आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही ठिकाणी सौम्य लाठीमार, सुमारे 200 वाहने जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मंगळवारी शहरात शांततेने मतदान झाले. शहरातील काही मतदान केंद्रांवर किरकोळ बाचाबाची, जमाव जमवून गोंधळाचे प्रकार घडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनुचित प्रकार घडला नाही. प्रभाग आठमधील अपघाती वृद्धाचा मृत्यूने मात्र गालबोट लागले. 
 
डॉ. आंबेडकर हायस्कूल येथे सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास काही तरुणांनी फटाके फोडले. प्रशालेसमोर थांबलेल्या जमावाला पोलिसांच्या काठ्यांचा प्रसाद मिळाला. बूथसमोर उभी वाहने पोलिसांनी जप्त केली. 
 
साखळी पद्धतीने प्रत्येक घटनेवर पोलिस यंत्रणेचे लक्ष होते. अोव्हरसिट प्रवासी वाहतूक, ट्रीपल सिट दुचाकीस्वारांना केलेला अटकाव, निवडणूकपूर्वी नागरिक, उमदेवार, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्याशी केलेला संवाद सर्व काही मंगळवारी मतदानाच्या दिवशी कामी आले. सातही पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस अायुक्त रवींद्र सेनगावकर यांचा नियोजनपूर्वक बंदोबस्त होता. अफवांची पोलिस खात्री करून घेत होते. 

प्रभाग २५ मध्ये शेजवाल यांना ताब्यात घेतले 
प्रभाग २५ मध्ये भाजपचे उमेदवार सुभाष शेजवाल यांनी बूथवर अरेरावी केल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सायंकाळी सोडून दिले. हा गोंधळ सुरू असतानाच मनोज शेजवाल घटनास्थळी अाले. तेच शेजवाल अाहेत म्हणून त्यांना ताब्यात घेतले होते. पण, नावात गोंधळ झाल्याचे समजताच मनोज शेजवाल यांना सोडून देण्यात अाले. दरम्यान, कलम १०७ प्रमाणे नोटीस देऊन सुभाष शेजवाल यांना सोडून दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक नरसिंग अंकुशकर यांनी दिली. 

१५६ दुचाकी, ४० वाहने जप्त 
मतदारांची अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करताना ४० चारचाकी वाहने, १९ रिक्षा व १५६ दुचाकी जप्त करण्यात अाल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलिस अायुक्त प्रशांत अमृतकर यांनी दिली. विजापूर नाका पोलिसांनी पाच रिक्षा ताब्यात घेतल्या. पत्रकार भवन ते अशोकनगर या मार्गावर दुचाकी घेऊन जोरात अावाज करत जाणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवून सहा गाड्या ताब्यात घेतल्या. सहा दुचाकी जप्त केल्याचे श्री. अंकुशकर यांनी सांगितले. 

पोलिसांना अाले २१ फोन काॅल्स
अमूक ठिकाणी गोंधळ सुरू अाहे, पैसे वाटप सुरू अाहे, अशी माहिती देणारे २१ फोन काॅल्स पोलिस नियंत्रण कक्षात अाले. त्याची खातरजमा केली असता सर्व अफवाच निघाल्या. दरम्यान, फौजदार चावडी सात, जेल रोड १२, ४ सदर बझार व एमअायडीसी ६ असे तीसहून अधिक लोकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले. 

विजयी मिरवणूक काढता येणार नाही
गुरुवारी मतमोजणी झाल्यानंतर विजयी मिरवणूक काढण्यासाठी अाम्ही परवानगी देणार नाही. नियम तोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही. पाचपेक्षा अधिक लोक रामवाडी गोदामाजवळ अाल्यास त्यांना जमावबंदीचा अादेश मोडला म्हणून ताब्यात घेणार अाहे. शांततेत मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांनी चांगले काम केले. नागरिकांची चांगली साथ मिळाली.'' - रवींद्र सेनगावकर, पोलिस अायुक्त 
बातम्या आणखी आहेत...