आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावरील भाजी मंड्या ठरताहेत वाहतुकीला डोकेदुखी....

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापुर - विक्रेत्यांच्या सोयीसाठी शहरातील विविध भागात महापालिकेने भाजी मंड्या उभ्या करून दिल्या. विक्रीसाठी दगडी ओटे, पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, वाहनतळाची सोयही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मात्र, एक दोन मंड्यांचा अपवाद वगळता शहरातील अधिकृत आणि अनधिकृत मंड्यातील विक्रेते रस्त्यावरच बसून भाजी विक्री करण्याला प्राधान्य देताना दिसतात. महापालिकेकडूनही कारवाई होत नाही, झाली तर किरकोळ स्वरुपात होऊन दुसऱ्या दिवशी परिस्थिती जैसे थे असते. भाजी मंडई रस्त्यावरच येत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहेत. यावर कायमस्वरुपी उपाययोजना आवश्यक आहे. डी. बी. स्टारने या विषयावर टाकलेला प्रकाश...
शहरातील ७० फूट भाजी मंडई, चैतन्य भाजी मार्केट, रेल्वेस्टेशनजवळील वाडीया हॉस्पिटलजवळील भाजी मार्केट, लक्ष्मी मार्केट, आदी भागात मंडया सोडून रस्त्यावरच भाजी विक्री होत असल्याने वाहतूकीस खूप अडथळा निर्माण होतो. येथे अनेकदा कारवाया झाल्यातरी विक्रेते रोडावल्याचे दिसते.
१० रुपयेविनाकट्टा खाली बसणाऱ्यांना रोजचे भाडे
१० ते६५रुपयेमासिक भाडे चार बाय चारच्या ओट्याला
३२५ रुपयेबांधलेल्या कट्ट्याला मासिक भाडे
१९ मंड्याशहरात अधिकृत अनधिकृत
बाळीवेस परिसरातील कस्तुरबा मंडई आणि सुपर मार्केट या दोन मंड्या याला अपवाद आहेत. कारण येथे सर्व विक्रेते मंडईमध्ये बसूनच व्यवसाय करतात. तसेच येथे ओट्यावरील आणि विनाओट्याचे विक्रेते आहेत. कस्तुरबा मंडईत विक्रेते जास्त आहेत. पण येथे शिस्त असल्याने ग्राहकांना सुलभता होते.

कारवाई होते
मोहनकांबळे, पालिकाअतिक्रमण विभाग प्रमुख
भाजीविक्रेत्यांवर मंडई विभागाकडून कारवाई होते. दंडही त्यांच्याकडून घेतला जातो. आम्ही केवळ वाहने उचलणे, त्यातील भाजीपाला प्राणिसंग्रहालयास जमा करणे ही भूमिका बजावतो. शहरात रस्त्यावर भाजी विकणाऱ्या विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. यावर नियंत्रण आणले पाहिजे.

भाजी मंडईतच मिळावी
मधूरसोलापूरकर, गृहिणी
आज आम्ही सोलापुरात पाहतोय की, भाजी मंड्या रिकाम्या तर विक्रेते शेतकरी रस्त्यावर येत भाजी विकतात. ही भाजी खरेदी करताना आम्हालाही वाहनांपासून सांभाळत, पिशव्या हातात धरून तारेवरची कसरत करावी लागते. पालिकेने संबंधित प्रशासनाने यांना शिस्त लावत मंडईमध्येच भाजी विकण्याची सक्ती करावी. ज्यामुळे भाजी घेण्यात सुलभता येईल, आणि भाजीमंड्यांचा अन्य कामांसाठी होत असलेला गैरवापर थांबेल.

स्वतंत्र हॉकर्स झोन हवेत
अतुलअपशिंगे, दुकानदार
केवळ भाजीमंड्यांमध्येच नाहीतर शहरातील व्यापारी पेठांमध्ये चौकांमध्ये हातगाडीवाल्या विक्रेत्यांमुळे मुख्य दुकानदार व्यावसायिकांनाही त्रास होतो. ती वाहने रस्त्यावर दुकान मांडलेल्यांमुळे दुकानात येणाऱ्यांना आपल्या दुचाकी लावण्यास अडचण होते. यामुळे रहदारी होत वाहतूक व्यवस्था कोलमडते. म्हणून अशा विक्रेत्यांसाठी एक स्वतंत्र हॉकर्स झोन असावेत. पुण्यात लक्ष्मीरोड, तुळशी बाग, मोतीबाग, हाँगकाँग लेन असे झोन आहेत. तसे सोलापुरात झाले तर बरे होईल. यावर कायमस्वरुपी तोडगाही निघेल. अशा कल्पना राबवल्या पाहिजेत.
कारवाईसाठी सातत्य हवे

एस.बी. वाघमारे, वाहतूकशाखा अधिकारी
वाहतुकीस अडथळा होत असलेल्या ठिकाणी मुंबई कायदा क्रमांक १०२ ११७ प्रमाणे कारवाईही होते. शिवाय संबंधितास थेट न्यायालयात पाठवले जाते. चारचाकीवाले हातगाड्या अन्य हॉकर्सकडून रहदारीस अडथळा होऊ देण्याकडे आमचा कल असतो. पालिका, अतिक्रमण विभाग आदींच्या सहकार्यातून विशेष मोहीम राबवून रस्त्यावर येऊन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर चाप बसवता येईल. पण हे विक्रेते आज कारवाई केली तर परत रस्त्यावरच येतात. या कारवाईत सातत्य अावश्यक आहे.

पोलिसांचे सहकार्य हवे
चंद्रकांतकरजगी, मंडईअधीक्षक
रस्त्यावर भाजी विकणाऱ्यांवर कारवाई करतो. पण आम्हाला दंड करायचा अधिकार नाही. केवळ माल जप्त करून तो पालिकेत जमा करतो. महिला कर्मचारी पोलिसांचे सहकार्य अपेक्षित आहे. जप्तीमध्ये जो माल उचलला जातो तो प्राणिसंग्रहालयातील पशू-पक्ष्यांसाठी जमा केला जातो. प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये विक्रेत्यांची यादी पण दिली आहे. आमची मोहीम सुरूच आहे, मोहीम संपल्यावर परत दुसऱ्यादिवशी हे विक्रेते रस्त्यावरच येऊन बसतात. चैतन्य भाजी मंडई, अशोकनगर येथे बऱ्याचवेळा कारवाई केली आहे.

वाहनातून विक्री जोमात
शहरातीललक्ष्मी मार्केट, कस्तुरबा, सुपर मार्केट आदींचा जुन्या मंडईत समावेश होतो. मंडईत ओट्यांची व्यवस्था आहे. मात्र, ग्राहक वेळेच्या बचतीसाठी मार्केटमध्ये जाऊन भाजी घेण्यापेक्षा उभ्या उभ्याच भाजी घेतात. त्यामुळे रस्त्यावरही भाजी विक्रीचे प्रमाण वाढत आहे. शिवाय शहरात आता चौकाचौकात वाहनातूनच भाजी, लसूण, कांदा आदी विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे. बाळीवेस, पत्रकार भवन चौक, अशोकनगर, जुळे सोलापूर, आसरा चौक आदी भागांत असे विक्रेते शेतकरी थेट रस्त्यावरच आपली वाहने थांबवून भाजी विकताना दिसतात. यामुळेही चौकांमध्ये काहीप्रमाणात रहदारीस अडथळा होतो. यावर कायमस्वरुपी तोडगा आवश्यक आहे. तेव्हाच विक्रेत्यांना शिस्त आणि वाहतुकीचा खोळंबा थांबेल.