आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील 30 हजार नागरिकांना एका दिवसासाठी लागणारे पाणी गेले वाया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर; औज बंधाऱ्यात पाणी नसल्याने शहरातील पाणीपुरवठा तीन ऐवजी चार दिवसांआड करण्यात आलेला आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. तर दुसरीकडे महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे पाणी वाया जात आहे. मंगळवारी पहाटे जुळे सोलापुरातील दगडी पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाली. तीन तासांत तीस लाख लिटर पाणी वाया गेले.

मनपाच्या निकषानुसार शहरातील एका दिवसासाठी १०० लिटर पाणी पिण्यासाठी वापरासाठी लागते. ३० लाख लिटर पाणी शहरातील ३० हजार लोकांना पुरले असते. मात्र मनपाच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले.

औज बंधाऱ्यातील पाणी संपल्याने शहरात पाणीटंचाई जाणवत आहे. शहर पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये म्हणून औज बंधारा परिसरातील डोहातील पाणी पोकलेनच्या सहाय्याने मनपा जॅकवेलपर्यंत आणून उपसा सुरू ठेवण्यासाठी अधिकारी झटत आहे. मात्र, शहरात आलेल्या पाण्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष झाल्याने आजची घटना घडली. दगडी टाकी ओव्हरफ्लो झाल्याने पाणी वाया गेले.
कल्याणनगरपर्यंत पाण्याचे तळे साचले होते. अखेर नगरसेवक नागेश ताकमोगे यांनी पहाटे साडेतीन वाजता मनपा अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली. सकाळी सहा वाजता पाणी बंद करण्यात आले. तोपर्यंत बरेच पाणी वाया गेले होते.

औज बंधाऱ्यात पाण्याचा साठा संपल्याने तेथे पोकलेन लावून पाणी एकत्रित करण्याचा प्रयत्न महापालिकेने सुरू केले आहे. त्यासाठी महापालिकेचे प्रभारी आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे, महिबूब जमादार आदी जणांचे पथक तेथे आहे. शहरासाठी सोडलेले उजनी धरणातील पाणी पुळूज बंधारा पार करून वडापूरपर्यंत आले आहे. पाण्याची गती मंद असून, शुक्रवारी पाणी अौज बंधाऱ्यात येईल.

दररोज ८० एमएलडी पाणी उपसा
शहरातपाच टप्प्यांत पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी उजनी आणि औज बंधारा येथून ८० एमएलडी पाणी उपसा करून ४५ एमएलडी पाणी दिले जात आहे. पाच एमएलडी गळती आणि पाच एमएलडी पाइपलाइनमध्ये राहील, असे गृहीत धरले तरी १५ एमएलडी पाण्याचा हिशेब लागत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन होत नसल्याचे मनपा विरोधी पक्षनेते पांडुरंग दिड्डी म्हणाले.

मनपा अधिकारी म्हणतात किरकोळ गळती
जुळेसोलापुरातील टाकीतील पाणी ओव्हरफ्लो होऊन लाखाे लिटर पाणी वाया गेले. या प्रकरणी संबंधित अभियंता व्ही. एन. चौबे यांना विचारले असता, किरकोळ गळती आहे, पाहून घेतो, असे उत्तर दिले. ओव्हरफ्लो नसून पाइपलाइन गळती असल्याचे सांगत हास्यास्पद उत्तर दिले.

ऐन पाणीटंचाईत अनास्थेचा धिंगाणा
मनपाकडून३६५ दिवस पाण्याची पाणीपट्टी घेऊन ७० दिवस पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दोन दिवसाआड, तीन दिवसांआड नंतर आता चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भविष्यात पाच ते सहा दिवस आड पाणीपुरवठा केल्यास आश्चर्य नाही. पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने नागरिकांची तारांबळ होत आहे. मनपा चार दिवस म्हणत असली तर प्रत्यक्षात पाच-सहा दिवसांनी पाणी येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. दिवाळीनंतर पाण्यासाठी शिमगा करण्याची वेळ आली आहे.

पाणीपुरवठ्या संदर्भात आज बैठक
शहराच्यापाणीपुरवठ्यासंदर्भात महापौर सुशीला आबुटे यांनी सर्वपक्षीय बैठक बुधवारी सकाळी ११.३० वाजता आपल्या कक्षात बोलावली आहे. महापालिका पदाधिकारी अधिकाऱ्यांची बैठक होईल.

अधिकाऱ्यांना निलंबित करा
शहरातपाण्याची ओरड सुरू असताना टाकी ओव्हरफ्लो होऊन तीस लाख लिटर पाणी वाया गेले. याबाबत अधिकाऱ्यांना फोन करून सांगूनही अधिकारी आले नाहीत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे.'' नागेशताकमोगे, नगरसेवक

कारवाईचाप्रस्ताव देणार
जुळेसोलापुरातील पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाली. त्याप्रकरणी तेथील संबंधित कर्मचाऱ्यास नोटीस देऊन निलंबनाचा प्रस्ताव ठेवण्याचे आदेश उपअभियंता यांना दिले आहे.'' गंगाधरदुलंगे, प्र. सार्वजनिक आरोग्य अभियंता, मनपा