आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात दोन हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त, पाच जणांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरात अमली पदार्थ विक्री करण्यासाठी एक टोळी येणार असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दोघांना गेल्या मंगळवारी ठाण्यात पकडले होते. त्याचे धागेदोरे सोलापूरपर्यंत पोहोचले अाहेत. चिंचोली-एमअायडीसी येथील अॅवान लाइफ सायन्सेस लिमिटेड (ता. मोहोळ, जिल्हा सोलापूर) या कंपनीत शनिवारी ठाणे व सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पाहणी केल्यानंतर सुमारे १८ हजार ६२७ किलो अमली पदार्थ अाढळले. त्याचे बाजारमूल्य दोन हजार कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. इफेड्रिन व सुडो इफेड्रिन पावडर साठा करून कंपनीच्या बाजूच्या खोलीत ठेवले होते. आतापर्यंत पाच लोकांना या प्रकरणी अटक करण्‍यात आली आहे. कंपनीच्‍या मॅनेजरचेही यामध्‍ये नाव आहे.

असे उघडकीस अाले प्रकरण : ठाणे पोलिसांना १२ एप्रिल रोजी याबाबत मिळाली होती. त्यानुसार घाणेकर नाट्यगृहाजवळ सापळा रचून संशयित एक कारला थांबवून चौकशी केल्यानंतर त्यात तीन किलो इफेड्रिन अमली पदार्थ सापडले. या वेळी सागर पोवळे (रा. कराडे खुर्द, ता. पनवेल, रायगड), मयूर मुखदरे (रा. मोहपाडा, ता. खालापूर, रायगड) यांना अटक करण्यात अाली. चौकशीत हा मुद्देमाल सोलापुरातील स्वामी याने विक्री केल्याचे समोर अाले. रायगड, रसायनी, सोलापूर शहरात तपासासाठी पथके नेमण्यात अाली. त्यानुसार एका पथकाने सोलापुरातील उमानगरीत राहणाऱ्या धानेश्वर राजाराम स्वामी याला अटक केली. त्याच्याजवळ साडेपाच किलो पावडर सापडली अाहे. त्याने चिंचोली येथील एव्हाॅन कंपनीत अमली पदार्थाचा मोठा साठा असल्याचे सांगितले. या ठिकाणी पाहणी केल्यानंतर साठा सापडला. कंपनी व्यवस्थापक राजेंद्र डिमरी (रा. सोलापूर) यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले अाहे. त्याच्या केबिनमध्ये ७ किलो ६०० ग्रॅम पावडर सापडली. स्वामी व डिमरी यांच्या चौकशीत कंपनीच्या बाजूच्या शेडमध्ये ९५०० किलो (साडेनऊ टन) पावडर सापडली. नार्कोटिक्स विभाग व अन्य विभागाची परवानगी न घेता ही पावडर साठवून ठेवल्याचे समोर अाले. याशिवाय ५७१ किलो इफेड्रिन व अमली पदार्थ व ८५४१ किलो सुडो इफेड्रिन पावडर सापडली. तपासासाठी हे गोडाऊन सील करण्यात अाले अाहे.

आज घेणार नमुने
मोहोळ येथील अॅवान कंपनीमध्ये जप्त एफडीएनचे नमुने रविवारी घेण्यात येणार आहेत. औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त एस. एस. जवंजाळ रजेवर असल्याने औषध निरीक्षक भाग्यश्री यादव यांनी शनिवारी कंपनीला भेट दिली. मात्र, कंपनी व एफडीएन ठेवलेला परिसर पोलिसांनी सील केल्याने नमुने घेता आले नाहीत. कंपनीने मार्चमध्ये दिलेल्या अहवालानुसार ६३४ किलो एफडीएनचा साठा असल्याचे कळवले हाेते. पोलिसांनी अमली पदार्थाचा साठा असल्याचे स्पष्ट केले असले तरी ते अमली आहे की नाही? हे तपासावे लागणार आहे. त्यासाठी रविवारी एफडीएनचे नमुने घेण्यात येतील. कंपनीकडे औषध प्रशासनाचा परवाना असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अांतरराष्ट्रीय रॅकेट ?
मुंबई-गुजरातमध्ये काही दिवसांपूर्वी सव्वा टन इफेड्रिनचा साठा पकडण्यात अाला. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर इफेड्रिन मिळाल्याने गुजरात एटीसने ठाणे पोलिसांशी संपर्क केला. दोन्ही राज्यात काही कनेक्शन अाहे, का याची चौकशी सुरू अाहे. मेथ तयार करण्यासाठी इफेड्रिनचा वापर करण्यात येतो. याची तस्करी युरोपात केली जाते. पोलंडमध्येही हा माल पाठवला जात असल्याची माहिती ठाणे पोलिस अायुक्त परमबीर सिंग यांनी शनिवारी दिली. इफेड्रिन हे कोकेनमध्ये मिसळून घेतले जाते. तसेच अाइस्क्रीम, ज्यूस अाणि थंड पेयात मिसळून घेतले जात असल्याचेही ते म्हणाले. अातापर्यंत नाजेरियन तरुणासह पाचजणांना याप्रकरणी अटक झाली अाहे.
पुढे पाहा, संबंधित फोटो..