आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात "टायगर सेल' नावालाच, वन्यजीवांच्या तस्करीकडे वन विभागाकडून होतेय दुर्लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वन्यजीवांच्या शिकारी, अवैध शिकारी, सापांच्या विषाची तस्करी, वृक्षतोड, चंदनाच्या झाडांची चोरी यासह वनजमिनींवरील अतिक्रमणाचे प्रश्न आदींबाबत ठोस कृती होताना दिसत नाही. जिल्ह्यातील वन गुन्हे थांबवण्यासाठी वनविभाग, पोलिस इतर महत्त्वाच्या विभागांची एकत्रित व्याघ्र कक्ष (टायगर सेल) समिती बनवण्यात आली आहे. या समितीची दरमहा बैठक होणे अपेक्षित असते. पण गेल्या दोन वर्षांत समितीची एकही बैठक झाली नाही. त्यामुळे टायगर सेल केवळ नावालाच राहिली आहे. वनविभागालाच याचे गांभीर्य नाही, हे स्पष्ट होत आहे. ठोस कृतीऐवजी सोईनुसार बैठका घेण्यात येतात. प्रशासनाच्या या बोटचोपे धोरणांमुळेच शिकारी, वृक्षतोड करणाऱ्यांसह भामटे सर्पमित्र वनसंपदेची लूट करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात टायगर सेलच्या बैठका नियमित होत असल्याची माहिती मिळाली आहे. टायगर सेल समितीच्या बैठका वेळेवर झाल्यास ठोस धोरण आणि कृती करणे शक्य होणार आहे.

५०० पोती कोळसा जप्त, मास्टरमाइंड बेपत्ता
सहा महिन्यांपूर्वी पोलिसांनी मुळेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील हातभट्टी दारूच्या भट्ट्यांवर कारवाई केली. त्यावेळी लाखो रुपयांचे लाकूड चार अवैध आरा गिरण्या सुरू असल्याचे आढळले. त्याचाही तपास रखडला आहे. गेल्या महिन्यात अक्कलकोट तालुक्यात कोळसा भट्ट्यांवर ३२ वर्षांत पहिल्यांदा कारवाई झाली. त्यामध्ये ५०० पेक्षा जास्त पोती कोळसा जप्त झाला. त्या घटनांचा तपास समन्वयातून झाल्यास मास्टरमाइंड सापडला असता. त्यासाठी ‘टायगर सेल’ समितीची बैठक महत्त्वाची अाहे. पण, ऑक्टोबर २०१३ नंतर समितीच्या बैठकाच झाल्या नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दर महिन्याला टायगर सेलची बैठक झालीच पाहिजे. वनविभागाचे उपवनसंरक्षक हे व्याघ्र कक्षाचे सचिव असतात. त्यामध्ये पोलिस आयुक्त, ग्रामीण पोलिस अधीक्षक, लोहमार्ग पोलिस, स्थानिक गुप्तवार्ता विभाग, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त, एसटी महामंडळाचे व्यवस्थापक, मानद वन्यजीव रक्षक, वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी, वीज वितरण कंपनी सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यासह इतर काही विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असतो.

टायगर सेलचे काम?
टायगरसेलचे कार्य जिल्ह्यातील सर्व वनक्षेत्र, त्यामधील वन्यजीवांचे संरक्षण संवर्धन करणे आहे. वनक्षेत्रात शिकारीसाठी लावलेले सापळे शोधून नष्ट करणे, वन्यजीव पाणवठ्यांवरील स्थानिक, स्थलांतरित पक्षांच्या शिकारी थांबवणे, वनजमिनीवरील अतिक्रमण काढणे, अभयारण्यातील वनवे थांबवणे, अवैध वृक्षतोड, लाकूड वाहतूक आणि बेकायदा सॉ मिल बंद करणे यासह अभयारण्यातील मानवी हस्तक्षेप थांबवण्यासाठी ठोस धोरण निश्चित करणे कृती मोहीम सुरू करणे.

शिकारी मोकाट, चौकशी प्रलंबित
समितीच्या बैठकाच होत नसल्याने वन्यजीव वनसंपदेच्या संरक्षण, संवर्धनासाठी कोणत्याही ठोस उपायोजना, कृती होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शिकारी, अवैध वृक्षतोड करणाऱ्यांसह भामटे सर्पमित्र मोकाट झाले आहेत. तीन वर्षांपासून माळढोक अभयारण्याच्या परिक्षेत्रातील कोंडी, अकोलेकाटी, नरोटेवाडी, बीबीदारफळ शिवारातून मुरमाचा अवैध उपसा प्रकरणाची चौकशी सुनावणी प्रक्रिया सुरू आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे, आैज येथील वनक्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर मुरूम उपसा झाला. त्या प्रकरणाची चौकशी अद्याप प्रलंबितच आहे.

यापुढे नियमित बैठका, तपासात लक्ष
^टायगर सेलच्या नियमित बैठका होणे आवश्यक आहे. वनविभागाचे उपवनसंरक्षक त्या समितीचे सचिव असून ते स्वत: बैठकांचे नियोजन करतात. मी स्वत: समितीचा अध्यक्ष असून सचिवांकडून अद्याप बैठकांचे नियोजन झाले नाही. जिल्ह्यात बहुधा वनक्षेत्र कमी असल्यामुळे बैठकांचे नियोजन झाले नसावे, अशी माझी शंका होती. पण, गणेशोत्सवानंतर तातडीने आढावा घेऊन बैठकांचे नियोजन होईल. यापुढे नियमित बैठका गुन्ह्यांचा सखोल तपास होण्याबाबत विशेष लक्ष देण्यात येईल. वीरेशप्रभू, पोलिसअधीक्षक

बैठका घेण्याकडे दुर्लक्ष झाले आहे
^तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. राजेश प्रधान यांच्या कार्यकाळात ‘टायगर सेल’च्या बैठका झाल्या. पण, त्यानंतर एकही बैठक झाली नाही. वन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी त्या बैठका फार महत्वाच्या असतात. त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. पोलिस वनविभागाकडे मी स्वत: लेखी पत्रव्यवहार केला नाही. डॉ.निनाद शहा, मानदवन्यजीव रक्षक

मलाकल्पना नाही, माहिती घेऊन निर्णय
^‘टायगरसेल’ बैठकांचे आयोजन कोण करते? याबाबत कल्पना मला नाही. माझ्या कार्यकाळात बैठका झाल्या नाहीत. त्याबाबतची स्वतंत्र माहिती घेऊन लवकरच निर्णय घेण्यात येईल. सुभाष बडवे, उपवनसंरक्षक,सोलापूर

टायगर सेल म्हणजे?
वन्यजीव शिकाऱ्यांच्या निशाण्यावर प्रामुख्याने वाघ असतात. राज्यासह संपूर्ण देशभरात वाघांच्या सर्वाधिक शिकारी होतात. त्यावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच वनक्षेत्रातील इतर प्राण्यांच्या शिकारी, अवैध वृक्षतोड, वनोपजाची तस्करी थांबवून वनसंपत्तीचे संरक्षण संवर्धन करण्यासाठी शासनाने २८ जून २००२ मध्ये व्याघ्र कक्ष समिती नियुक्त केली. वाघ हा वन्यजीवांचा राजा (महत्त्वाची कडी) असल्याने त्याचे संरक्षण संवर्धन झाल्यास संपूर्ण वनक्षेत्राचे संरक्षण होते. वन-वन्यजीवांच्या संरक्षण संवर्धनासाठीच्या संयुक्त समितीला व्याघ्र कक्ष (टायगर सेल) हे नाव दिले.

भामट्या सर्पमित्रांचा सुळसुळाट : घरामध्येआढळलेल्या सापाला पकडून त्यास दूरवर सोडण्यासाठी नागरिकांकडून मोठ्या पैशांची मागणी होते. सापांच्या विषाची तस्करी करणारी टोळी शहरात कार्यरत असल्याची कुजबूज आहे. अवैध वृक्षतोडीच्या प्रकारांकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात येते.

वरिष्ठांनी केली होती कानउघाडणी
सन२०१२ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील व्याघ्र कक्षाच्या नियमित बैठका झाल्या नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पुण्याचे तत्कालीन मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी सोलापूर वनविभागाला कारणे दाखवा पत्र पाठवून कानउघाडणी केल्याचे, पुणे वनविभागाच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. सोलापूर वन विभागावर त्याचा काहीच परिणाम झालेला नाही, असे दिसते.

रखडला चंदन तस्करीचा तपास : तीनमहिन्यांपूर्वी टाकळी येथील चंदन कारखान्यातून अडीच कोटींपेक्षा जास्त किमतीचे चंदन पोलिसांनी जप्त केले. दोन वर्षांपूर्वी दक्षिण सोलापूर माढा तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे रक्तचंदन पकडण्यात आले. त्या दोन्ही घटनांचा तपास अद्याप संथगतीने सुरू आहे. पोलिसांनी दोन्ही चंदनसाठ्यांवर कारवाई केली. पण, वनविभाग पोलिसांनी समन्वयातून तपास केला नसल्याने अद्याप त्या घटनेचे मास्टरमाइंड सापडलेच नाही.