आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर महापालिका निवडणूक: यंदा 11.59 टक्के वाढले मतदान, एकूण 59.56%, गुरुवारी निकाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या मतदानाला सकाळच्या सत्रात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. केवळ नऊ टक्के इतके मतदान होते. जसजसे उन्हाचे चटके वाढले, तस तसे मतदानही वाढल्याचे अाकडेवारीवरून स्पष्ट झाले.
 
शेवटच्या दीड तासात वेगाने मतदान झाले. महापौर सुशीला अाबुटे यांच्या प्रभाग क्रमांक २४ मध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद झाली. सर्वाधिक मतदान प्रभाग १२ मध्ये झाले. गुरुवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. 
 
१८ आदर्श मतदान केंद्रांसह ८९६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. दुपारी संथगतीने पण सकाळच्या तुलनेत जास्त मतदान झाले. सायंकाळी चारनंतर मतदानास गती आली. सहापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. अनेक मतदारांपर्यंत स्लिपा पोहोचल्या नाहीत. कोणत्या बूथवर नाव आहे हे शोधून दुसऱ्या बूथवर जावे लागले. काही जणांचे मतदार यादीत नावच नसल्याने त्यांना मतदान न करता परतावे लागले. प्रचार फेरीदरम्यान झालेल्या वादामुळे अटकेत असलेल्या राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर हारून सय्यद यांना पोलिस बंदोबस्तात येऊन मतदान करावे लागले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी एमअायएमचे तौफिक शेख हे मात्र मतदानाला अाले नाहीत. 
 
शेळगी, लोधी गल्ली आणि नई जिंदगी परिसरातील मतदान केंद्रांवर महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. एकंदरीत संपूर्ण शहरात ३२५६९७ इतक्या महिला मतदारापैकी १९०६१५ इतक्या महिला मतदारांनी मतदान केले. तसेच प्रथमच महिला कार्यकर्त्यांचाही लक्षणीय सहभाग दिसून आला. महिला कार्यकर्त्या रखरखत्या उन्हातही परिश्रम घेत होत्या.
 
पुरुषांचे मतदान जास्त
महापालिका निवडणुकीसाठी सन २०१२ च्या निवडणुकीत ४८ टक्के मतदान झाले होते. त्यापेक्षा ११.५९ टक्के मतदान जास्त असे ५९.५६ टक्के मतदान यंदा झाले. सर्वाधिक मतदान प्रभाग क्रमांक १२ मध्ये ६७.९७ टक्के तर सर्वात कमी मतदान महापौर सुशीला आबुटे यांच्या प्रभाग क्रमांक २४ मध्ये ५१.१६ टक्के इतके झाले आहे.
 
प्रभाग क्रमांक १२ मध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे ३११ मतदान जास्त झाले आहे. यंदा महापालिकेतील १०२ नगरसेवक निवडण्यासाठी ६.७३ लाख मतदार होते. त्यापैकी चार लाख एक हजार ३९६ मतदारांनी कौल दिला. त्यात दोन लाख १० हजार ७८१ पुरुष तर एक लाख ९० हजार ६१५ महिलांचा समावेश आहे. २२ इतर मतदार होते त्यापैकी एकानेही मतदान केले नाही.

मतदानाची टक्केवारी ११.५९ ने वाढली
सन २०१२ च्या मनपा निवडणुकीत ४८ टक्के मतदान झाले होते. ७.३१ लाख मतदार होते. त्यात ३.७८ पुरुष तर ३.५३ लाख महिला मतदार होते. या वेळी झालेल्या मतदानात ११.५९ टक्के वाढ झाली आहे. मतदार जागृती आणि सोशल मीडियाचा परिणाम दिसून आला. सन २०१७ मनपा निवडणुकीसाठी नवीन मतदार २९ हजार नोंदले. त्यांच्यासह ६.७३ लाख मतदार आहेत. मागील निवडणुकीच्या यादीपैकी ५८ हजार मतदार कमी झाले. शहर दक्षिण मतदार संघातील प्रभाग क्रमांक २३, २४, २५, २६ या प्रभागांत मतदानाची टक्केवारी सरासरी ५३ टक्के इतकी आहे.
 
वाहतूक अडथळा होत असल्याने पोलिसांनी १०० मीटरच्या बाहेर वाहने लावण्यास भाग पाडले. कुष्ठरोग वसाहत येथे यंत्रात बिघाड झाला.  मतदार यादीत नाव सापडत नाही म्हणून पाच हजार मतदारांनी हेल्पलाइनची मदत घेतली. व्होटर सर्चमधून एक लाख २४ हजार ५२० जणांनी माहिती घेतली. मतदारांना आणण्यासाठी कार्यकर्ते धावपळ करत होते. खासगी वाहनातून मतदार येत होते. सायंकाळी केंद्रावर गर्दी वाढली. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात टक्केवारी वाढली.
बातम्या आणखी आहेत...