आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडांमुळे मिळालीय सोलापुरातील अनेक परिसरास ओळख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहराचा चेहरामोहरा वेगाने बदलत आहे. अनेक मोठ्या इमारती उभी होत आहेत. परिसराचे नामकरणही होत आहेत. परंतु आजही सोलापुरात काही परिसराची ओळख आणि नावलौकिक हा त्या परिसरात असलेल्या वृक्षांमुळे आहे. सोन्या मारुती म्हटले की डोळ्यासमोर येतो तो भलामोठा पिंपळ. आणि पार्क म्हटलं की येतो तो शमी वृक्ष. नवरात्रीत दसऱ्याला सीमोल्लंघन करतो ते झाड.

कुमठा नाका परिसरातील कुष्ठरोग वसाहतीजवळ एक वडाचे झाड आहे. येथील लोक या झाडाचा उल्लेख पत्ता सांगताना सर्रास करतात. सात रस्ता परिसरातील संगमेश्वर महाविद्यालयात एक जुने बेलाचे झाड, याचाही उल्लेख विद्यार्थी वर्गाच्या बोलण्यात असतोच.

पार्क चौकातही असेच एक पिंपळाचे वडाचे झाड आहे. जिथे सध्या त्याच्या बुंध्याखाली श्री स्वामी समर्थांचे मंदिर आहे. या वृक्षाचीही पुनर्स्थापना करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी ते झाड उन्मळून पडायचेच राहिले हाेते. परंतु काही निसर्गप्रेमींनी जेसीबीच्या सहाय्याने त्या वृक्षाला नवजीवन देत पुनर्रोपण केले. उमानगरी येथे श्री मरिआई लक्ष्मीआई म्हणून एक लिंबाचे आणि पिंपळाचे मिळून झाड आहे, हे झाड अाणि मंदिरच परिसरातील मोठी ओळख आहे. या मंदिराच्या मागे किंवा पुढे आमचे घर आहे असे सांगण्यात येते. पार्क चौपाटीवर आणि ग्राममाता असणारी श्री रूपाभवानी मंदिरात असणाऱ्या शमीवृक्षांचेही तितकेच महत्त्व आणि वेगळा मान आहे.

लोक पत्ता सांगण्यासाठी वृक्षांचा असाही वापर करतात, जसे सिद्धेश्वर मंदिरात योगसमाधीसमोर जे लिंबाचे झाड आहे तेथे थांबतो किंवा नवजवान गल्लीतील पिंपळ्या मारुती. येथे असणाऱ्या पिंपळाच्या झाडावरून त्याचे नाव पिंपळा मारुती असे पडले आहे. जसे डीआरएम कार्यालयातील वड, सातरस्ता संगम कट्टाचे पिंपळ, एमएसइबी कार्यालयातील वडाचे झाड आणि विश्रांती चौकातील औदुंबराचे झाड. या वृक्षांचाही वापर पत्ता सांगण्यासाठी होतो.

निराळे वस्ती भागात चिंच नगर
शहरातनिराळे वस्ती परिसरात तर एक वसाहतच झाडांच्या नावांनी आहे, ती म्हणजे चिंचनगर. या परिसरात पूर्वी ५० हून अधिक चिंचेची झाडे अर्थात बनच होतं. आता झाडे १० ते १२ असली तरी या परिसरास नावच आहे चिंचनगर. लोक पत्ता सांगताना म्हणताना ही झाडे पार करून बोगद्याखाली जाताना हा पत्ता मिळेल किंवा ही इमारत आहे.

स्टेशनजवळ मेंदी बोळ
रेल्वेस्थानकासमोरील भाजीमंडईकडून चांदनी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याला पूर्वी मेंदी गल्ली किंवा मेंदी बोळ असे संबोधले जायचे. येथे आधी मेंदीच्या पानाची झाडे असल्याने असे नाव पडले होते. आता काळानुसार झाडेही गेल्याने बोळाचे नावही बदलले आहे.
बातम्या आणखी आहेत...