आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरोरी मध्यम प्रकल्पातील लाखो लिटर पाणी वाहतेय कर्नाटकात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरगा - उमरगातालुक्यातील तुरोरी मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यातील दारांच्या खालून लाखो लिटर पाणी वाहून कर्नाटकात जात आहे. दरवाज्याखाली पॅकिंग सेट बसविल्याचा फटका परिसरातील गावांना बसणार असल्याचे समजते.
यंदा हा प्रकल्प ७२ टक्के भरला आहे. परंतु संपूर्ण पाणी वाहून गेल्यानंतर ही त्रुटी दूर करता येणार असल्याने संपूर्ण प्रकल्प काही दिवसांमध्ये रिकामा होण्याचे दुर्दैव ऐन दुष्काळात ओढवले आहे.

मागील तीन वर्षांत घागरभर पाण्यासाठी ग्रामस्थांचे प्राण कंठाशी आलेले असताना वरुणराजा बरसत पाटबंधारे विभागाच्या फाटक्या झोळीमुळे अनेक गावांना पुन्हा पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येणार आहे. उस्मानाबाद पाटबंधारे उपविभाग क्रमांक अंतर्गत येणाऱ्या तुरोरी मध्यम प्रकल्पातील लाखो लिटर पाणी कर्नाटकात पोहोचत आहे. गलेलठ्ठ वेतन घेऊनही कर्तव्यात उदासीनता बाळगणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या घास हिरावला जाण्याची स्थिती उद्भवली आहे. प्रकल्पातून तुरोरी, आष्टा(ज.), उमरगा शहर, दाबका आदी गावांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जाते. या गावांमधील शेकडो शेतकरी शेतीसाठी पाणी वापरतात. मागील चार वर्षांपासून दुष्काळामुळे प्रकल्पात पाणीसाठा नव्हता. परंतु यावर्षी तालुक्यात सर्वत्र मोठा दमदार पाऊस झाल्याने सर्वच प्रकल्प, धरणे भरली आहेत. मात्र, तुरोरी मध्यम प्रकल्प भरलेलाच नाही. प्रकल्प पूर्ण भरल्यास अतिरिक्त पाणी जाण्यासाठी सांडवा बांधण्यात आला आहे. या लोखंडी पुलाच्या सांडव्यास लोखंडी दार आहेत. प्रकल्पातून पाणी भरून वाहत असल्यास सांडव्याची दारे उघडून येथील अतिरिक्त पाणी वाहून जाते. मात्र, या सांडव्याच्या दाराखालून रबरी सील पॅकिंग सेट नसल्याने येथून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. येथील पाणी वाहून गुरूवाडी, बेन्नीतुरा नदीतून मळगीवाडी ते दगडधानोऱ्यापर्यंत जाते. दगडधानोऱ्याचे धरण भरलेले असल्याने सरळ कर्नाटकातील शिरगुर, नंदगुरमार्गे पुढील गावांना हे पाणी पोहचते. मागील चार दिवसांपासून प्रकल्पातून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.

५.९ एमएमक्यूब पाणी :प्रकल्पाची क्षमता ७.६६४ एमएमक्यूब आहे. मृत पाणीसाठ्याचा स्तर १.४६४ एमएमक्यूब तर उपयुक्त पाणीसाठा क्षमता ६.२०० एमएमक्यूब आहे. प्रकल्पात ५.९४० एमएमक्यूब पाणीसाठा म्हणजेच प्रकल्प सध्या ७३ टक्के भरला आहे. पाटबंधारे विभागाच्या गलथानपणामुळे ही टक्केवारी घसरत आहे.

गावकऱ्यांच्या अडचणी वाढणार
^तुरोरी मध्यमप्रकल्पाच्या सांडव्यातून दररोज लाखो लिटर पाणी वाहत जात आहे. या पाण्याचा उपयोग अनेक गावांना होतो. ऐन दुष्काळात पाणी वाहून जात असल्याने मध्यम प्रकल्पातील जलसाठा लवकरच कमी होण्याचा धोका आहे. -रज्जाक कादरी, उपसरपंच, दाबका.

रबरीसील मिळाल्याने त्रुटी
^मागील सहावर्षानंतर पहिल्यांदाच सांडव्यातून पाणी वाहत आहे. रबरी सील मिळाल्याने त्रुटी दूर करता आली नाही. पाणी कमी झाल्यानंतरच ही दुरुस्ती करता येणार आहे. -एस.एम. पवार, शाखाधिकारी, उपविभाग.

निसर्गाचे दान वाया
शासन जलसंधारणासाठी कोट्यवधी खर्च करत असताना बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे निसर्गाने दिलेले दान वाया जात आहे. पावसाळ्याच्या तोंडावर सर्वत्र जलसाठ्यातील त्रुटी दूर केल्या जातात. येथे दुर्लक्ष का करण्यात आले, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यावर कठाेर कारवाईची गरज व्यक्त होत आहे.

जलसाठ्याची नासाडी
प्रकल्पात ७२ टक्के पाणीसाठा असून दररोज टक्केवारी घसरत आहे. दरवाज्यांना पॅकिंग किट बसवणे आता अशक्य आहे. सर्व पाणी वाहून जाण्याची प्रतीक्षा करावी लागेल. परिणामी यावर्षी हा मध्यम प्रकल्प लवकरच कोरडाठाक पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...