आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गड्डा यात्रा: आज तैलाभिषेक अन् उद्या अक्षता सोहळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: शेटे वाड्यात प्रतिकात्मक नंदीध्वजाची प्रतिष्ठापना करताना शेटे कुटुंबीय.
सोलापूर - ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त मंगळवारी सकाळी उत्तर कसब्यातील शेटे यांच्या वाड्यात फुलांच्या प्रतिकात्मक नंदीध्वजांची प्रतिष्ठापना करण्यात आली. मानकरी शिवानंद हिरेहब्बू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. गंगाधर शेटे क्षीरानंद शेटे यांच्या हस्ते सिद्धेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन झाले. या वेळी सुहासिनी शेटे यांच्यासह सुनंदा शेटे, शिवानंद शेटे तसेच शेटे कुटुंबातील सिद्धेश्वर, अभिषेक, अरुंधती, माधवी, अमृत, चैताली, मंगला, अक्षय, डॉ. सिद्धेश्वर वाले आदी उपस्थित होते.
शेेटे कुटुंबाला अक्षता सोहळ्याच्या वेळी सिद्धरामांनी स्वत: रचलेल्या मंगलाष्टका म्हणजेच संमती म्हणण्याचा मान आहे. तसेच सिद्धेश्वर देवालयातील श्री आहेश्वर लिंग माहेश्वर लिंग आणि चंडक बगीचा परिसरातील श्री शतकेश्वर लिंग येथील मानाचा विडा घेण्याचाही मान आहे. या वेळी वाडद स्वामी, कंटीकर स्वामी, सिद्धू स्वामी यांनी पूजा विधी केले. त्यानंतर महाप्रसाद देण्यात अाला.

या ठिकाणी नो पार्किंग
१३ते १७ जानेवारी या कालावधीत सिद्धेश्वर मंदिर, संमती कट्टा, रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसर तसेच होम मैदान भागात नो पार्किंग झोन राहील, अशी माहिती पोलिस उपायुक्त अश्विनी सानप यांनी निवेदनाद्वारे दिली.

आज मिळणार वीज
अक्षतासोहळा येऊन ठेपला तरी गड्डायात्रेसाठी वीजजोड मिळाली नाही. याबाबत अधीक्षक अभियंता एस. बी. साळे यांना विचारले असता त्यांनी अर्ज उशिरा आले. बुधवारपासून वीजजोड देणार असल्याचे सांगितले. यात्रेतील स्टॉलधारकांना सी डिव्हीजनच्या माध्यमातून वीज दिली जाते. डिव्हीजनमध्ये आत्तापर्यंत ३५ जणांचे कोटेशन भरून घेण्यात आले. त्यांना बुधवारी वीज मिळेल. सी डिव्हीजनमध्ये सात जणांनी अर्ज सादर केले. त्यांच्याकडून कोटेशन भरून घेऊन वीजजोड देण्यात येणार आहे.
उद्याच्या अक्षता सोहळ्यासाठी पाेलिस यंत्रणा झाली सज्ज
गुरुवारी सिद्धरामेश्वर मंदिराच्या तळ्याशेजारी असलेल्या संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा होईल. त्यासाठी जिल्हाभरातून भक्त येतील. शिवाय शेजारच्या कर्नाटकातील भक्तांचीही उपस्थिती राहणार आहे. राजकीय नेते, कार्यकर्ते आणि लाखाे भक्तगण या रम्य सोहळ्यासाठी येतील. पोलिस यंत्रणा सज्ज झाली अाहे.
दिवसभर चालेल यण्णीमज्जन
६८ लिंगांना तैलाभिषेक (यण्णीमज्जन) करण्यासाठी बुधवारी नंदीध्वजांची मिरवणूक निघेल. सकाळी सात वाजता हिरेहब्बू वाड्यातून त्यास सुरुवात होणार आहे. बाराबंदीतील सिद्धेश्वर भक्त ‘एकदा भक्त लिंग हर्र बोला हर्र, श्री सिद्धेश्वर महाराज की जय’ असा जयघोष करीत त्यात सहभागी होणार आहेत. दिवसभर हा कार्यक्रम चालणार आहे.