सोलापूर - मोहोळते वाकावपर्यंत झालेल्या रेल्वे मार्ग दुहेरीकरण कामाची तपासणी सोमवारी मध्य विभागाचे मुख्य संरक्षक आयुक्त सुशील चंद्रा यांनी केली. ट्रॅक वेल्डिंग, ट्रॅक, ब्रिज, खडी आदी महत्त्वाच्या भागांची त्यांनी बारकाईने तपासणी केली. हा मार्ग रेल्वेगाडी धावण्यासाठी सक्षम असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. मात्र हा मार्ग वापरात येण्यासाठी आणखी किमान महिना लागणार आहे. कारण वाकाव अनगर स्थानकांचे स्टेशन कनेक्शनचे काम अद्याप पूर्ण नाही. हे काम पूर्ण झाल्यानंतरच रेल्वे गाड्या नव्या मार्गावरून धावतील आणि अन्य गाड्यांचे क्राॅसिंग टाळले जाईल.
सोमवारी सकाळी सुशील चंद्रा यांच्यासह आरव्हीएनएल इंजिनिअरिंग विभागाचे वरिष्ठ रेल्वे अधिकारी मोहोळ स्थानकावर दाखल झाले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चंद्रा यांनी ट्रॉली चालत फिरून रुळांची तपासणी केली. सायंकाळी वेगाची चाचणी पाहण्यासाठी वाकाव ते अनगर रेल्वे इंजिन धावले. या वेळी ते स्वत: इंजिनमध्ये बसले होते. इंजिन ९० किमी वेगाने धावले. तपासणी रात्री साडेआठपर्यंत सुरूच होती. ११ तासांत २२ किमीच्या रुळांची तपासणी पूर्ण झाली.
आरव्हीएनएलकडून झालेल्या कामावर त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र अद्याप त्यांच्याकडून तसा लेखी आदेश प्राप्त झालेला नाही- मनिंदरसिंग उप्पल, अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक