आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज प्रभाग आरक्षण सोडत, वाढणार दिग्गजांची डोकेदुखी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार आहे. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे २६ प्रभागांचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. २४ प्रभागांमध्ये प्रत्येकी चार सदस्य तर प्रभागांत प्रत्येकी तीन असे एकूण १०२ नगरसेवक असतील.
प्रभाग पद्धतीत अनेक दिग्गज नगरसेवकांना आपल्याच परिसरातील प्रभागात निवडणूक लढवण्याची संधी मिळणार असली तरी प्रभागांची रचना मोठी असणार आहे. यामुळे प्रभावशाली नगरसेवक आमने-सामने येऊन लढती लक्षवेधी ठरतील. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत अनेकांना मतदारसंघ राहिले नाहीत, शहरात अशी स्थिती नसेल. एका प्रभागात जास्तीत जास्त जागांवर आरक्षण पडेल अन् एक खुले राहील.

१०२पैकी ४५ जागांवर आरक्षण
महापालिका निवडणुकीत ५० टक्के म्हणजे ५१ महिला असतील. १०२ पैकी ४५ जागांवर आरक्षण असणार आहे. त्यात अनुसूचित जाती १५ (८ महिला), अनुसूचित जमाती (१ महिला), ओबीसी २८ (१४ महिला) असे आरक्षण असेल. २३ जागा महिलांसाठी असतील.

प्रभाग क्रमांक २५ २६ हे प्रत्येकी तीन सदस्य असलेले प्रभाग आहेत. त्यातील एका प्रभागात दोन महिला, एक खुला आणि दुसऱ्या प्रभागात एक महिला दोन खुले असतील. यातील दोन महिला सदस्य असलेले प्रभाग कोणते याची सोडत आधी काढली जाणार आहे.

तीन तास चालेल प्रक्रिया
आरक्षणसोडत कार्यक्रम दोन ते तीन तासात संपेल. त्यानुसार महापालिका निवडणूक कार्यालयाने नियोजन केले आहे. अंध विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर जाहीर वाचन होईल. आरक्षण सोडतीसाठी महापालिकेच्या वतीने सर्व नगरसेवकांना पत्रक देऊन माहिती देण्यात आली आहे.
२४ प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन महिलांसह चार सदस्य असतील. प्रत्येक प्रभागात तीन पेक्षा जास्त आरक्षण राहणार नाही. म्हणजे किमान एक कमाल दाेन सदस्य खुले राहतील.
प्रभागाचे नकाशे हुतात्मा स्मृती मंदिर परिसरात लावण्यात येणार आहे. २६ प्रभागांची रचना कशी असणार आहे याचा मोठा नकाशा आणि २६ प्रभागांचे २६ नकाशे तेथे लावण्यात येणार आहे. हे नकाशे नागरिकांना १० आॅक्टोबरपासून उपलब्ध होतील.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी काँग्रेसचे १२ नगरसेवक भाजपत येण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. काँग्रेस शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. भाजप आणि शिवसेना युती करून लढतील तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. आरक्षण सोडतीनंतर अनेक नगरसेवक सोयीनुसार पक्ष बदलतील, अशी शक्यता आहे. निवडून येणे हाच निकष असणार आहे.

यांच्या लढती होतील लक्षवेधी
दिग्गज नगरसेवकांना त्यांच्या परिसरातील प्रभाग मिळाला तरी त्याची व्याप्ती दुपटीने वाढणार आहे. त्यामुळे दिग्गज नगरसेवक आमने-सामने निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे. यात मनोहर सपाटे, देवेंद्र कोठे, दीपक राजगे, सुरेश पाटील, आनंद चंदनशिवे, शिवलिंग कांबळे, इंदिरा कुडक्याल, नरेंद्र काळे, मधुकर आठवले, महापौर सुशीला आबुटे, अलका राठोड यांच्या लढती लक्षवेधी असतील.

यांची होऊ शकते अडचण
महापौर सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी, नगरसेवक मनोहर सपाटे, पद्माकर काळे, आनंद चंदनशिवे, आरिफ शेख, चेतन नरोटे, शिवलिंग कांबळे, अलका राठोड, सारिका सुरवसेसह अन्य.
बातम्या आणखी आहेत...