आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठल मंदिरास साड्या, खण विक्रीतून आठ लाखांचे उत्पन्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर येथील तुकाराम भवनमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने रुक्मिणी मातेस भाविकांनी अर्पण केलेल्या साड्या, खणांचे विक्री केंद्र सुरू केले होते. साड्यांच्या खरेदीला महिलांनी गर्दी केली होती.
पंढरपूर - येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने उत्पन्न वाढवण्याकरता दीपावलीच्या पार्श्वभूमीवर श्री रुक्मिणी मातेला ओटीच्या रूपात आलेल्या साड्या खणांची तुकाराम भवनात रविवार (दि. १) पासून बुधवार (दि. ४)पर्यंत खास विक्री सुरू केली होती. दरम्यान, केंद्र ठिकाणी साड्या, खणांच्या खरेदीला महिलांनी गर्दी केली होती. या विक्रीतून मंदिर समितीला सुमारे आठ लाख २४ हजार ३०० रुपयांचे उत्पन्न मिळाले.

मकर संक्रात, अधिक महिना तसेच आषाढी यात्राकाळात भाविकांकडून श्री रुक्मिणी मातेस मोठ्या प्रमाणावर साड्या, खण अर्पण केले होते. साड्या, खण खराब होण्याची शक्यता होती. ते टाळून त्यापासून मंदिर समितीला काही प्रमाणात उत्पन्न मिळावे याकरता साड्या, खणांच्या विक्रीचे दालन सुरू करण्यात आले होते. मंदिर समितीने या चार दिवसांत सुमारे सात हजार साड्या, ९० हजार खण विक्रीस काढले होते. दालनात अवघ्या शंभर रुपयाला एक साडी विकण्यात आली. तसेच एका खणाची १० रुपये ते २५ रुपये अशी किंमत होती. सकाळपासून तुकाराम भवनाबाहेर गर्दी होती.

अशी झाली विक्री
मंदिरसमितीने साड्यांच्या विक्रीचे दालन सुरू केल्याच्या पहिल्या दिवशी दोन लाख ८१ हजार ३१५ रुपये, तर दुसऱ्या दिवशी दोन लाख ४५ हजार ८५ रुपये, तिसऱ्या दिवशी दोन लाख ७३ हजार ७०० रुपये आणि शेवटच्या दिवशी २४ हजार २०० रुपयांची विक्री झाली, अशी माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांनी दिली.


महिलांचा प्रतिसाद
महिलांचा साड्या खणांच्या खरेदीला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. चार दिवसांत मंदिर समितीला सुमारे सव्वाआठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विलास महाजन, व्यवस्थापक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर