आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना सत्तेमधून जर बाहेर पडली तर शरद पवारांचा भाजपला पाठिंबा -आठवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज- शिवसेना आणि भाजपमध्ये वाद आहे. मात्र सेना सत्तेतून बाहेर पडणार नाही. तसे झालेच तर शरद पवार भाजपला पाठिंबा देण्यास तयार आहेत, असे राजकीय विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. अकलूज येथील दलित महामेळाव्यास आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर राज्यात त्यांच्या प्रतिमेला धक्का बसेल का, याबाबत रामदास आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे सरकार कोणत्याही जातीधर्मांच्या विरोधात नाही. त्यांच्याबद्दल उगीच गैरसमज पसरवले जात आहेत. खासदार राजू शेट्टी यांनी एनडीएमध्येच राहिले पाहिजे. त्यांची समजूत काढण्यासाठी आपण त्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणास कोणाचाही विरोध नाही. आमचे त्यास समर्थनच आहे, असे आठवले यांनी स्पष्ट केले. काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी मराठा समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील भटक्या विमुक्तांची अवस्था दलित आदिवासींपेक्षाही वाईट आहे. या समाजाला रेणके आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी आपले प्रयत्न आहेत, असे आठवले यांनी सांगितले. 

‘शिवरत्न’वरराजकीय कसोट्या : कार्यक्रमासचार तास उशिरा येऊनही आठवले यांनी कार्यक्रमापूर्वी खासदार विजयसिंह मोहिते यांच्या शिवरत्न या निवासस्थानी जाऊन चहापान घेतले. येथील कार्यक्रमात आठवले खासदार मोहिते यांनी एकमेकांविषयी जिव्हाळा व्यक्त केला. मला पंढरपूर लोकसभा मतदार संघातून सलग दोनवेळा निवडून देण्यात खासदार विजयसिंह मोहिते यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. देशात सर्वत्र राजकीय बदल होतील. माळशिरस तालुक्यात मात्र मोहितेंचीच सत्ता कायम राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. 

शिर्डी येथे निवडणुकीत उभे असताना अॅट्रॉसिटीबद्दल गैरसमज पसरवण्यात आला. तेव्हा खासदार मोहिते हे माझ्या पाठीशी ठाम राहून तेथे प्रचाराला आल्याचे त्यांनी सांगितले. ‘विजयदादांनी मला बांधला आहे फेटा.....वेळ आली तर देऊन टाकीन मंत्रिमंडळात वाटा....’ असे सूचक विधानही केंद्रीय मंत्री आठवले यांनी केले. राज्य मंत्रिमंडळात मी आणि आठवले यांनी एकत्र काम केले आहे. आता ते केंद्रीय मंत्री झाल्याने त्यांच्या माध्यमातून येथील विकासकामांना गती मिळेल, असे खासदार विजयसिंह मोहिते म्हणाले. 

यावेळी धैर्यशील मोहिते, राजाभाऊ सरवदे, सुनील सर्वगौड, दयानंद धाइंजे, नंदकुमार केंगार, बाळासाहेब धाइंजे, सभापती वैष्णवीदेवी मोहिते, शीतलदेवी मोहिते, स्वरूपाराणी मोहिते उपस्थित होते. श्री. आठवले अकलूज येथे दलित मेळाव्यास आले होते. 

पंढरपूर-लोणंद मार्ग, मोहितेंचा पाठपुरावा 
पंढरपूर-लोणंद हा रेल्वेमार्ग थोडा दुर्लक्षितच राहिला होता. मात्र खासदार विजयसिंह मोहिते यांच्या पाठपुराव्यामुळे आमच्या सरकारने तो पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे, असे रामदास आठवले म्हणाले. माळशिरस अकलूजमधील विकासकामांना नेहमी मदत राहील, असे ते म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...