आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवहन उत्पन्नवाढीत अपयश: खोबरे राजीनामा द्या : महापौर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महानगरपालिकेच्या परिवहन खात्याचे उत्पन्न वाढवण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत महापौर सुशीला आबुटे यांनी व्यवस्थापक प्रदीप खोबरे यांना राजीनामा का देत नाही, असा जाब विचारत खडे बोल सुनावले.
गुरुवारी दुपारी महापौर कक्षात झालेल्या चर्चेत आबुटे यांनी परिवहन विषयावर चर्चा करण्यासाठी खोबरे यांना बोलावले होते.यावेळी त्यांनी परिवहनच्या वाढत्या तोट्याचा पाढा वाचला. तसेच राजीनामा द्या, असे म्हणाल्या. दरम्यान, महापौर या विषयावर काहीच बोलल्या नसल्याचे खोबरे यांचे म्हणणे आहे.
परिवहन उपक्रम तोट्यात असताना गरज नसताना मोठ्या प्रमाणात बस खरेदी करण्यात आलेली आहे. या बस खरेदीचा करार केवळ १०० रुपयांच्या बाँडवर झाला आहे. बसची बॉडी ही फायबरची असून ४७ बसेसच्या चेसीज क्रॅक झाल्या आहेत. मध्यंतरी एक बस शाॅर्टसर्किटने जळाली. बुधवारी रात्री भागवत चित्रमंदिराबाहेर रस्त्यावर एका दुचाकीच्या धडकेत बसची बॉडी तुटली. अशा निकृष्ट बसनी काय साध्य होणार, असा सवाल महापौर आबुटे यांनी खोबरे यांना विचारला.

परिवहन संदर्भात चर्चा नाही
महापौरांनीमला कक्षात बोलावले हे खरे आहे. पण त्यांनी एका पत्रव्यवहारात प्रोटोकॉल पाळला नसल्याने संबंधितावर कारवाई करा, हे सांगण्यासाठी बोलावले होते. परिवहनसंदर्भात महापौर काही बोलल्या नाहीत. दुसऱ्या कामासाठी आलो होतो. याविषयी बोलने झाले नाही. प्रदीपखोबरे, परिवहन व्यवस्थापक

५० गाड्या थांबवल्या
तत्कालीनआयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी २०० नव्या बस खरेदी करण्याचा करार जेएनएनयूआरएम या कंपनीशी केला होता. त्यातील १५० बस दाखल झाल्या आहेत. आणखी ५० बस येणार आहेत. दरम्यान त्या ५० बस आणू नयेत असे आदेश पालिकेच्या वतीने कंपनीस देण्यात आले आहेत.

परिवहन कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांशी हुज्जत
नवीनबस खरेदी करूनही उत्पन्नात वाढ नाही, मागील दोन महिन्यांपासून परिवहन कर्मचाऱ्यांचे वेतन थकलेले आहे. उत्पन्नच वाढविता येत नाही तर आपण राजीनामा द्यावा, असे महापौर म्हणाल्या. यावर खोबरे यांनी ठीक आहे, असे म्हणत कक्षातून काढता पाय घेतला. याचवेळी परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी महापौरांच्या कक्षाबाहेर ऑगस्ट सप्टेंबर महिन्याचे थकलेले वेतन देण्यात यावे, अशी मागणी करीत काहीवेळ अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली.