सातारा- शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर मल्हार क्रांती सेनेच्या एका कार्यकर्त्याने बुक्का फेकण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी साताऱ्यात घडली. त्यामुळे कार्यक्रमात काही वेळ गोंधळ उडाला. त्यानंतर पोलिसांनी मारुती जानकर या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, काही दिवसांपूर्वीही सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी तावडे यांच्यावर भंडारा फेकण्यात आला होता.
धनगर आरक्षणाचे आश्वासन देऊनही ते पूर्ण होत नसल्याने हा समाज सरकारवर नाराज आहे. त्याचे पडसाद ठिकठिकाणी उमटत आहेत.
तावडे शुक्रवारी साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी आले होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास त्यांनी अभिवादन केल्यानंतर जानकर याने अचानक तावडे यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. ‘विनोद तावडे मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या. त्यानंतर तावडे यांच्यावर बुक्का फेकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेनंतर कार्यक्रमाला गालबोट लागून काही वेळासाठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतल्यानंतर तणाव निवळला.