आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयाच्या कारभारात गैरव्यवहार; सीएसवर चौकशी समितीचा ठपका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - जिल्हाशासकीय रुग्णालयात सुरू असलेल्या विविध गैरप्रकारासह अनियमिततेबाबत दैनिक ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेऊन याप्रकरणांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक एकनाथ माले यांच्या कारभारावर अनेक ठपके ठेवण्यात येऊन मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे अहवालात नमूद केल्याने याप्रकरणी काय कारवाई होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. 
 
उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात अनियमितता होत होती. तसेच रुग्णांचीही रुग्णालयातील भोंगळ कारभारामुळे हेळसांड होत होती. रुग्णालयात साठा असतानाही अनेक औषधी बाहेरून खरेदीसाठी पाठवले जात होते, शस्त्रक्रियेचे रॉड, साहित्यही सर्वसामान्य रुग्णांना बाहेरूनच खरेदी करावे लागत होते. याबाबत दैनिक ‘दिव्य मराठी’ने दि. ११ डिसेंबर २०१६ रोजी “साहित्याचा बाजार, नियोजित ठिकाणातूनच खरेदीची सक्ती’ या मथळ्याखाली तसेच तत्पूर्वी रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांना घ्यावी लागतात बाहेरून औषधे या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करून सिव्हिलमध्ये सर्वसामान्यांची होत असलेली लूट समोर आणली होती. या प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल घेऊन दि. १३ जानेवारी २०१७ रोजी सहसंचालक इंद्रजित गोरे सहायक संचालक वैद्यकीय डॉ. एच. आर. बोरसे यांनी उस्मानाबादेत येऊन बातमीच्या अनुषंगाने सर्व मुद्द्यांची प्रत्यक्षात पडताळणी केली होती. यामध्ये किरायाने लावण्यात आलेल्या वाहनांचे बिल अदा करताना अडवणूक केल्याचे तसेच यापूर्वीच्या शल्यचिकित्सकांनी वाहनांची बिले ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून अदा करण्याचे आदेश काढलेले असताना एकनाथ माले यांनी सदरील अधिकार कोणत्या कारणास्तव पुन्हा स्वत:कडे घेतले याबाबत संशय व्यक्त केला आहे. त्याचबरोबर यापूर्वी सुटीदिवशी वाहने वापरल्यास त्याचे बिल अदा झालेले असताना नंतरच्या काळात मात्र त्यांची अडवणूक करण्यात आल्याचे चौकशीतून समोर आले. त्याचबरोबर वैद्यकीय बिलांचे प्रस्ताव महिनोंमहिने प्रलंबित ठेवून कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकारही चौकशीत समोर आला. विशेष म्हणजे पाठीमागून दाखल अनेक बिले मंजूर होऊन पुढे गेलेली असताना अनेक बिले मात्र प्रलंबितच ठेवण्यामागे कोणते कारण याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करून याअनुषंगाने ठपका ठेवला आहे. तसेच याप्रकरणी जिल्हा शल्यचिकीत्सक एकनाथ माले यांनी आठ दिवसांमध्ये खुलासा करण्यासही बजावले होते. त्यानुसार माले यांनी आपला खुलासा सादर केला असून याप्रकरणी पुढे कोणती कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.दरम्यान, जिल्हा रूग्णालयात गेल्या दहा वर्षापासून अनागोंदी सुरू असून, सामान्य रूग्णांना सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. मात्र आरोग्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही सुधारणा झाल्या नाहीत. 
 
जिल्हा रुग्णालयातील अपघात वार्डमध्ये दाखल होणाऱ्या फ्रॅक्चर केसमधील रुग्णांना रॉड, शस्त्रक्रियेचे विविध साहित्य नियोजित नितीन सर्जीकल याच दुकानदाराकडून आणण्यास सांगितले जात होते. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब रुग्णांना दोन हजारापासून ते २० हजारांपर्यंतची पदरमोड करून विविध साहित्य आणावे लागत. वास्तविक पाहता साहित्याचा जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात साठा शिल्लक आहे. हे साहित्य खरेदी करू शकणारे अनेक रुग्ण शस्त्रक्रीयेअभावी रुग्णालयात पडून असल्याचेही तपासणीत समोर आले. तसेच नितीन सर्जीकलचा मालक नितीन फड हा थेट ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन सर्जीकल साहित्याचा पुरवठा करत असल्याचेही समोर आले. याप्रकाराबाबत ‘दिव्य मराठी’ ने १३ जानेवारी २०१७ रोजी वृत्त प्रकाशित करून या कारभाराकडे लक्ष वेधले होते. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, ‘दिव्य मराठी’ने यासंदर्भात १३ जानेवारीला वृत्त प्रसिध्द केले...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...