आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शौचालयाची माहिती दिलीच नाही, पथक परतले - महापालिकेच्या कामकाजावर नाराजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - केंद्र आणि राज्य शासनाच्या शौचालय योजनेतून शहरात १० हजार ९३२ शौचालये बांधण्यात आली. बांधलेल्या शौचालयाची माहिती घेण्यासाठी राज्य शासनाकडून पथक आले होते. पाच दिवस हे पथक शहरात होते. मात्र, महापालिकेकडून माहिती उपलब्ध करण्यात आल्याने चौकशी करताच पथकाला हात हलवत परत जावे लागले.

शौचालयाची माहिती घेण्यासाठी आलेल्या पथकाला माहिती देण्यास महापालिकेकडून सुरुवातीपासून टाळाटाळ केली. शनिवारी पथकास माहिती मिळेल असे अपेक्षित होते. पण, आजही माहिती मिळाली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत पथकाला पोहोचता आले नाही. महापालिकेच्या कामकाजाबाबत पथकातील सदस्य प्रीतमकुमार जावळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दहा दिवसात माहिती द्या अशी सूचना करून पथक शनिवारी रात्री मुंबईकडे परतले. शहरात १४ हजार शौचालये बांधण्यासाठी केंद्राकडून १४ कोटी रुपये मनपास अनुदान आले. त्यापैकी १० हजार ९३२ शौचालये बांधण्यात आली. त्यापोटी सुमारे ११ कोटी रुपये खर्च झाला. अन्य रक्कम खर्च झाल्याने सरकारकडे परत जाणार आहे.

खर्च केलेल्या रक्कमेचा हिशेब शासनाकडून मागण्यात येत आहे. त्यासाठी पाच दिवसांपूर्वी शहरात पथक दाखल झाले होते. मात्र त्यांना मनपाकडून माहितीच मिळू शकली नाही. माहिती मिळाल्यानंतर पथकाकडून चौकशी करण्यात येणार होती.

अपहाराची रक्कम वाढण्याची शक्यता?
१० हजार ९३२ लाभार्थींची चौकशी शासनामार्फत सुरू झाल्यास पूर्वी या योजनेत झालेल्या गैरव्यवहाराची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. ११ कोटींपैकी वाटप झालेल्या ९३ लाखांची चौकशी झाली. त्यात ७२ लाखांचा अपहार झाल्याने पोलिसांत गुन्हा दाखल झाला. आता अन्य दहा कोटी रुपयांतही अपहाराची रक्कम उघड होण्याची शक्यता आहे.