आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिप्परग्यात उजनी धरणाचे पाणी आणण्याचा विचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उजनीचे पाणी कारंबा येथील कॅनॉलमध्ये आल्यास तेथून लिफ्टिंग करून हिप्परगा तलावात साठवण करता येईल काय? याची चाचपणी पालिका करीत अाहे. शहरास रोज पाणीपुरवठा करता येईल यासाठी हिप्परगा आणि औज बंधाऱ्याची महापौर सुशीला अाबुटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. कारंबा वितरिकेतून हिप्परगा येथे पाणी लिफ्ट करण्याबाबत महापालिका अधिकारी हे सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. पदाधिकारी बुधवारी उजनी धरणाची पाहणी करणार अाहेत. हिप्परगा तलाव कोरडा ठणठणीत होता. मागील पंधरा दिवसांतील पावसामुळे टक्के पाणीसाठा झाला. सध्या शहराला तेथून सुमारे तीन ते पाच एमएलडी पाणी उपलब्ध होऊ शकते. उजनीतून कालव्याद्वारे कारंबा येथे पाणी येईल, तेथून पंपिंग करून हिप्परगा तलावात पाणी उपलब्ध होईल काय? याची चाचपणी सुरू अाहे. सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेऊन तांत्रिक माहिती घेणार असल्याचे मनपा सार्वजनिक आरोग्य अभियंता मुकुंद भालेराव यांनी सांगितले.

औज बंधारा ओव्हर फ्लो
औज बंधारा भरून वाहत असून, चिंचपूर बंधारा भरला आहे. त्यामुळे तेथील पाणी कर्नाटकात जात आहे. औज बंधारा भरल्याचे पाहून महापौर आबुटे यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी उपमहापौर प्रवीण डोंगरे, सभागृह नेते संजय हेमगड्डी, नगरसेवक पद्माकर काळे, बाबा मिस्त्री, मनपा सार्वजनिक आरोग्य अभियंता मुकुंद भालेराव, उपअभियंता संजय धनशेट्टी आदी उपस्थित होते.

एक दिवसाआड पाणीपुरवठा शक्य
हिप्परगा तलावातील पालिकेच्या जॅकवेलला पाच ते सहा फूट पाणी आहे. उजनीत २५ फूट पाण्याची पातळी आहे. औज बंधारा ओव्हरफ्लो होत आहे. त्यामुळे तीन स्त्रोताच्या ठिकाणी पुरेसा पाणीसाठा असल्याने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य अाहे, असे महापौर आबुटे म्हणाल्या.

अमृत योजनेस मंजुरी
पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी वितरण व्यवस्थेत त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनांतर्गत ८१ कोटी रुपये मंजूर झाले. सोमवारी राज्य सरकारने योजनेस मंजुरी दिल्याची माहिती महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...