आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन पोलिस पत्नींची आत्महत्या; माहेरून पैसे आणण्यासाठी केलेल्या छळामूळे दुर्दैवी प्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- कवितानगर पोलिस वसाहत आणि पोलिस मुख्यालय या दोन ठिकाणी 1 मे राेजी दोन वेगवेगळ्या घटनेत दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी आत्महत्या केली. माहेरून पैसे आणण्यासाठी केलेल्या जाचहाटामुळे हे दुर्दैवी प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनांची नोंद जेलरोड पोलिस ठाण्यात झाली आहे. 

पहिल्या घटनेत चारुशीला विनोद बंगाळे (वय ३८, रा. पोलिस मुख्यालय पोलिस वसाहत) यांनी 1 मे रोजी पेटवून घेऊन आत्महत्या केली. त्यांना सासरच्या लोकांकडून वारंवार पैशाची मागणी होत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यासंदर्भात मृताच्या आई लक्ष्मी यांनी फिर्याद दिली आहे. 

चारुशीला यांना सासऱ्याच्या एका शस्त्रक्रियेसाठी ३० हजार रुपये घेऊन ये, असे म्हणत अनेकवेळा पती, जाऊ अर्चना शरद बंगाळे यांच्याकडून त्रास होत होता. चारुशीला यांचा विवाह २००५ मध्ये झाला असून, त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे. तसेच २७ एप्रिल २०१७ रोजी चारुशीला यांनी पती विनोद बंगाळे हे दारू पिऊन येऊन त्रास देत आहेत, अशी तक्रार केली होती. त्यावरून फौजदार चावडी पोलिसांत पतीविरुद्ध गुन्हाही नोंदवला होता. परंतु अखेर त्यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी पती विनोद जाऊ अर्चना यांना अटक करण्यात आली आहे. विनोद हे मुंबई जीआरपी, कुर्ला येथे कार्यरत आहेत. 

दुसऱ्या घटनेत विजयालक्ष्मी शिवप्पा बिराजदार (वय २१, रा. कविता नगर पोलिस वसाहत) यांनी 1 मे रोजी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्यांना वारंवार पाच लाख रुपयांची मागणी होत होती, असे त्यांच्या माहेरच्यांचे म्हणणे आहे. तसेच २४ तास उलटून गेले तरी अजून या घटनेचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. जेलरोड पोलिस ठाण्यात मृत विजयालक्ष्मी यांचे वडील श्रीशैल बिरादार (रा. करजगी, ता. जत, जिल्हा सांगली) अन्य नातेवाईक सासरच्यांवर खुनाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करत होते. विजयालक्ष्मी यांचे पती सोलापूर ग्रामीण मुख्यालय येथे कार्यरत आहेत. 

मृताचे हात बांधलेल्या अवस्थेत? 
कवितानगर पोलिस वसाहतीत घडलेल्या घटनेत मृत विजयालक्ष्मी यांचे दोन्ही हात कापडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याची चर्चा आहे. यावरून ही आत्महत्या की खून? हा प्रश्न या वेळी जमलेल्यांतून उपस्थित होत होता. 
बातम्या आणखी आहेत...