आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवहन महामंडळातील बडतर्फ ६९ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील बडतर्फ करण्यात आलेल्या जिल्ह्यातील ६९ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत येण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणतीही परवानगी घेता सातत्याने गैरहजर राहणे, तिकिटाच्या रकमेमध्ये अपहार करणे आदी कारणांमुळे या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कुऱ्हाड कोसळली होती.
परिवहन महामंडळातील विस्थापितांचे जीवन जगण्याची वेळ आलेल्या बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रतिष्ठेचे जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिस्तभंग करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांवर शासकीय नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येते. सौम्य कारवाईनंतरही कर्मचाऱ्याच्या वागणुकीत बदल झाला नाही तर त्याच्या बडतर्फीची कारवाई होते. यामुळे कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यावर मोठा परिणाम तर होतोच त्याचबरोबर त्याच्या कुटुंबालाही मोठे हाल सहन करावे लागतात. या परिस्थितीमध्ये बदल होण्यासाठी शासनाने कुटुंब सुरक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. ऑगस्टमध्ये महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार सप्टेंबरमध्ये तीन विविध प्रकारचे परिपत्रके प्रसिद्ध केली आहेत. यामध्ये गैरहजेरी अपहार केल्यामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार विभाग नियंत्रकांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ६९ कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये प्रशासनातील पाच, यांत्रिकी विभागातील सहा, २० चालक ३८ वाहकांना फायदा होणार आहे. यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना निरोप पाठवून या योजनेबद्दल माहिती देण्यात येत आहे. आतापर्यंत येथील परिवहन विभागाकडे यासाठी १८ कर्मचाऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांच्या समावेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये १० वाहक, सहा चालक दोन यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या योजनेसाठी कोणतीही मुदत ठरवण्यात आलेली नाही. अर्ज प्राप्त होतील त्याप्रमाणे ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. योजनेमुळे पुन्हा कर्मचाऱ्यांना चांगले जीवन जगण्याची संधी प्राप्त होणार आहे. यामुळे कार्मचाऱ्यांची सोय होणार आहे.

यामुळे योजना राबवणार
बहुतांशकर्मचारी वरिष्ठांशी असलेले मतभेद, प्रकृती अस्वास्थ्यामुळे दूरची फेरी टाळणे, कौटुंबिक अडचणी यामुळे गैरहजर राहिले. तिकीट देणे, लगेजची रक्कम घेणे अशा नजर चुकीने अपहार झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. बडतर्फीची कारवाई झाल्यावर त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. या बाबींचा विचार करून पुन्हा कर्मचाऱ्यांना संधी देण्यात येत आहे. यामुळे अनेकांच्या कौटुंबिक अडचणी सुटणार आहेत.

शासनाचाही फायदा
नवीन भरती प्रक्रिया राबवणे, भरती झालेल्या कर्मचाऱ्याला प्रशिक्षित करणे यासाठी मोठा खर्च शासनाला करावा लागतो. यामुळे आहे त्या कर्मचाऱ्याला दंड घेऊन पुन्हा रुजू करणे शासनाला परवडते. यामुळे ही योजना सुरू केली असल्याचे दिसून येत आहे.

रक्कम होणार वसूल
बडतर्फकरण्यात आलेल्या तीन वाहकांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. वसूल पात्र रक्कम शासनाच्या नियमाप्रमाणे निश्चित करण्यात येणार आहे. अपहाराची रक्कम, दंडाच्या रकमेचा विचार करून तडजोडीची रक्कम वसूल करण्यात येईल.

वास्तविक बडतर्फ करण्यात आलेल्या पात्र कर्मचाऱ्यांपैकी ६६ जणांवर गैरहजेरीच्या कारणावरून कारवाई करण्यात आली आहे. कसलीही परवानगी घेता अनिश्चित कालावधीसाठी कर्मचाऱ्यारी गैरहजर राहिले होते. यापैकी केवळ तीन वाहकांवर अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. या सर्वांना अटी शर्थींच्या अधीन राहून वेगवेगळी प्रक्रिया करून सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची सोय होणार आहे.

असे असणार नियम
{४५ पेक्षा अधिक वय नसलेल्या कर्मचाऱ्याला सेवेत सामावून घेतले जाईल.
{त्याला जुन्या सेवेच्या कालावधीतील कोणतेही फायदे देण्यात येणार नाहीत.
{नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्याप्रमाणे फायदे देण्यात येणार आहेत.
{सध्याची वेतनश्रेणी बडतर्फ केल्यानंतर असलेले वेतन यावर आधारीत वेतन.
{न्यायालयीन खटल्यात परिवहन महामंडळासोबतचे तडजाेड पत्र द्यावे लागणार
बातम्या आणखी आहेत...