सोलापूर - नाटकाची कला ही विद्यार्थीदशेतच आत्मसात केली तर ती विद्यार्थांना सक्षम बनविते, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री फय्याज यांनी व्यक्त केले. कै. बाळासाहेब ठाकरेनगरीत( हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगण) पहिल्या अखिल भारतीय बाल नाट्यसंमेलनाच्या मुख्य सोहळ्याचे प्रचंड उत्साहात उदघाटन झाले. या वेळी त्या बोलत होत्या.
डॉ. ए पी जे अब्दुल कलाम रंगमंचावर संमेलनाच्या अध्यक्षा कांचन सोनटक्के, महपौर सुशीला आबुटे, अभिनेते मोहन जोशी, प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, भाऊसाहेब भोईर, संमेलनाचे कार्यवाह अजय दासरी, प्रकाश यलगुलवार, दिलीप कोरके, लता नार्वेकर तसेच विशेष बाल अतिथी म्हणून दृष्टिहीन विद्यार्थिनी नितिना वड उपस्थित होते. नटराजाची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच भिरभिरे देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
फय्याज म्हणाल्या, व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी नाट्य कला महत्त्वाची भूमिका बजावते. ही चळवळ पुढे नेण्याचे काम आता सुरू झाले आहे. त्याचे काम आता थांबता कामा नये. हरिभाई देवकरण शाळेत माझ्यावर नाटकाचे संस्कार झाले.त्यातून मी घडत गेले. त्याच माझ्या शाळेत पहिला बालनाट्य संमेलनाचा सोहळा होत आहे. याचा मला खूप अभिमान आहे. या वेळी फय्याज यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
बालनाट्याची चळवळ पुढे नेणार असल्याचा निर्धार मोहन जोशी यांनी व्यक्त केला. तसेच संमेलनाध्यक्षा कांचन सोनटक्के यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विजय साळुंके यांनी अडचणी आल्या तरी सोलापूरकरांच्या सहकार्याने संमेलन यशस्वी झाले असे सांगितले.
दरवर्षी होणार बालनाट्य संमेलन
बालनाट्य संमेलनाची चळवळ सुरू झाली असून दरवर्षी संमेलन घेण्यात येणार असल्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. याची जाहीर घोषणा ९५ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा फय्याज यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी जोशी, उत्तरा मोने यांनी केले. आभार अमोल धाबळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या शेवटी रघुनाथ गड्डम यांच्या शिष्यांनी नटराज वंदन भरत नाट्यममधून सादर केले.