आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘महानंद’च्या पाठबळावर पुन्हा ‘तुळजाभवानी’ घेणार उभारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - विविध कारणांमुळे गलितगात्र झालेल्या तुळजाभवानी जिल्हा दूध संघाला पुन्हा उर्जितावस्था मिळवण्याची आता ‘महानंद’चे पाठबळ मिळणार आहे. महानंदचे महाव्यवस्थापक तथा जिल्ह्याचे सुपुत्र सच्चिदानंद नाईकवाडी यांनी संघाचा सोमवारी (दि. ३) कारभार हातात घेतला आहे. यामुळे दूध उत्पादक संस्थांना आशेचा किरण दिसत आहे.
एकेकाळी जिल्ह्याचे वैभव म्हणून तुळजाभवानी जिल्हा दूध संघाची गणना केली जात होती. अनेकांच्या कुटुंबांना आधार संघाने दिला होता. संघामुळे जिल्ह्यात दूधगंगा अवतरली होती. मात्र, अनियोजनबद्ध कारभार पराकोटीच्या राजकारणामुळे संघाची घडी विस्कटली. अनेकांच्या संसाराला हातभार लावणारा संघ काही वर्षातच गलितगात्र झाला. संघाच्या कारभाऱ्यांना याची धुरा व्यवस्थित संभाळता आली नाही. अशात खासगी दूध संकलकांचे पेव चांगलेच वाढले. सुरुवातीला त्यांनी अधिक दर, वेळेवर पैसा, घरपोच सेवा हे धोरण ठेवले. याच कालावधीत संघातील नियोजनाच्या अभावामुळे संघ आपोआप स्पर्धेतून फेकला गेला. अनेकांची देणी वाढली, कामगारांचे वेतनही देण्यात आले नाही. यामुळे संघाचे कामकाज पूर्णपणे बंद पडले. यामुळे शासनाने संघ अवसायानात काढण्यासाठी १९ फेब्रुवारी २०१५ ला अवसायकांची नेमणूक केली. त्यावेळचे अवसायक के. डी. सागर यांनी व्यवस्थितरित्या कारभार सुरू केला होता. मात्र, त्यांना सहकार्य मिळवण्याऐवजी त्यांनाच खोडा टाकण्याचे काम झाले. यामुळे त्यांनीही प्रयत्न सोडून दिले. आता पुन्हा संघाला ऊर्जितावस्था मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्याचे सुपुत्र महानंदचे महाव्यवस्थापक नाईकवाडी यांनी सोमवारी संघाचे अवसायक म्हणून पदभार स्वीकारला आहे. आतापर्यंत त्यांनी ज्या - ज्या सहकारी संस्थांवर काम केले त्या ठिकाणी संबंधित संस्थेला उभारी मिळाली आहे. यामुळे दूध संघालाही आता बळ येणार आहे. महानंदचेही पाठबळ मिळणार असल्यामुळे नाईकवाडी यांनी पहिल्या दिवसापासूनच कारभाराला सुरुवात केली आहे. त्यांनी दूध उत्पादक, संस्थांचे पदाधिकारी, काही कर्मचाऱ्यांसोबत बोलणी केली. त्यांच्याकडून नाईकवाडी यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. काही उत्पादकांनी तर संघाला दूध देण्याचे मान्य केले आहे. टप्प्याने नियोजन करून किमान एक दीड वर्षामध्ये संघाला उभारी देण्याचे काम ते करणार आहेत.

सध्या पोषक वातावरण
केंद्र शासनाने १९८० ला ऑपरेशन फ्लड अर्थात ‘दुधाचा महापूर’ योजना सुरू केली होती. यातून झालेल्या सर्वेक्षणातून उस्मानाबाद जिल्ह्यात दूध उत्पादन अधिक असल्याचे दिसून आले होते. त्यातून येथे दूधसंघाच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळाले. आताही दूधाचे उत्पादन मोठे आहे. तसेच पाण्याचे दुर्भिक्ष्य बऱ्यापैकी संपले आहे. यामुळे दुग्धोत्पादन वाढणार आहे. यामुळे संघालाही पोषक वातावरण असणार आहे.

कर्मचाऱ्यांची समस्या
कर्मचाऱ्यांचे वेतन, वाहतूक कंत्राटदार, दूध उत्पादक यांचे थकलेले देणे मिळून सुमारे साडेतीन कोटी रुपये थकले आहेत. नाईकवाडी यांनी कर्मचाऱ्यांना नव्याने सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जुन्या काही नव्या कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्त्या देण्यात येणार आहेत. यासाठी काही प्रमाणात जुन्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचा प्रयत्न आहे.

मालमत्ता विकण्याची गरज नाही
कर्मचारी अन्य देणी देण्यासाठी मालमत्ता विकण्याचा पर्याय पूर्वी समोर आला होता. मालमत्ता विकण्याची गरज नसल्याचे नाईकवाडी यांनी सांगितले. संघाच्या महामार्गालगत असलेल्या २२ गुंठे जागेवर पुढे व्यापारी संकुल बांधण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

वीज सुरू करणार
सध्या सुमारे सात लाख रुपये वीजबील थकले आहे. यामुळे वीजपुरवठा तोडण्यात आला आहे. आता तातडीने रक्कम उभी करून वीज बिल भरणा करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सध्या महानंदकडे संघाचे ६५ लाखांचे भाग आहेत.

एनडीडीपीकडे प्रस्ताव
यंत्रांची दुरुस्ती करावी लागणार आहे. यासाठी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट प्लांट या संस्थेकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. आता हा प्रस्ताव विशेष बाब म्हणून मान्य करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. प्रस्ताव मान्य झाल्यास संघाला मोठा फायदा होणार आहे. मात्र, संघ बंद असल्यामुळे अडचणी येऊ शकतात.

अात्महत्यांवर अंकुश
^दूध उत्पादन असलेल्या जिल्ह्यात आत्महत्या होत नाहीत. उस्मानाबादमध्येही उत्पादन आहे. मात्र,आधार नाही. यामुळे संघ सक्षमतेची गरज आहे. उत्पादकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. -सच्चिदानंदना ईकवाडी.
बातम्या आणखी आहेत...