आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्यापासून दिवसांआड पाणी! दोन तासाच्या चर्चेनंतर प्रशासनाकडून होकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उजनीधरण आणि टाकळी बंधारा भरू वाहताहेत. त्यामुळे आता एक दिवसाआड पाणीपुरवठा करा, असा आग्रह महापौर सुशीला आबुटे यांनी महापालिका प्रशासनाकडे धरला. हे शक्य नसेल तर तसे लिहून द्या, अशी भूमिका महापौर आबुटे यांनी घेतली. त्यावर दोन तासांची चर्चा होऊन शुक्रवारपासून दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसांआड पुरवठा सुरळीत होण्यासाठी पंधरा दिवस लागतील, अशी माहिती महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी दिली.

पाणीपुरवठ्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी महापौर आबुटे यांनी बुधवारी आपल्या कक्षात पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी उपमहापौर प्रवीण डोंगरे, सभागृह नेते संजय हेमगड्डी, नगरसेवक आरीफ शेख, अॅड. यू. एन. बेरिया, विनायक कोंड्याल, आनंद चंदनशिवे, पद्माकर काळे, राजकुमार हंचाटे, महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, उपअभियंता गंगाधर दुलंगे, संजय धनशेट्टी, राजकुमार रेड्डी आदी उपस्थित होते.

सुरुवातीला महापौर आबुटे यांनी रोज पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. परंतु यंत्रणा नसल्यामुळे तसे करणे करणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर अॅड. बेरिया, हेमगड्डी यांनी प्रशासनास जाब विचारला. सभागृहाने निधी दिला. यापूर्वी पाणी नाही म्हणून टाळाटाळ केली जात होती. आता पाणी आहे तर रोज किंवा दिवसाआड का देत नाही? असा सवाल केला.

महापौरम्हणाल्या, मलाच उपोषणास बसावे लागेल
रोज पाणी का देत नाही ते सांगा. होत नसेल तर लिहून द्या अन् घरी जावा. नागरिकांना पाणी मिळत नसेल तर मलाच उपोषणास बसावे लागेल, असे म्हणत महापौर आबुटे यांनी उपअभियंता रेड्डी, दुलंगे यांना खडसावले. एक दिवसाआड पाणीपुरवठ्यासाठी त्या आग्रही होत्या. हद्दवाढ भागासह शहरातही दिवसाआड पाणीपुरवठा करा तेही रात्री अकराच्या आत, असे त्या म्हणाल्या.

उपमहापौरांचा बैठकीतून त्याग
मागील वर्षापासून पाणीपुरवठा अधिकारी तेच ते उत्तर देतात. त्यामुळे मागील इतिवृत्तांत मागवा असे उपमहापौर प्रवीण डोंगरे म्हणाले. इतिवृत्तांत येत नसल्याने ते बैठकीतून बाहेर पडले आणि इतिवृत्तांत आल्यावर पुन्हा आले. रोज पाणीपुरवठा करण्याचा आग्रह धरला.

रात्री पाणीपुरवठा होण्याची शक्यता
दोन दिवसाआड पाणीपुरवठा झाल्यास अक्कलकोट रोड, विडी घरकुल, कुंभारी रोड, शेळगी, दहिटणे मजरेवाडी भागात रात्री १२ ते पहाटे सहा पर्यंत पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, असे पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे.

उद्या या भागात पाणीपुरवठा
साखर पेठ, कन्ना चौक, गणेश पेठ, पाच्छा पेठ, बुधवार बाजार, शास्त्रीनगरचा भाग, दत्त नगर, भद्रावती पेठ, रविवार पेठ, जोशी गल्ली, शांती नगर झोपडपट्टी, २५६ गाळे, गवई पेठ, जगजीवनराम झोपडपट्टी सात रस्ता, बापुजी नगर, अशोक चौक, कुचन नगर, पोलिस मुख्यालय, भारत रत्न इंदीरा नगर, कुमठा नाका, हुडको, माधव नगर, विनायक नगर, मार्कडेय नगर, म्हेत्रेवस्ती, अंबिका नगर, ताई चौक, स्वागत नगर, बागलेवस्ती, रमाबाई अांबेडकर नगर, हनुमान नगर, मुकूंद नगर, शाहीरवस्ती, ढोर गल्ली, प्रभाकर महाराज मंदीर परिसर, देगांव, बसवेश्वर नगर, लक्ष्मीविष्णू चाळ, दमाणी नगर, थोबडेवस्ती, गवळीवस्ती, मुरारजी पेठ, आदित्य नगर, सेंटलमेंट, रामवाडी, गरीबी हटाव झोपडपट्टी, जानकी नगर, सिंधू विहार, प्रताप नगर. एसआरपी कॅम्प, होटगी रोड दोन्ही बाजू, स्वामी विवेकानंद नगर, वीरशैव नगर, नाथ होम्स, अमृत नगर, समता नगर, विजय देशमुख नगर, जुने शेळगी गावठाण, जनता बॅंक, विद्या नगर, भिम नगर, बनशंकरी नगर, शेळगी परिसर.

महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी पाणीपुरवठा यंत्रणेत त्रुटी असल्याचे सांगितले. त्यामुळे तूर्तास दोन दिवसांआड पाणीपुरवठा करू. हे करताना काही भागात रात्री १२ नंतर पाणीपुरवठा होऊ शकतो. अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्यावर एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करता येईल. दोन, एक दिवसाआड आणि रोज पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन आवश्यक आहे, ते करू असे आयुक्त काळम-पाटील म्हणाले.

प्रणिती शिंदे यांची महापौरांना विचारणा
नगरसेविकाजगदेवी नवले या पाणीपुरवठा बैठकीत आल्या. महापौर आबुटे यांनी त्यांना येथे बसू नका. तुम्हाला मीटिंगसाठी बोलावले नसताना कसे बसता अशी विचारणा केली. यामुळे नाराज झालेल्या नवले यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे तक्रार केली. आमदार शिंदे यांनी महापौरांना फोन करून विचारणा केली.
बातम्या आणखी आहेत...