आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३९ आरोग्य केंद्रांना टँकरचे सलाइन; यंत्रणेची दमछाक- टंचाईच्या झळा असह्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- भीषण पाणी टंचाईच्या झळा आता आरोग्य विभागालाही जाणवू लागल्या अाहेत. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची गैरसोय होऊ नये, यासाठी टंचाईने ग्रासलेल्या जिल्ह्यातील ३९ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील ४२ पैकी केवळ नाईचाकूर, जवळा(नि.), मुळज या तीनच प्राथमिक आरोग्य केंद्रात काही प्रमाणात पाणी उपलब्ध अाहे. उर्वरित आरोग्य केंद्रांतील प्रसूतीचे प्रमाण कायम ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केल्यानंतर जिल्हा परिषदेने टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या मात्र आरेाग्य केंद्रात पाण्याची समस्या असलेल्या गावांना टंचाईग्रस्त जाहीर करून पाणीपुरवरठा करण्याच्या सूचना ग्रामीण पुरवठा विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार पाण्याची सोय करण्यात येत आहे. पाणीटंचाईमुळे प्रसूतीसह इतर शस्त्रक्रिया करण्यास अडचण निर्माण होत असल्याची माहिती अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांनी फेब्रुवारीत महिन्यातच कळवली होती. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या अारोग्य अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठांना कळवली होती. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डिलिव्हरी पॉइंटच्या निकषानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ प्राथमिक आरोग्य केंद्रांत सरासरी १० पेक्षा अधिक डिलिव्हरी होत आहेत. सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येक आठवड्यातील निश्चित दिवशी कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येते. शस्त्रक्रियेनंतर लाभार्थी दिवस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल असतात. अशावेळी पाणीटंचाईची तीव्रता असल्यास आरोग्य सेवा सुरळीत पुरवण्यासाठी अडचणी निर्माण होतात. प्रेरणा प्रकल्पांतर्गत शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आरोग्य विभागाने करावयाच्या कार्यवाहीमधील मोफत प्रसूती सेवा मोफत कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया यासह इतर आरोग्य सेवेचा समावेश आहे. यामुळे टंचाई आराखड्यात आरोग्य केंद्र असलेल्या गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आरोग्यमंत्र्यांनी सुचवले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाला सूचना दिल्या. त्याप्रमाणे टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

महिला रुग्णालयातील प्रसूतीची गर्दी झाली कमी
प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीच्या सुविधा नसल्यामुळे पूर्वी महिला रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होण्याचे प्रमाण वाढले होते. केवळ ६० बेडच्या महिला रुग्णालयात गर्दी झाल्यामुळे गर्भवती महिलांना जमिनीवर उपचार घ्यावे लागत होते. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूती कक्ष सुस्थितीत केल्यापासून जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रात प्रसूती होत आहेत. सध्या टंचाईमुळे प्रसूतीचे प्रमाण घटण्याची शक्यता होती. मात्र, आरोग्य केंद्रात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे सुविधा देण्यात येत आहेत.

दुष्काळात प्रसूतीची सोय
काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सोडता इतर आरोग्य केंद्रात प्रसूती होत नव्हती. ज्या आरोग्य केंद्रात प्रसूतीच्या सुविधा होत्या, तेथे काही प्रमाणात प्रसूती केल्या जात होत्या. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती कक्षासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून प्रसूती सुरू केल्या आहेत. सध्या प्रत्येक आरोग्य केंद्रात महिन्याला १० पेक्षा अधिक प्रसूती होत आहेत.

पाणीटंचाईची तीव्रता प्राथमिक आरोग्य केंद्राला जाणवू लागल्यामुळे प्रसूतीचे प्रमाण घटण्याची शक्यता होती. मात्र, आरोग्य विभागाच्या मागणीनुसार वरिष्ठांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रामणे आवश्यक त्यावेळी आरोग्य केंद्राला पाणीपुरवठा होत असून, प्रसूतीचे प्रमाण कायम ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच दुष्काळात ग्रामीण भागातील नागरिकांसह शेतकऱ्यांची सोय होणार आहे. -डॉ.आर. बी. पवार, जिल्हाआरोग्य अधिकारी.
बातम्या आणखी आहेत...