आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेने कचरा सफाईच्या गाड्या घेतल्या आणि खासगीकरणही केले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कचरा सफाईसाठी महापालिकेने एकीकडे गाड्यांची खरेदी केली. दुसरीकडे खासगीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली. कचरा सफाईसाठी यंत्रणा आणि पैसे महापालिकेनेच दिले तर मक्तेदाराने केवळ मनुष्यबळ उपलब्ध करायचे अशी स्थिती दिसत आहे. कचरा निर्मूलनाचे खासगीकरणाचे प्रयत्न वारंवार अपयशी होत असल्याचा अनुभव दांडगा असतानाही पुन्हा खासगीकरण करण्यात आले आहे.
 
महापालिकेने १४ व्या वित्त आयोगातून कोट्यवधी रुपयांची वाहने खरेदी केली आहे. कचरा निर्मूलनासाठी मक्ता निश्चित करत प्रतिटन १६७० प्रमाणे यशश्री एंटरप्रायझेस कंपनीसोबत करार केला आहे. २ मार्चला तो झाला. त्यानुसार १५ मार्चपासून झोन क्रमांक पाच ते आठमध्ये  डोअर-टू-डोअर कचरा उचलण्यात येणार आहे. झोन क्रमांक एक ते चारमधील मक्ता निश्चित करणार आहे. त्यासाठी  ग्लोबल कंपनीबरोबर महापालिका करार करणार आहे.
 
मागील तीन वर्षांपासून शहरात कचऱ्याचा प्रश्न आहे. महापालिकेची स्वत:ची यंत्रणा असूनही खासगीकरण करण्यात येत आहे. तरीही कचरा समस्या सुटत नाही. त्यावर ठोस तोडगा निघाला नाही. समीक्षा कंपनीस दहा वर्षासाठी मक्ता देण्यात आला होता. त्यांचे काम समाधानकारक नसल्याने मनपाचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मक्ता रद्द केला. त्यानंतर महापालिकेच्या वतीने काम सुरू करण्यात आले. नव्या निविदेत ग्लोबल आणि यशश्री एंटरप्रायझेेस कंपनीस मक्ता मिळाला. यास त्यावेळी भाजपने विरोध केला होता. तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आणि नंतर उठवली.

नागरिकांना काय फायदा
- घरातील कचरा दुपारी १२.३० च्या आत उचलला जाणार
- शहरात कचरा दिसणार नाही
- भाजीमंडई, व्यापाऱ्यांचा कचरा मक्तेदार उचलणार
- कचरा उचलण्यासाठी अॅप तयार होणार 
- या भागात १५ मार्चपासून होईल सेवा सुरू
- झोन क्रमांक पाच ते आठमध्ये प्रामुख्याने जुळे सोलापूर, होटगी रस्ता परिसर, सलगरवस्ती, विजापूर रस्ता परिसर, मोदी, लष्कर, नीलमनगर, कुमठा नाका, नई जिंदगी, आकाशवाणी केंद्र आदी परिसरात सेवा सुरू होणार आहे. 

कचरा न उचलल्यास दंड
कचरा वेळेवर न उचलल्यास प्रत्येक ठिकाणास ३०० रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेने सन २०१२ मध्ये आराखडा तयार केला असून, ते त्या कंपनीस देण्यात येणार आहे. त्यात त्यांना सुधारणे करणे आवश्यक वाटल्यास त्याचे मायक्रोप्लॅन महिन्याच्या आत करून सादर करण्यास सांगण्यात येणार आहे.

गाड्या भाड्याने देणार
महापालिकेकडे कचरा उचलण्यासाठी वाहने असून, ती वाहने कंपनीस भाड्याने देण्यात येणार आहेत. त्याचे दर मनपा परिवहन विभागाच्या वतीने ठरवण्यात येणार आहेत. मनपाकडे १४ आरसी, ६५ घंटागाड्या आहेत.

डोअर-टू-डोअर कचरा संकलन पहाटे साडेसहा ते दुपारी साडेबारा यावेळेत होणार आहे. कचरा संकलन केलेल्या घरापैकी दहा टक्के घरातील नागरिकांची सही घेणे बंधनकारक आहे. कचरा उचलण्यासाठी प्रतिटन १२७० रुपये दर आहे.

मक्तेदार यशश्री एंटरप्रायझेससोबत करारावर सह्या झाल्या
महापालिका झोन क्रमांक ५ ते ८ मधील कचरा सफाईचा मक्ता यशश्री एंटरप्रायझेस यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांच्याबरोबर करार केला आहे. प्रत्येकांच्या दारात जाऊन कचरा उचलला जाणार. झोन क्रमांक १ ते ४ मधील कचरा सफाईचा मक्ता ग्लोबल कंपनीस देण्यात येणार आहे. त्यांच्याशी करार झालेला नाही. तो लवकरच होईल.”
अभिजित हरळे, मनपा सहायक आयुक्त
 
बातम्या आणखी आहेत...