आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजनी जलवाहिनीच्या पाणी चोरांवर धाड, १४ जणांवर गुन्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरातकमालीची पाणीटंचाई असताना उजनी ते सोलापूर दरम्यानच्या मनपा जलवाहिनीतील पाण्याची मोठी चोरी महापालिका अधिकारी भाजपच्या नगरसेवकांनी उघडकीला आणली. याप्रकरणी टेंभुर्णी आणि मोहोळ पोलिस ठाण्यात महापालिकेकडून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मनपा कर्मचाऱ्यांसह चौदा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वे बॅक कंपनीचा माजी कर्मचारी गणेश माने मनपाचा फिटर अनिल कापसे यास पोलिसांनी अटक केली.

मागील तीन दिवसांपासून भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, नगरसेवक संजय कोळी, राजू पाटील यांनी अनधिकृत जोड शोधण्याची मोहीमच उघडली होती. महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांना पाणी चोरी प्रकरण निदर्शनास आणून दिले. त्यानुसार बुधवारी पाण्याची चोरी शोधण्यासाठी पालिकेचे पथक मोहिमेवर होते. उजनी पाइपलाइनवर १२ ठिकाणी १७ जोड होते. दोन शेततळी मनपाच्या पाण्यातून भरून शेती फुलवली जात होती. या सर्व गोष्टींचा बुधवारी पर्दाफाश करण्यात यश आले.

सोलापूर. उजनी ते सोलापूर ही पाइपलाइन फोडून पाणी चोरणाऱ्यांवर महापालिका अधिकाऱ्यांनी बुधवारी कारवाई केली. जमिनीत पुरलेले पाइप फोडून पाणी चोरले जात होते. जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदल्यानंतर या ठिकाणी चोरीचे कनेक्शन आढळले. पाइप काढल्यानंतर पाण्याचे फवारे उडाले.

दररोज १० ते १२ एमएलडी पाण्याची चोरी
मनपाच्या १२०० एमएम जलवाहिनीस छिद्र पाडून तीन ते चार इंची पाइपलाइन जमिनीखालून घेऊन शेतीसाठी काही शेतकरी पाणी वापरत होते. यासाठी खासगी आणि मनपा कर्मचाऱ्यांस मासिक हप्ते देण्यात येत होते. ही सर्व बाब चौकशीत समोर आली.
महापालिकेचे २५० कर्मचारी, ३० पोलिस कर्मचारी, महसूल विभागचे सहा कर्मचारी, खासगी पंच, वाहने असा लवाजमा मोहोळ ते टेंभुर्णी दरम्यानच्या पाणी चोरीचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत घेत होते.
१२ ठिकाणी १७ अनधिकृत जोड मिळून आले. त्यातून रोज १० ते १२ एमएलडी पाणी चोरीला होत होते. चोरीस गेलेले पाणी शहराच्या १५ टक्के भागास पुरेल इतके होते. पाण्याची चोरी महापालिकेने पकडली. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ही मोहीम गुरुवारी सुरू राहणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
लक्ष्मण खंडू पाटील, श्रीहरी शंकर पाटील, तुकाराम रामकृष्ण सावंत, समाधान सौदागर सावंत, यशवंत साहेबराव सावंत, शामराव राजाराम रणदिवे, निवृत्ती पाटील, तात्यासाहेब शिंदे, शशिकला महेश पवार, तात्यासाहेब मच्छिंद्र रणदिवे, हरीदास गोवर्धन सुर्वे (सर्वजण रा. अरण, ता. माढा), अशोक महादेव वाघज (रा. शेटफळ) यांच्यासह किसन शामराव कापसे गणेश नागनाथ माने (रा. सोलापूर) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. टेंभुर्णी पोलिसात कलम ३७९, ४०९, ४२७, ४३० पाटबंधारे कायदा कलम १२० ९२,९३,९४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. किसन कापसे गणेश माने (रा. सोलापूर) यांना अटक करण्यात आली.