आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारदर्शक बदलीवरून विरोध, पदाधिकाऱ्यांनी रोखली बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आंतर जिल्हाबदली प्रक्रियेत पारदर्शकता अाणण्यासाठी समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया राबवण्याबाबत अध्यक्षा जयमाला गायकवाड यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे लेखी मागणी केल्यावरून नाराज पदाधिकारी सदस्यांनी स्थायी समितीची बैठक तब्बल दोन तास रोखून धरली. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताच पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवून अध्यक्षा वागत असल्याचा सूर पदाधिकारी सदस्यांनी आळवला.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक सोमवारी अध्यक्षा जयमाला गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शिवरत्न सभागृहात सुरू होती. बैठक सुरू झाल्यानंतर एकही पदाधिकारी सदस्य सभागृहात उपस्थित नव्हते. फक्त अध्यक्षा अधिकारी दोन तास सभेत बसून होते. इतर पदाधिकारी सदस्य उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या दालनात बसून होते. बैठकीस सदस्य येत नसल्याने दीड तासानंतर अध्यक्षा गायकवाड यांनी विचारले असता, उपाध्यक्षांच्या दालनात सर्व सदस्य असल्याचे समजल्यावर स्वत: अध्यक्षा गायकवाड तिकडे गेल्या. आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सर्व आमदार नेतेमंडळींना विचारूनच करतोय, तुम्ही आमच्याशी चर्चा करण्याएेवजी थेट मंत्र्यांना सीईआेंना लेखी पत्र का दिले? असा प्रश्न शिक्षण सभापती मकरंद निंबाळकर यांनी उपस्थित केला.

त्यावर अध्यक्षा संतापल्या, मी अध्यक्ष असून प्रक्रियेत पारदर्शकता अाणण्यासाठी पत्र दिले, माझ्या अधिकाराचा वापर केल्याचे ठणकावून सांगितले. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी रंगली. सर्वांना विश्वासात घेऊनही त्रास देणार असाल तर राजीनामा देतो, अशी भूमिका निंबाळकरांनी घेतली. इतर पदाधिकारी सदस्य त्यामध्ये सहभागी झाल्याने वाद रंगला. अखेर उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख यांनी मध्यस्थी करीत वाद मिटवला. आंतरजिल्हा बदलीवर प्रक्रियेवर तोडगा निघाल्यानंतर स्थायी समितीची बैठक झाली. दोन वाजताची बैठक दुपारी चार वाजता सुरू झाली अन् विषयांचा आढावा घेऊन बैठक संपवली.

पदाधिकाऱ्यांतील मतभेद, पुन्हा चव्हाट्यावर
सहा महिन्यांपूर्वी स्थायीच्या बैठकीत विविध योजनांना प्रशासकीय मंजुरी देण्यावरून पदाधिकारी अध्यक्षा गायकवाड यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. त्यावेळी तत्कालीन कृषी सभापती (कै.) पंडित वाघ यांनी मध्यस्थी करीत वाद मिटवला होता. गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत अंगणवाडीतील पोषण आहाराच्या प्रश्नावरून सदस्यांनी अध्यक्षांना कोंडीत पकडले होते.

‘गोदूताई’मध्ये स्वतंत्र ग्रामपंचायतीचा ठराव
गोदूताई विडी घरकुल क्षेत्र स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याचा प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव पुन्हा चर्चेत आला. सदस्य सुरेश हसापुरे यांनी दोन वर्षांपासून तो प्रश्न प्रलंबित का ठेवला? असा प्रश्न उपस्थित केला. गोदूताई विडी घरकुलाचा स्वतंत्र ग्रामपंचायतीचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविल्याचे अध्यक्षा गायकवाड यांनी सांगितले. प्रस्तावास अापला विरोध नसल्याचे, हसापुरे यांनी सांगितले.
^दोन वाजता आयोजिलेली बैठक दोन तास उशिरा सुरू झाली. शिक्षण सभापती अध्यक्षांमध्ये आंतरजिल्हा बदलीवरून मतभेद झाले. पदाधिकारी सदस्यांबाबत पूर्वग्रह दूषित अध्यक्षांचा दृष्टिकोन जाणवतो. बैठकीस उशीर झाल्याबाबत मी नाराजी व्यक्त केली.'' सुरेशहसापुरे, सदस्य
बातम्या आणखी आहेत...