आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. आमटे दांपत्याने उलगडली भावी डॉक्टरांपुढे ‘प्रकाशवाट’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ‘आम्ही दोघेही डॉक्टर झालो. ती माझ्यापेक्षा दोन वर्षे मोठी. कॉलेजमध्ये एकत्र होतो पण साधी आोळखही नव्हती. हाऊसजॉबमध्ये मी सर्जरी आणि ती अॅनस्थेशिया जॉबला. प्रेम तेथेच जुळले. लग्न करण्याआधी बाबांनी (बाबा आमटे) आनंदवन प्रकल्प (जि. चंद्रपूर) दाखवले. तिची संमती घेतली. सुखासीन जीवन सोडून आदिवासी, कुष्ठरोगींची वैद्यकीय सेवा, पुनर्वसन या कामासाठी आयुष्यभर व्रत घेण्याची तयारी विचारली. तिच्या होकाराअंतीच आनंदवनात लग्न झाले. १९७२ ची ही घटना. दुष्काळ पडलेला. कोणताही मुहूर्त नाही. काही देणे-घेणे नाही. लग्नाला माझे काही मित्र आणि आनंदवनातील कुष्ठरोगी हेच वऱ्हाडी. साध्या पद्धतीने जंगलात लग्न लागले. पण तो आनंदसोहळा होता. आनंदवनचे कार्य उद्दिष्ट समोर ठेवतच नंतर हेमलकसा प्रकल्प सुरू झाला...’
अंगावर शहारे येतील असे प्रसंग डॉ. प्रकाश मंदाकिनी आमटे सहज, साधेपणाने सांगत होेेते. मात्र, संपूर्ण सभागृह स्तब्ध होऊन वर्णन ऐकत होते. वैद्यकीय क्षेत्रच करिअर म्हणून निवडलेले विद्यार्थी ही एका डॉक्टर दांपत्याची प्रकाशवाट समजून घेत हाेते... मॅगसेसे पुरस्कार विजेते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. आमटे दांपत्याच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात "प्रयुज' या वार्षिकांकाचे प्रकाशन झाले. त्यानंतर आमटे दांपत्याची मुलाखत झाली. विद्यार्थी पूजा निंभोरे, अतुल अंकलारे यांनी ही मुलाखत घेतली.
यावेळी अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, उपअधिष्ठाता डॉ. कुर्डुकर, सहप्राध्यापिका डॉ. नीलिमा देशपांडे, विद्यार्थी सचिव दीपक फुलवणे आदी उपस्थित होते. मकरंद सुरवसे, कल्पन शुक्ला यांनी सूत्रसंचालन केले. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली.

आनंदवन उभे राहिले असे... बाबा आमटे यांच्या कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘आनंदवन’च्या निर्मितीची कथा डॉ. प्रकाश यांनी सांगितली. ते म्हणाले, की, बाबांचे कार्य लहानपणापासून पाहातच होतो. ते वकील होते. पण एकदा भर पावसात कुष्ठरोगी रस्त्याच्या कडेला त्यांनी पाहिला. अंगभर अळ्या झालेल्या. हाता-पायाची बोट झडून किडलेली. ते प्रचंड घाबरले. त्यांनी आपल्याजवळची घाेंगडी त्याच्या अंगावर टाकली. घरी आल्यानंतर त्यांनी विचार केला मी इतका का घाबरलो? अशाच कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचे व्रत त्यांनी घेतले. आनंदवन उभे राहिले.... आणि आनंदवनात आली मोठी माणसे डॉ.प्रकाश म्हणाले, कुष्ठरुग्णांच्या सेवेसारख्या कामाला त्यावेळी वाळीतच टाकले गेले होते. कोणीही ‘आनंदवना’कडे फिरकत नसत. नंतर समाजवादी नेते एस. एम. जोशी, ज्येष्ठ पत्रकार यदुनाथ थत्ते, तेव्हाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आदी खूपजण आले. आचार्य प्र. के. अत्रे यांनी त्याआधी आनंदवन पाहिलेले. त्यांनी मराठामध्ये अग्रलेख लिहून म्हटले होते की, कुष्ठरोग झाल्यानंतर मंत्री वगैरे आनंदवन पहायला जातील काय? मग खूप लोक येऊ लागली. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडेही आले होते. त्यांनी लिहिले ‘विज्ञानवादी महात्मा’. साऱ्या महाराष्ट्राला आनंदवन आणि बाबांचे कार्य माहीत झाले. मग आनंदवन आणि बाबांच्या कार्याला समाजमान्यता मिळाली.
‘हेमलकसा’ची गोष्ट
लग्नझाल्यानंतर हेमलकसा (जि. गडचिरोली) या आदिवासीबहुल भागात राहण्यास गेलो. साेबत काहीजण होते. झोपडी उभी केली. मूळ रहिवासी सोबतच होतेच. विंचू , साप आणि उंदीर. टपकन कधीही पुढ्यात
पडायचे. मंदाकिनीला हे नवे होते. पण तक्रार करायची नाही, असेच ठरलेले होते. साप विषारी, बिनविषारी ओळखायला शिकलो. निसर्गात निसर्गासारखे राहिलो.
उपचाराला सुरुवात
प्रारंभीआदिवासी वैद्यकीय उपचारासाठी येईनात. एकदा एक आदिवासी पाहिला. त्याला घराबाहेर झोपाळ्यासारखे ठेवले. अंगात प्रचंड जखमा होत्या. त्यात हिरव्या अळ्या पडलेल्या. जखमेची दुर्गंधी घरभर पसरू नये यासाठी बाहेर ठेवलेले. आम्ही विचारले उपचार करूयात काय? मरण्यासाठीच जणू त्याला बाहेर सोडलेले. खूप आनंदाने त्यांनी उपचारासाठी माझ्याकडे त्याला सुपूर्द केले. अळ्या वेचून बाहेर काढल्या. नीलगिरी तेलाने जखमा स्वच्छ केल्या. निजर्तुंकीकरण केले. काही दिवसांतच ठणठणीत झाला. मग हळूहळू आदिवासींचा विश्वास बसू लागला.