आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन कायदा: विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अाता मतदानाने निवडणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- नवीन विद्यापीठ कायद्यानुसार सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेचे (सिनेट) १०० सदस्य यंदा पहिल्यांदाच मतदानाने निवडले जाणार आहेत. त्याची सुरुवात पदवीधर मतदारसंघातून सदस्य निवडीने होणार अाहे. येत्या ३० जूनपर्यंत पदवीधर मतदारसंघात नाव नोंदणीची मुदत आहे. त्यामुळे अाता महाविद्यालयांच्या निवडणुकांचाही मार्ग मोकळा झाला अाहे. त्यासाठी वेगळ्या अधिसूचनेची प्रतीक्षा अाहे.
 
सोलापूर विद्यापीठात गेल्या दोन वर्षांपासून अधिसभा सभागृहात फक्त विद्यापीठ अधिकारी आणि नियुक्त सदस्यच पदावर कार्यरत होते. आता येत्या शैक्षणिक वर्षात लोकशाही प्रक्रियेद्वारे येणारे सदस्य कामकाजात सहभागी होतील विद्यापीठाला धोरणात्मक दिशाही देतील. तत्पूर्वी विविध प्राध्यापक, पदवीधर, संस्था आदी गटातून राजकीय मोर्चेबांधणीही सुरू होईल. 

नवीन कायद्यानुसारविद्यापीठ अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाविद्यालयीन निवडणुकाबाबतची अधिसूचनाही लवकरच जारी हाेईल. त्यानुसार निवडणूक प्रक्रिया होईल. 
- डॉ.सतीश देशपांडे, उच्च शिक्षण सहसंचालक, सोलापूर 

पदवीधर मतदारयादीसाठी विहित अर्ज शुल्कासह नोंदणी करणे आवश्यक आहे, यासाठीच्या सूचना विद्यापीठ संकेतस्थळावर देण्यात आल्या आहे. 
- पी.प्रभाकर, प्रभारी कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ 

संकेतस्थळावर असेल निवडणूक पोर्टल 
विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर निवडणूक पोर्टल तयार करून विद्यापीठाची विविध प्राधिकरणे, मंडळे यांच्या निवडणूक संदर्भातील सर्व अधिसूचना, सूचना, मतदार यादी इतर माहिती प्रदर्शित करण्याची सूचना उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठांना दिली आहे. विद्यापीठ निवडणुकीचे वेळापत्रक कुलसचिव तयार करतील. त्यास कुलगुरूंची मान्यता घेतील. कुलसचिव प्रत्येक निवडणुकीचा निकाल घोषित करतील आदी अधिकार देण्यात आले आहेत. 

चुका लेखी कळवणे आहे आवश्यक 
निवडणुकीच्या ४५ दिवस आधी पात्र मतदार यादी घोषित करणे आवश्यक आहे. मतदार यादी घोषित केल्यानंतर पाच दिवसांच्या अवधीत त्यातील चुकीच्या नोंदीबाबत कुलसचिवांना लेखी कळवणे आवश्यक आहे. कुलसचिव मतदार यादी दुरुस्त करू शकतील. वाद असतील तर कुलगुरूंच्या मान्यतेने कुलसचिव या चुकांची दुरुस्ती करतील. यानंतर अंतिम मतदार यादी घोषित होईल. 

कुलसचिवांचे आवाहन 
ज्या पदवीधरांनी २०१० च्या निवडणुकीसाठी नोंदणीकृत पदवीधर मतदार यादीत नाव नोंदवलेले आहे, त्यांनी आपले नाव विद्यापीठाच्या मतदार यादीत असल्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन कुलसचिवांनी परिपत्रकाद्वारे केले आहे. 

सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात विविध संस्था, प्राचार्य, लोकप्रतिनिधी असे एकूण १०० सदस्य असतात. पदवीधर मतदारसंघातून १० सदस्य निवडले जातात. नव्या विद्यापीठ कायद्यानुसार यातील दोन सदस्यांची थेट व्यवस्थापन परिषदेवर नामनिर्देशनाद्वारे नियुक्ती होणार आहे. म्हणून पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चुरस महत्त्व असणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...