आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमचा प्रभाग फोडला, नको तो भाग जोडला...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना मांडण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. त्याच्या आढाव्यात सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच तब्बल ७० हरकती आल्या. भाजपने मात्र एकही हरकत घेतली नाही, हे विशेष. ‘आमचा प्रभागच फोडला. नको तो भाग जोडला,’ हे वाक्य हरकतीच्या केंद्रस्थानी आहे.
हरकत नोंदवणाऱ्यांमध्ये महापालिकेतील सभागृह नेते संजय हेमगड्डी, ज्येष्ठ नगरसेवक अॅड. यू. एन. बेरिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर सपाटे, देवेंद्र भंडारे यांचा समावेश आहे. नोव्हेंबरपर्यंत त्यावर सुनावणी होईल. १९ नोव्हेंबरला निवडणूक आयोगाकडे त्या सादर केल्या जातील. त्यानंतर २२ नोव्हेंबरला आयोग त्यावरील निर्णय जाहीर करेल. २५ नोव्हेंबरला अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात येईल.

बेरिया, हेमगड्डी म्हणतात : प्रभाग १६ मध्ये जगदंबा चौकातून नळ बाजार चौकाकडे गरज नसताना चुकीच्या पद्धतीने वळवले. ते वस्तुत: मौलाली चौकाकडे जाणे आवश्यक होते. मोठे रस्ते तोडले. त्यात सलगताच नाही.

माजी नगरसेवक विजय फुटाणे : अनुसूचित जातीच्या वस्त्यांचे विभाजन झाले. प्रभाग ते ८, ११, १४, १७, १८ अशा सर्व प्रभागांसाठी त्यांची हरकत आहे. लोकसंख्या विभाजनातही समानता नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

कोठेंच्या प्रभागात सर्वाधिक : सर्वाधिक हरकती प्रभाग क्रमांक १६ साठी आलेल्या आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांचे प्राबल्य असलेला हा भाग आहे. तिथे काँग्रेसकडून रियाज मोमीन यांनी हरकत नोंदवली.

सपाटे म्हणाले, प्रभाग फोडला : प्रभाग क्रमांक सहा फोडला असून, प्रभाग १५ ची लोकसंख्या प्रभाग २५ पेक्षा अधिक आहे. १५ ची लोकसंख्या प्रभाग क्रमांक २२ २३ ला जोडणे आवश्यक होते, असे सपाटे यांनी म्हटले आहे.

कोल्हेंच्या भागात वानकर : नगरसेवक दिलीप कोल्हेंच्या प्रभागात विठ्ठल वानकर यांनी हरकत घेतली. लक्ष्मी-विष्णू चाळ जोडणे भौगोलिकदृष्ट्या योग्य नाही. रस्त्यावरील नागोबा मंदिराच्या अलीकडील भाग जोडणे आवश्यक.

यंत्रांसाठी ९५ मास्टर ट्रेनर
महापालिका निवडणुकीसाठी ९५ मास्टर ट्रेनर तयार होणार आहेत. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पाच प्रशिक्षक आहेत. मंगळवारी महापालिका निवडणूक कार्यालयात त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यंत्रे क्लिअर करणे, उमेदवारनिहाय यंत्र तयार करणे, मशीन बंद करणे या बाबी त्यांना शिकवण्यात आल्या. शहरात सुमारे ११०० ते १२०० मतदान केंद्रे असतील.

सन २०१२ मधील महापालिका निवडणूक खर्च दिला नाही म्हणून २१९ जणांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले. त्यापैकी काही जणांनी निवडणूक आयोगाकडे अपिल केले. त्यावर नोव्हेंबर रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अॅड. विश्वास देवकर यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...