आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवस्थानतर्फे आज ‘रास्ता रोको’ . जिल्हाधिकाऱ्यांच्या धोरणाविरुद्ध प्रमुख पाच मार्गांवर होणार निदर्शने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात शहरात रविवारी दुपारी बाराला पाच ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. सिद्धेश्वर मंदिरात यानिमित्ताने शनिवारी सायंकाळी चारला सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, समाजसेवी संस्था भाविकांच्या उपस्थितीत बैठक झाली. पुणे, विजापूर, हैदराबाद, अक्कलकोट पंढरपूर या मार्गावर आंदोलन होणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेल्या सिद्धेश्वर यात्राकाळात भाविकांना धुळीचा त्रास होऊ नये, यासाठी होम मैदानावर मॅट टाकणे आणि संकटकालीन मार्ग मोकळा सोडणे यास समितीने विरोध केला आहे.
जिल्हाधिकारीतुकाराम मुंढे याबाबत आग्रही असल्याने त्यांच्या विरोधात समितीने आंदोलन सुरू केले आहे. डिसेंबरला शहर बंद पुकारले होते.

बैठकीस समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, अॅड. आर. एस. पाटील, गुंडप्पा कारभारी, पुष्कराज काडादी, नगरसेवक अनिल पल्ली, जगदीश पाटील, शिवानंद पाटील, अॅड. आळंगे, माजी महापौर सुभाष पाटणकर, शाहू शिंदे, लक्ष्मीकांत ठोंगे पाटील आदी उपस्थित होते.

वक्त्यांनी जिल्हाधिकारी पूर्वग्रहदूषित आणि दुराग्रही असल्याची टीका केली. आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. आंदोलनाची माहिती राज्यपातळीवर मुख्यमंत्री आणि गृहखात्याकडे पोहोचेल असे काम करा, असेही सांगण्यात आले. यात्रेतील दालन नोंदणी कार्यालयाची पूजा १५ डिसेंबर रोजी पंचकट्टा येथे सकाळी दहाला होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहून आपली ताकद दाखवावी, असेही आवाहन काडादी यांनी केले.

जिल्हाधिकाऱ्यांवर टीका
‘तुरुंगात २० हजार जणांना ठेवण्याची क्षमता आहे का? खायचे सोडा, इतक्यांना पाणी तरी देऊ शकतील का? तरुणांनी अटकेला घाबरू नये, तसेच अटक झाल्यावर आपले खरे नाव, पत्ता कामाचे ठिकाण पोलिसांना सांगू नका,’ आदी वक्तव्य यावेळी वक्त्यांनी केले. कारवाईला घाबरू नये, सिद्धरामेश्वर आपल्या पाठीशी आहेत. वेळ आली तर आत्मदहन करू आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही जाळू, अशी भाषा वापरण्यात आली. यात सिद्धाप्पा कलशेट्टी, बसवराज शास्त्री हिरेमठ, सुरेश तमशेट्टी, अनिल पल्ली, भारत परळकर, शिवानंद पाटील, राजशेखर हिरेहब्बू, प्रभाकर वनकुद्रे, लक्ष्मीकांत ठोंगेपाटील, आनंद मुस्तारे यांचा समावेश होता.

असे आहे जबाबदाऱ्यांचे वाटप
विजापूर रस्ता : भारत परळकर, बसवराज शास्त्री, अॅड. पाटील, सुरेश तमशेट्टी, नरेंद्र काळे
तुळजापूर रस्ता : अरुण लातुरे, शिवा संघटना, राजू हौशेट्टी, जयराज नागणसूरे
अक्कलकोट रस्ता : सिद्धाप्पा कलशेट्टी, आडम मास्तर, सिद्धाराम चाकोते, जगदीश पाटील
हैदराबाद रस्ता : पालकमंत्री देशमुख, शिवानंद पाटील, अनिल पल्ली संघटना
बातम्या आणखी आहेत...