आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारिस पठाण कारवाईत काँग्रेसची भूमिका चुकीची, खासदार हुसेन दलवाई यांच्याकडून घरचा आहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - 'भारत माता की जय' वरून एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांच्यावर जी कारवाई झाली ती चुकीची आहे. ही कारवाई नियमाने झाली नाही. विशेष म्हणजे ही कारवाई एकमताने करून कॉँग्रेसकडूनही चूक झाली आहे, असे स्पष्ट मत व्यक्त करून कॉँग्रेसचे ज्येष्ठ खासदार हुसेन दलवाई यांनी कॉँग्रेस पक्षाला घरचा आहेर दिला.

दलवाई रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम' म्हणण्यात गैर काही नाही.'भारत माता की जय' म्हणणाराच देशभक्त आहे, ते म्हणायलाच पाहिजे, अशी जबरदस्ती करणे चुकीचे आहे. तसेच, भारत माता की जय म्हणण्यावरून विधानसभेत आमदार वारिस पठाण यांच्यावर जी कारवाई झाली ती नियमानुसार झाली नाही असेही ते म्हणाले.
मुस्लिमांनी हिंदू बांधवांवर विश्वास ठेवावा
भारत देशात काही मूठभर लोक समाजात तेढ निर्माण करत आहेत. त्यासाठी मुस्लिमांनी हिंदू बांधवांवर विश्वास ठेवावा. भावना भडकवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी मुस्लिमांनी संयम ठेवावा, राग अनावर होऊ देऊ नये. शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुण्यात मोहसीन शेखच्या मृत्यूवेळी संभाजी आरमार आणि मराठा सेवा संघ यांनी खुप चांगले कार्य केले.

आरएसएसची घुसखोरी
दाभाेलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या खुनाचा तपास अद्याप पूर्ण झाला नाही. कारण प्रशासनात सर्वत्र मोठ्या प्रमाणात आरएसएसने घुसखोरी केली आहे. याकरिता सर्व पक्षांनी एकत्र येऊन कणखर भूमिका घेणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनी आपली जनावरे वर्षा बंगल्यावर सोडावीत
गोवंशहत्या कायद्याबद्दल बोलताना ते म्हणाले, हा कायदा भाजपने करायला नको होता. यामुळे शेतकऱ्यांसह अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. आज दुष्काळामुळे शेतकरी आपली जनावरे जंगलात सोडत आहेत. शेतकऱ्यांनी आपली जनावरे मुख्यमंतत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आणून सोडावीत, असे मत श्री. दलवाई यांनी व्यक्त केले.
फक्त घोषणाबाज सरकार
भाजप सरकार फक्त घोषणाच करत आहे. योजनांची अंमलबजावणी नाहीच. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. मेक इन इंडिया फक्त नावालाच.फक्त घोषणा करून भाजप सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. दलित, आदिवासींच्या विकासासाठी कमी निधींची तरतूद तर मुस्लिमांच्या विकासासाठी गेल्यावेळीपेक्षा यंदा चाळीस टक्के निधी कमी ठेवण्यात आला आहे.