आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Through Child Playwright Commercial Drama To Be Strong Gavanakar

बालरंगभूमीतून उद्या व्यावसायिक रंगभूमी सदृढ होईल : गवाणकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : गंगाराम गवाणकर
डॉ. अब्दुल कलाम रंगमंच सोलापूर

व्यावसायिकरंगभूमीला सध्या चांगले दिवस नाहीत. आशयघन संहिता देऊन बालनाट्ये निर्मिली गेली तर उद्या व्यावसायिक रंगभूमी सदृढ होईल, अशी अपेक्षा ९६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी येथे व्यक्त केली. सोलापुरात झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलनाच्या सांगता समारंभात ते बोलत होते.

हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावरील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम रंगमंचावर रविवारी सायंकाळी संमेलनाचे सूप वाजले. त्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबईचे अध्यक्ष मोहन जोशी, खासदार विजयसिंह मोहिते, संमेलनाध्यक्षा कांचन सोनटक्के, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, उपमहापौर प्रवीण डोंगरे, भाऊसाहेब भोईर आदींची प्रमुख उपस्थिती होती. गेल्या चार दिवसांत बालकलावंतांचे आविष्कार अनुभवल्याने वातावरण भारावलेले होते. शहरात ‘बालभवन’ उभारण्याची चर्चाही या वेळी झाली. संमेलनाच्या यशस्वितेसाठी झटणाऱ्यांचा सत्कार झाला. बोधचिन्ह तयार करणारे अमित रोडगे, गीत लिहिणारे आनंद खरबस, त्याला संगीत देणारे दीपक कलढोणे, जिंगल लिहिलेले मुकुंद हिंगणे आदींचा या वेळी सत्कार झाला. बालरंगभूमीसाठी योगदान देणाऱ्या विद्या काळे, डॉ. मीरा शेंडगे, नागेंद्र माणेकरी, गोविंद गज्जम यांचाही सन्मान करण्यात आला.
टीव्हीवर एक तासाचा कार्यक्रम घेणार
संमेलन अतिशय सुंदर झाले. त्यामागे नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे परिश्रम आहेत. आता टीव्हीवर मुलांसाठी एक तास कार्यक्रम घेण्याचा विचार आहे. सह्याद्री वाहिनीवर ‘किलबिल’ सुरू करता येईल.” मोहन जोशी, नाट्यपरिषदेचे अध्यक्ष

जाता जाता नेता म्हणाला
संमेलनात ७४६ शाळांचा सहभाग मिळाला. त्यामुळे एक मोठी चळवळच उभी राहिली. मतभेद होणार नाहीत, याची काळजी घेतली. जाता जाता मोहिते-पाटलांच्या रूपाने एक चांगला नेताही मिळाला.”
भाऊसाहेब भोईर, नियामकमंडळ सदस्य

आनंदाचा कळस झाला
राज्यभर अनेक नाटकांचे प्रयोग केले. परदेशातही काही प्रयोग करण्याची संधी मिळाली. त्यात जेवढा आनंद झाला नाही, तितका सोलापूरच्या संमेलनात झाला. आनंदाचा हा कळसच झालाय.”
कमलाकर सोनटक्के, नाटककार