आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेषनागावर स्वार मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - शक्तिदेवता आई श्री तुळजाभवानी शेषनागावर स्वार रूपाची महापूजा सोमवारी (दि.१९) सातव्या माळेदिवशी मांडण्यात आली होती. मातेचे हे रूप पाहण्यासाठी तुळजापुरात भाविकांची अलोट गर्दी झाली होती. ही महालंकार पूजा सायंकाळी वाजेपर्यंत खुली होती.

सकाळची अभिषेक पूजा झाल्यानंतर देवीला महावस्त्र, अलंकार घालण्यात येऊन देवीचे महंत तुकोजीबुवा, महंत हमरोजीबुवा आदींनी देवीची शेषनाग अलंकार महापूजा मांडली. सायंकाळी वाजेपर्यंत लाखो भाविकांनी देवीचे हे मनोहारी रूप डोळ्यात साठवून ठेवले. तत्पूर्वी पहाटे एक वाजता चरणतीर्थ होऊन देवीच्या दर्शनास प्रारंभ करण्यात अाला. अभिषेक पूजेला सकाळी सहा वाजता सुरुवात केली. तर सायंकाळच्या अभिषेक पूजेस सात वाजता सुरुवात करण्यात आली. रात्री साडेदहा वाजता देवीचा छबिना काढण्यात आला. शेषशाही अलंकार महापूजा जेव्हा भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये विश्राम घेत असताना भवानीमातेने त्यांच्या नेत्रामध्ये जाऊन विश्राम घेतला. यावेळी विष्णूच्या दोन्ही कानामधून दोन दैत्य शंुभ निशुंभ निर्माण झाले, हे दैत्य निर्माण होताच शेष शय्येवरील विष्णूवरच आक्रमण करू लागले. त्यावेळी भगवान विष्णूच्या नाभीकमळात भगवान ब्रह्म यांनी भवानीचा धावा केला. तेव्हा शुंभ-निशुंभाचे भवानीचे युध्द झाले. भवानीने दोन्ही दैत्यांचा वध केला. म्हणून भगवान विष्णूने आपली शय्या श्री भवानीस विश्राम करण्यास दिली. म्हणून अश्विन शुध्द षष्ठीस अभिषेक पूजा संपल्यानंतर श्री भवानीस महालंकार घालून शेषशाही पूजा म्हणजेच भवानी शेषावरील विराजमान झालेली पूजा मांडतात, अशी आख्यायिका सांगितली जाते. शेषशाही अलंकार पूजा सायंकाळच्या अभिषेक पूजेपर्यंत दर्शनासाठी खुली असते.

गर्दीमध्ये वाढ
कुलस्वामिनीच्यादर्शनासाठी सातव्या माळेला भाविकांची प्रचंड गर्दी झाली. यावर्षी सुनियोजनामुळे दर्शन सुलभ होऊ लागले आहे. त्यामुळे भाविकांकडून तक्रारी केल्या जात नाहीत. दर्शनानंतर भाविक समाधानी होत असून, गर्दीमध्ये वाढ होऊ लागली आहे.
मातंगीदेवीचेही दर्शन नाही
आदिमाया आदिशक्तीच्या दर्शनापासून हजारो भाविक वंचित. नवरात्रोत्सवातील दर्शन व्यवस्थेत करण्यात आलेल्या बदलामुळे तुळजाभवानी मंदिरातून भक्तांना केवळ मातंगी मंदिर या मार्गावरून बाहेर काढण्यात येत आहे. या मार्गावर गर्दी होऊ नये यासाठी भाविकांना आत सोडले जात नाही. त्यामुळे मातंगीदेवीच्या दर्शनासाठी जाणारा पारंपरिक भाविक देवीच्या दर्शनापासून वंचित राहत आहे. मुंबई-पुणेसह कर्नाटक आंध्र प्रदेशातून येणारे भाविक यामुळे संताप व्यक्त करीत आहेत.

मुबलक पाणी पुरवठ्यामुळे समाधान
नवरात्रोत्सवात भाविकांच्या सोयीसाठी घटस्थापनेपासून पालिकेने दररोज पाणीपुरवठा सुरू केला आहे. यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शहराच्या काही भागात ज्या ठिकाणी भाविक वास्तव्यास नाहीत, अशा भागात पाण्याचा अपव्यय होत असल्याने या भागात दिवसाआड पाणी सोडण्याची मागणी पालिकेकडे करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी राजीव बुबणे यांनी सांगितले.