आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळगोपाळांची दिमाखात निघाली नाट्यदिंडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ग्रंथदिंडी,पालखी, बाल वारकरी, नंदीध्वज पेलणारे सेवक तसेच जवानांच्या पोषाखात दिमाखदार संचलन करीत बाळगोपाळांची नाट्यदिंडी शनिवारी सकाळी निघाली. गुलाबी बोचऱ्या थंडीत छोट्या पाहुण्यांनी सामिल होत शहरवासीयांना एक वेगळीच ऊर्जा दिली.

सकाळी साडेआठ वाजता बलिदान चौकातून अखिल भारतीय बालनाट्य संमेलनाच्या दिंडीस सुरुवात झाली. प्रारंभी नाट्य सिने अभिनेत्री फय्याज, संमेलनाध्यक्षा कांचन सोनटक्के, मोहन जोशी, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष विजय साळुंके, संमेलन समितीचे प्रमुख कार्यवाह अजय दासरी, नियामक मंडळ सदस्य दिलीप कोरके, कृष्णा हिरेमठ आदींच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले.

सप्तरंगी पताका, विविध पोषाख, सामाजिक संदेश देणारे चित्ररथ, हस्तपत्रके, विद्यार्थ्यांचे विविध पोषाख आदींनी शहर परिसरास अगदी नाट्यमय रूप प्राप्त झाले होते. दिंडीच्या अग्रभागी असणाऱ्या पहिल्या बग्गीत संमेलनाध्यक्ष सोनटक्के, महापौर प्रा. सुशीला आबुटे आणि अभिनेत्री फय्याज होत्या. त्यांच्यासमवेत सिनेमा नाटकात काम करणारे बालकलावंत होते. दुसऱ्या बग्गीत जोशी (सपत्निक), साळुंके आणि बालकलाकार तर तिसऱ्या बग्गीत सर्व ३० बालकलाकार होते.

पालखीने वेधले लक्ष
दिंडीच्या अग्रभागी ग्रंथाची पालखी होती. त्यात विविध ग्रंथांसह नटराज मूर्ती ठेवण्यात आली होती. विविध भागात आगमनाचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. बलिदान चौक येथून निघालेली ही दिंडी विविध भागात फिरत हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणाजवळ विसर्जित झाली. अण्णासाहेब पाटील प्रशालेचे जवान पथक आणि नंदीध्वजधारकांचे पथक यांनी लक्ष वेधले. शिवाजी महाराज, तुकाराम, जिजाबाई आदी विभूतींच्या पोषाखातील विद्यार्थी उठून दिसत होते.

हजारो विद्यार्थी पण सुसूत्रता
दिंडीत शहरातील ७५ शाळांतील चार ते पाच हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळांच्या शिक्षकांकडून योग्य नियोजन करण्यात आल्याने विनाअडथळा शिस्तबद्ध पार पडली.