आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘उद्योगवर्धिनी’ने सेवाक्षेत्राद्वारे घडवले सामाजिक परिवर्तन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आज समाजात संघटितपणे काम करणे अनेकांना अवघड वाटते. मात्र उद्योगवर्धिनीने सेवा क्षेत्रात काम करून सामाजिक परिवर्तन घडवून आणले अाहे. त्यामुळे ते सेवा क्षेत्रात आदर्श ठरतात. समाजात घेण्याची वृत्ती बळावली असताना सुद्धा उद्योगवर्धिनीने आपल्या कामाच्या जोरावर समाजावर देण्याचे संस्कार रुजवले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश जोशी (भय्याजी) यांनी केले.

उद्योगवर्धिनी तपपूर्ती साेहळ्यानिमित्त मंगळवारी हुतात्मा स्मृती मंदिरात प्रकट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुरेश जोशी यांची विशेष उपस्थिती होती. व्यासपीठावर उद्योगवर्धिनीच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान, अपर्णा रामतीर्थकर, शुभांगी बुवा, संध्या राजोपाध्याय, वर्षा विभूते, शोभा श्रीवास्तव आदी संचालिका उपस्थित होत्या.

भय्याजी जोशी म्हणाले, ‘उद्योगवर्धिनीचे काम गेल्या १२ वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. हे खूप चांगले आहे. सातत्याने सुरू असलेल्या कामांवर समाजाचा लवकर विश्वास बसत नाही. आज काही जण सामाजिक काम हे व्यवसाय म्हणून करतात. पण सामाजिक काम हे व्यवसाय म्हणून नाही तर श्रद्धेने करणे गरजेचे आहे. उद्योगवर्धिनी सचोटीने काम करीत राहिली. त्यामुळे ती लोकांच्या हृदयात अंतःकरणात आपले स्थान निर्माण करू शकली.

श्री. जोशी म्हणाले, ‘उद्योगवर्धिनीने स्वावलंबनाचा मार्ग अवलंबून सेवेची भावना जपली. त्यामुळे १२ वर्षांपूर्वीच्या पाऊलवाटेचे रुपांतर महामार्गात झाले आहे. समाजात अनेक प्रश्न आहेत. पण त्यावर उत्तर शोधण्याचे काम खूप कमी लोकांकडून होते. उद्योगवर्धिनीने अशा उत्तरांचा शोध घेतला आहे.’ चंद्रिका चौहान यांनी प्रास्ताविक केले. अपर्णा रामतीर्थकर यांनी सूत्रसंचालन केले. शुभांगी बुवा यांनी आभार मानले.

स्वार्थ नाही म्हणून अनर्थ नाही
आर्थिक क्षेत्रात काम करताना परस्परांमध्ये विश्वासाचे मदतीचे वातावरण असणे गरजेचे आहे. संपन्नतेकरिता निर्माण होणारे बचत गट आज समाजात खूप आहेत. पण जे संपन्नेकरिता तयार होतात ते लवकर लयाला जातात. उद्योगवर्धिनीमध्ये मात्र तसे वातावरण नाही. येथे स्वार्थच नाही म्हणून काही अनर्थ नाही. अन्यथा जिथे विश्वासाचे वातावरण नसते त्या ठिकाणी अनर्थ घडतो, असेही श्री. जोशी यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...