी मंडळाची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- महाराष्ट्राचीकुलस्वामिनी आई तुळजाभवानीमातेच्या भाविकांसाठी मंदिर संस्थानच्या वतीने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाने उच्च तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे मंदिर संस्थान आता या मागणीबाबत विचार करणार, याकडे लक्ष लागले आहे.

पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे, सचिव प्रा.धनंजय लोंढे यांनी यासंदर्भात दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, देवस्थानाच्या मदतीने राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीमातेच्या दर्शनासाठी तुळजापुरात संपूर्ण राज्यातून भाविक येतात. खासगी वाहनांतून, बसमधून येणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात झाल्यास उपचारासाठी सोलापूरला जावे लागते. तुळजापूर येथे अद्ययावत मल्टिस्पेशालिटी आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे तुळजापुरात वैद्यकीय महाविद्यालय सुरू केल्यास भाविकांना लाभ होईल. तसेच तुळजापूर तालुक्यातील रुग्णांना तातडीची आरोग्य सेवा उपलब्ध होईल. शिवाय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळेल. मागणीचा शासन स्तरावरून तातडीने विचार व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

देवस्थानकडे जमीन, पैसा उपलब्ध
उस्मानाबादजिल्ह्यात एकही सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल नाही. उस्मानाबाद जिल्ह्याचे ठिकाण असूनही अद्याप ही गरज पूर्ण होऊ शकलेली नाही. मात्र, शासनाने संबंधित जिल्ह्यात देवस्थानाच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्याची अत्यंत महत्त्वाची गरज तुळजापूरचे देवस्थान पूर्ण करू शकते, अशी सगळ्यांना खात्री वाटते. या देवस्थानाकडे महाविद्यालयासाठी जमीन, पैसा उपलब्ध असल्याने अधिक सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे शासनाने विशेषत: तावडे यांनी या प्रकरणी लक्ष घालून रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

मंदिराच्या पैशाचा योग्य विनियोग
तीर्थक्षेत्रतुळजापूरला भाविकांची गर्दी वर्षानुवर्षे वाढतच आहे. त्यामुळे मंदिराच्या उत्पन्नातही मोठी वाढ होऊ लागली आहे. मंदिर संस्थानच्या वतीने अभियांत्रिकी महाविद्यालय, सैनिकी शाळा आणि तंत्रनिकेतन चालिवले जाते. यापैकी अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थिती खराब आहे. मंदिर संस्थानने सध्याची गरज ओळखून वैद्यकीय महाविद्यालयासाठी पैशांची गुंतवणूक केल्यास त्याचा गरजू भाविकांसाठी, अपघातग्रस्तांसाठी पुरेपूर वापर होऊ शकतो.