आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविक सुरक्षित; व्यापाऱ्यांना दणका!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - नवरात्रोत्सवाच्या कालावधीत कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासााठी देशभरातून सुमारे ५० लाखांहून अधिक भाविक येतात. विशेष म्हणजे भाविकांच्या संख्येत १९९५ पासूनच खऱ्या अर्थाने वाढ सुरू झाली आहे. त्यामुळे तुळजापूर शहराच्या अर्थकारणाला बळ मिळाले आहे. पुजारी, व्यापाऱ्यांचा व्यवसाय वृद्धींगत होऊ लागला आहे. अर्थातच त्यामुळे शहरातील जागेला महत्त्व आले आहे. हळद-कुंकू, पेढे, नारळ, फुलांचे हार, अगरबत्ती, बांगड्या, खडीसाखर, या पूजेच्या साहित्याची दुकाने शहरभर पसरली आहेत. प्रासादिक साहित्याप्रमाणेच देवीच्या प्रतिमा, पितळी मूर्तीच्या विक्रीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. उलाढाल जशी वाढली तशी व्यापाऱ्यांसाठी जागा मालकांकडून भाडे आकारणी प्रचंड प्रमाणात वाढत गेली. दरवर्षी यात्रेमध्ये वाढणाऱ्या गर्दीप्रमाणे भाडे आकारणी वाढत आहे. विशेषत: भवानी रोड, महाद्वार परिसर आणि आर्यचौक ते कमानवेस या भागातील दुकानांना लाखोंच्या घरात भाडे आकारणी केली जाते. व्यापाऱ्यांच्या दृष्टीने वर्षातील शारदीय आणि शाकंभरी नवरात्र महोत्सव महत्त्वाचे असतात. या कालावधीत विशेषत: शारदीय नवरात्रात भाविकांची प्रचंड गर्दी असते. त्यावर दुकानाचे भाडे आणि अन्य खर्चाचा भाग वगळून काही नफा मिळविण्याचा हेतू असतो. अलीकडे व्यवसायात वाढ झाली असली तरी व्यवसायाची संख्या वाढत असल्याने स्पर्धाही वाढली आहे. या स्पर्धेमुळे नफ्यात तूट येत आहे. त्यामुळे व्यापारीवर्गात सर्वकाही अलबेल आहे, असे नाही. मात्र, बेरोजगारीला तोंड देणाऱ्या नव्या पिढीला व्यापारावाचून पर्याय नाही.

व्यवसाय मोडून पडणार का?
प्रशासनानेदर्शन रांगेत केलेल्या बदलाचा फटका व्यापारी वर्गाला बसला आहे, हे वास्तव असले तरी सरसकट संपूर्ण व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याचे रंगविले जाणारे चित्र चुकीचे आहे. महाद्वार परिसर, भवानी रोडचा अर्धा भाग प्रशासनाने अर्धवट बंद केला आहे. या मार्गावर साहित्य खरेदीसाठी कोणी जाऊच नये, अशी प्रशासनाची भूमिका नाही किंवा तसा फलकही कुठे लावण्यात आलेला नाही. केवळ दर्शन रांगेकडे जाण्यासाठी दीपक चौकमार्गे दिशा दाखविण्यात आली आहे. वास्तविक महाद्वाराकडे जाणाऱ्यांना रोखले जात नाही. मात्र, त्यांना महाद्वारातून मंदिरात प्रवेश बंद आहे.

व्यवसाय ७५ टक्क्यांनी घटला
^महाद्वार परिसरात भाविकांची संख्या कमी झाल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत ७५ टक्क्यांनी व्यवसाय कमी झाला आहे. गेल्यावर्षी दररोज १० हजार रुपयांची विक्री होत होती. यावर्षी कशीबशी हजारांची विक्री होत आहे. व्यवसाय तोट्यात आला अाहे. ’’ सुमितशिंदे, मूर्ती व्यापारी.
^मंदिरातजाताना पेढा घेऊन जाण्याची पद्धत आहे. मात्र, या भागातून दर्शनासाठी जाता येत नसल्याने भाविक पेढा खरेदीसाठी फिरकतच नाहीत. त्यामुळे व्यवसाय बंद पडल्यात जमा आहे. प्रशासनाने भाविकांच्या सोयीप्रमाणे व्यापाऱ्यांचा विचार करावा.’’ सुनीलसाेलापुरे, व्यापारी.
तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या मार्गात प्रशासनाने यावर्षी प्रथमच बदल केला आहे. भाविकांची गर्दी आणि गैरसोय होणार नाही, दुर्घटना रोखता येतील, असा हा बदल आहे. पण, हा बदल नवरात्रापुरताच असेल की तशी परंपराच राहील, अशी शंका व्यापाऱ्यांतून उपस्थित होत आहे. मार्गातील बदल कायमस्वरूपी राहिल्यास महाद्वार परिसर, कमानवेस ते आर्यचौक मार्गावरील व्यापार मोडीत निघेल, अशी भीती व्यापाऱ्यांना वाटू लागली आहे.

