आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हा परिषद सदस्य उमाकांत राठोड यांच्यावर मुळेगाव तांड्यात अंत्यसंस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण सोलापूर - काँग्रेसनेते तथा जिल्हा परिषद सदस्य उमाकांत किसन राठोड (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी रात्री दीड वाजता निधन झाले. त्यांच्या गावी मुळेगाव तांडा येथील त्यांच्या शेतात दुपारी तीन वाजता हजारोंच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राठोड यांच्यामागे आई केसरबाई, तीन भाऊ, मुलगा विजय, सचिन राहुल, दोन विवाहित मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
कै. राठोड यांचा जून १९६४ रोजी जन्म झाला. त्यांनी भटक्या जाती, जमातींसह बहुजन समाजासाठी काम सुरू केले. पुढे माजी मंत्री दी. शि. कमळे गुरुजी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आनंदराव देवकते यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे काम सुरू केले. निष्ठावान तडीतापड्यांसाठी झटणारा नेता अशी त्यांची तालुक्यात वेगळी आेळख होती.
उजनीचे पाणी ४६ गावांना मिळावे, वडापूर धरण यासाठी त्यांचा शेवटपर्यंत लढा सुरू होता. ते मुळेगाव मुळेगाव तांड्याचे २५ वर्षे सरपंच होते. दोनवेळा विक्रमी मतांनी बोरामणी गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले. एक अभ्यासू नेता अशी त्यांची छाप होती. पंचायत समितीचे सभापतिपदही त्यांनी भूषवले होते. याशिवाय काँग्रेसचे दहा वर्षे तालुकाध्यक्ष, जिल्हा खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते.
अंत्यसंस्कारावेळी माजी मंत्री आनंदराव देवकते, आमदार सिध्दाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, शिवशरण पाटील, निर्मला ठोकळ, जिल्हा परिषद सदस्य सुरेश हसापुरे, कृषी सभापती अप्पाराव कोरे, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके, सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत जाधव, कॉ. रा. गो. म्हेत्रस यांच्यासह दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावचे लोक उपस्थित होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी राठोड यांना आदरांजली वाहिली.

माझा भाऊ गेला
^उमाकांत मी ३० वर्षे राजकारणात होतो. लहान भावासारखा तो सतत माझ्या पाठीशी उभारला. त्यामुळेच मी आमदार, मंत्री झालो. त्यांच्या निधनाने तडीतापडीच्या नेत्याला तालुका मुकला. काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता हरपला.'' आनंदराव देवकते, माजी मंत्री

मुळेगाव तांड्यावर चूल नाही पेटली
राठोड यांच्या निधनामुळे तांड्यावरील महिला पुरुष धायमोकलून रडत होते. बंजारा समाजाचा वाली गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यांचे अंतिम दर्शन घेताना शाळकरी मुलांसह अनेकांना अश्रू अनावर झाले. बुधवारी दीड हजार लोकसंख्येच्या तांड्यावर एकाही घरात चूल पेटली नाही.

काँग्रेसचे नुकसान झाले
^उमाकांत राठोडहे बंजारा, तडीतापडी समाजाचे नेते होते. काँग्रेस पक्षाचा एक खंबीर नेता आज आम्ही गमावला. त्यांच्या निधनाने काँग्रेसचे नुकसान झाले.'' सिद्धाराम म्हेत्रे, आमदार

गरिबांसाठी झटणारा नेता
^उमाकांत राठोड हे दीनदलितांसाठी झटणारे नेते होते. शेवटपर्यंत त्यांनी काँग्रेसची साथ सोडली नाही. निष्ठावान नेता कसा असावा, याचे ते उत्तम उदाहरण होते. गरिबांचा नेता आज हरपला.'' दिलीप माने, माजी आमदार
बातम्या आणखी आहेत...