आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी अहवाल दडवणे भोवले; एसटीचे तीन अधिकारी निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- तपासणी कर्तव्यावर असताना तपासलेल्या बसचा अहवाल दडवून ठेवून उशिराने सादर करणाऱ्या उस्मानाबाद एसटी महामंडळातील तीन अधिकाऱ्यांसह एका चालकाला निलंबनाचा तडाखा देण्यात आला आहे. याबाबत दैनिक "दिव्य मराठी'ने दिनांक १२ जानेवारी रोजी "तिकीट अपहाराच्या दाबलेल्या प्रकरणाचा अखेर भांडाफोड' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेऊन विभागीय नियंत्रकांच्या आदेशावरून गुरुवारी (दि.१४) ही कारवाई करण्यात आली आहे.

एसटी महामंडळामार्फत त्यांच्या धावणाऱ्या बसची राज्यभरातील पथकांकडून तपासणी केली जाते. यामध्ये सर्व प्रवशांना तिकीट दिले का, पैसे व्यवस्थित घेतले का, थांब्यावर नोंद केली का आदींची नेमण्यात आलेल्या पथकांकडून तपासणी केली जाते. यासाठी राज्यभरात एका विभागाचे पथक दुसऱ्या विभागाकडे तपासणीसाठी पाठविले जाते. यामागे मुख्य उद्देश हा तिकिटांच्या रक्कमेतील अपहार रोखणे हा आहे. त्यानुसार उस्मानाबाद येथील तीन अधिकारी एक चालक असे पथक नांदेड विभागाकडे तपासणीच्या कर्तव्यावर पाठविण्यात आले होते. तेथून या पथकाला हैदराबाद मार्गावर शेजारच्या तेलंगणा राज्यात जाऊन तपासणीचे अादेश देण्यात आले. या पथकामध्ये वाहतूक नियंत्रक एस. एम. कांबळे, वाहतूक नियंत्रक पवार सहाय्यक वाहतूक नियंत्रक जमादार यांचा समावेश हाेता. त्याचबरोबर या पथकाला उस्मानाबाद विभागाची जीप चालक डी. पी. लोमटे यांनाही पाठविण्यात आले होते. या पथकाने डिसेंबर २०१५ रोजी सायंकाळी तेलंगणातील कामारेड्डी येथे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा आगाराची बस थांबवून तपासणी केली होती. यावेळी बसवर वाहक म्हणून डी. जे. सोयाम होते. यावेळी अनेकांकडे तिकीट नसल्याची गंभीर बाब समोर आल्याचे कळते. परंतु, या तपासणीला महिना लोटला तरी पथकाने आपला अहवाल वरिष्ठांकडे सादर करता दडवून ठेवला. दरम्यान, या प्रकरणावरून पांढरकवडा आगारात गदारोळ सुरू झाल्यानंतर याबाबत उस्मानाबाद विभागाकडे विचारणा करण्यात आली. त्यानंतर या पथकाने आपला तपासणी अहवाल आठवडाभरापूर्वी म्हणजेच महिनाभर उशिराने सादर केला. याबाबत दैनिक "दिव्य मराठी'ने वृत्त प्रकाशित करून या कारनाम्याचा भांडाफोड केला होता. याची दखल घेऊन विभाग नियंत्रकांनी तत्काळ संपूर्ण पथकालाच गुरुवारी (दि.१४) निलंबित केले.

या प्रकरणात उस्मानाबादेतील अधिकाऱ्यांनी त्यांचा अहवाल उशिराने सादर केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात संबंधित वाहकाने केलेल्या अपहाराबाबतची कारवाई यवतमाळ विभागात होणे अपेक्षित आहे. अहवाल उशिराने सादर केला म्हणून कारवाई करण्यात आली असली तरी तो अहवाल उशिराने का दाखल केला, यामागची कारणे काय, कोणाचा दबाव होता का, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, यामध्ये काही आर्थिक व्यवहार झाला का, या अनुषंगानेही चौकशी होऊन कारवाई होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या प्रकारामुळे उस्मानाबाद विभागाची मात्र चांगलीच नाचक्की झाली आहे.

अहवालास विलंब केल्याचा ठपका
वाहतूक नियंत्रक एस. एम. कांबळे, जेे. एम. पवार, सहाय्यक वाहतूक निरीक्षक रघुराम जमादार हे चालक डी. पी. लोमटे यांचेसह तपासणीसाठी गेले होते. अमरावती- नागपूर ही पांढरकवडा आगाराची बस कामारेड्डी येथे तपासली होती. यावेळी वाहकाने दोन हजार रुपयांचा अपहार केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. त्यानुसार, वरिष्ठांकडे अहवाल सादर करता प्रकरण दाबून ठेवण्यात आले. दरम्यान, पांढरकवडा येथून उस्मानाबादला विचारणा झाली आणि याचा भांडाफोड झाला.