नियोजन सुलभ, ७०० पोलिस कमी
भवानीरोडवरून बीडकर तलावमार्गे दर्शन रांगेत केलेल्या बदलामुळे यावर्षी नवरात्रोत्सवात सुमारे ७०० पोलिस कर्मचारी कमी लागले आहेत. कमी बंदाेबस्तामध्ये सुयोग्य नियोजन करण्यात यश आले. यावर्षी गर्दीमध्ये वाढ झाली आहे. मात्र, त्याचा थोडाही ताण प्रशासनावर आलेला नाही, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

बदललेली दर्शन व्यवस्था परंपरा बनेल ?
व्यापारी आणि प्रशासन, असा वाद पेटला असून, दर्शन व्यवस्था बदलल्याने महाद्वार परिसरातील हजार, भवानी रोडवरील ८००, शुक्रवार पेठेतील ४०० आणि कंुभार गल्लीतील ५० अशा हजार २५० व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. याव्यतिरिक्त डॉ. आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, बसस्थानक परिसरातील व्यापार वाढला आहे. त्यामुळे या भागातील व्यापारी खुश आहेत.
सव्वादोन हजार व्यापाऱ्यांचे नुकसान

प्रशासनाने पुजाऱ्यांची केली मुस्कटदाबी
मंदिराचे व्यवस्थापन काहीअंशी निजामकालीन देऊळ कवायत कायद्याप्रमाणे चालते. या कायद्यातील तरतुदीप्रमाणे गेल्या वर्षांत केवळ पुजाऱ्यांवर देऊळ बंदी कायद्याचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. आजवर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांसह डझनभर पुजाऱ्यांचा मंदिर मार्ग रोखण्यात आला आहे. हा प्रकार आपल्याबाबतीत घडू नये, त्यातून रोजीरोटीवर टाच येऊ नये, म्हणून काही पुजारी व्यवस्थापनाविरुद्ध बोलत नाहीत, पुजाऱ्यांचे दोन गट असून, या गटबाजीचा पुरेपूर वापर करून जिल्हाधिकारी बदल करून घेत आहेत. नारळ फोडणे, प्रवेशद्वारावर तेल मारण्याची परंपरा, मूर्तीवरील अभिषेकांना मर्यादा, असे अनेक बदल करण्यात आले आहेत. अजाबलीची प्रथा बंद करण्यात प्रशासनाला यश आले होते. मात्र, उच्च न्यायालयाने ही प्रथा कायम ठेवण्याचे आदेश दिल्याने परंपरा सुरू आहे. पारंपरिक पद्धती सांगण्याचा प्रयत्न केल्यास प्रशासनाकडून पुजाऱ्यांची मुस्कटदाबी केली जाते, असा आरोप पुजाऱ्यांनी केला आहे.
ऑक्टोबर २०१३ च्या रात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत दोन भाविकांचा बळी गेला. महाद्वार परिसरात अचानक वाढलेल्या गर्दीमुळे प्रशासनाने महाद्वार बंद केले आणि पोलिसांनी लाठीमार केल्याने चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती, या पार्श्वभूमीवर तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी या प्रकरणाची चौकशी उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्यामार्फत केली होती. हा चौकशी अहवाल काही महिन्यांपूर्वी ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केला होता. या अहवालात पोलिस प्रशासनाप्रमाणेच मंदिरातील काही कर्मचाऱ्यांना दोषी धरण्यात आले होते. मात्र, यातील दोषींवर कारवाई होऊ शकली नाही. या अहवालात संभाव्य काळात दुर्घटना टाळण्यासाठी काही मुद्दे सुचविण्यात आले होते. त्यात महाद्वार परिसरात विशेषत: मोठ्या उत्सवादरम्यान गर्दी होणार नाही, यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, असे सुचविण्यात आले होते. त्यानंतर गेल्यावर्षी (२०१४) या अहवालानुसार काही बदल करण्यात आले. मात्र, ते प्रभावी ठरले नाहीत. त्यामुळे यावर्षी अमूलाग्र आणि धाडसी बदल करण्यात आले आहेत. हा बदल अत्यंत विचारपूर्वक आणि चौकशी अहवालातील मुद्यांचा संदर्भ घेऊन करण्यात आला आहे. त्यामुळेच गुरुवारी व्यापाऱ्यांची व्यथा घेऊन महसूलमंत्र्यांकडे गेलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांना कुठल्याही बदलाशिवाय परतावे लागले.
चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे महसूलमंत्र्यांनी हस्तक्षेप टाळला!
डॉ. प्रवीण गेडाम यांनीही केल्या होत्या सूचना
महाद्वारपरिसरातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनीही केल्या होत्या. या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली. दुर्घटनेनंतर डॉ. गेडाम यांच्या सूचनांची आठवण झाली होती.

ताण कमी होण्यासाठी नवीन मार्ग
^महाद्वारते निंबाळकर दरवाजापर्यंतचा मार्ग अरुंद आहे. छोट्या दरवाजातून भाविकांना सोडताना पोलिस यंत्रणेवर ताण येतो. हा मार्ग महाद्वारापासून निंबाळकर दरवाजापर्यंत कमी-कमी होत गेला आहे. वरून गर्दी आली की खाली परिस्थिती चिंताजनक बनत जाते. त्यामुळे दर्शन मार्गात बदल करण्यात आला आहे. यामुळे ताण कमी झाला असून, त्यात भाविकांच्या सुरक्षेचा पुरेपूर विचार करण्यात आला आहे. तुळजापुरातील पुजाऱ्यांसह व्यापाऱ्यांकडून यासाठी सहकार्य मिळत आहे.’’ डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष मंदिर संस्थान.