आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद:घातपाताच्या संशयाने सरणावरील मृतदेह नेला शवविच्छेदनाला..!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आल्याने उस्मानाबाद ग्रामीण पोलिसांनी सरणावर ठेवलेला मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केल्याची घटना बुधवारी (दि.२६) दुपारी वरवंटी (ता. उस्मानाबाद) येथे घडली. या प्रकरणामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून या प्रकरणात काही घातपात झाला आहे का, हे मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.  
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वरवंटी येथील भगीरथ बाबूराव सगर (४८) यांना दोन ते तीन दिवसांपूर्वी उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. वादावादीतून मारहाण झाल्याने त्यांना उपचारासाठी दाखल केल्याचीही चर्चा आहे. तसेच मनोरुग्ण असल्याने त्यांना उपचारासाठी सतत सोलापूरला नेले जात असल्याचेही काहींनी सांगितले. त्यातच उपचारादरम्यान त्यांचे मंगळवारी (दि.२५) रात्री उशिरा निधन झाले. निधनानंतर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन न करताच भगीरथ सगर यांचा मृतदेह बुधवारी (दि.२६) सकाळी त्यांच्या वरवंटी या गावी आणण्यात येऊन अंत्यविधीची तयारी करण्यात आली. दरम्यान, गावात थोडी कुजबुज सुरू झाल्याने याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यांनी तातडीने वरवंटी गाव गाठले. मात्र, तोपर्यंत भगीरथ सगर यांचा मृतदेह स्मशानभूमीत नेऊन सरणावर ठेवण्यात आला हाेता. अंत्यसंस्कार करण्याची अंतिम तयारी सुरू असताना दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ग्रामीण पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी याबाबत विचारणा करून शवविच्छेदन झाल्याशिवाय अंत्यविधी करता येणार नाही, असे सांगून मृतदेह प्रवासी वाहतुकीच्या मॅजिकमधून उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला. शवविच्छेदन करून दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला.
 
अहवालानंतरच मृत्यूचे कारण कळणार  
- वरवंटी येथील एका व्यक्तीला मारहाण झाल्याने त्याला सोलापूरला उपचारासाठी दाखल केल्यावर त्याचा मृत्यू झाल्याची तसेच तेथे शवविच्छेदन न करता मृतदेह तसाच आणून अंत्यविधी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यात आले. मृत्यूचे कारण अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.   
संभाजी पवार, सहायक पोलिस निरीक्षक.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
 
बातम्या आणखी आहेत...