आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा विस्कळीत, लोकांची दैना, पाच दिवसांनीही मिळेना पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पाण्यासाठी नगरसेवकांचे मोबाइल खणाखणाले, नगरसेवक पाण्यासाठी दिवसभर काम करत होते. उजनीतून ४० तर औजमधून ४० एमएलडी पाणी गळती वजा जात शहरात येत असताना सात दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हे पाणी मुरतोय कुठे कळून येत नाही. महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता म्हणतात, आलेले सर्व पाणी वाटप केले. गावठाण पत्रा तालीम परिसरात पंधरा वर्षांनंतर टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली.

शहराला पाणीपुरवठा करणारे उजनी धरणालगतच्या पंप हाउस येथून दुबार उपसा सुरू असून, तेथे ३० एचपीचे २, १० एचपीचे १५ पंप बसवण्यात आले. आणखी पाच पंप बसवण्यात येणार आहेत. यामुळे तेथे सध्या तीन पंप सुरू आहेत. रोज ६० एमएलडी पाण्याचा उपसा सुरू होत आहे. औज बंधारा येथे एका बोटीत मोटार बसवून डोहातील पाणी जॅकवेलपर्यंत आणण्यात येत आहे. याशिवाय टॅक्टरच्या सहाय्याने उपसा सुरू आहे. टाकळी पंप हाउस येथे एक पंप सुरू आहे तर काहीवेळा करता दोन पंप सुरू होतात. रोज ५० एमएलडी पाण्याचा उपसा सुरू आहे.

पाणी मुरतेय कोठे
दोन स्रोतांतून ११० एमएलडी पाण्याचा उपसा सुरू असून, गळती वजा जाता ९० एमएलडी पाण्याची उपलब्धता आहे. असे असताना शहरात सहा ते सात दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हत्तुरे वस्ती, अक्कलकोट रस्ता भागात सात ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. उपलब्ध पाण्यावरून पाच दिवसांआड पाणीपुरवठा सहज करणे शक्य असताना ते होताना दिसून येत नाही.

उजनी धरणातून वेळेत पाणी काम नाही
औज बंधाऱ्यात पाणबुडी मोटार बसवणे आवश्यक असताना ती बसवली नाही. त्यामुळे पुरेसे पाणी उपलब्ध हाेत नसल्याचे उपमहापौर प्रवीण डोंगरे म्हणाले. उजनी धरणातून औज बंधाऱ्यासाठी भीमा नदी पात्रात वेळेत पाणी सोडणे आवश्यक होते. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी येण्यास आठ दिवस उशीर झाला. आठ दिवस शहरातील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. उजनी धरणात दुबार पंपिंगसाठी स्थायी समितीने वेळेत मान्यता दिली असताना तेथे काम वेळेत केले नाही. त्यामुळे दुबार उपसा करण्यास उशीर झाल्याचा आरोप नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केला.

टँकरवर भर
पाण्यासाठी नागरिक नगरसेवकांना फोन करून जाब विचारत आहेत, तर नगरसेवक अधिकाऱ्यांना जाब विचारत आहेत. टँकरने पाणी दिले जात आहे. शुक्रवारी झोन क्रमांक पाचमध्ये ४३ टँकर पाठवले. पत्रा तालीम परिसरात पंधरा वर्षांनंतर टँकरने पाणी देण्याची वेळ आल्याची माहिती नगरसेवक पद्माकर काळे यांनी दिली. कर्णिकनगर परिसरात आठ दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांना टँकरसाठी अतिरिक्त पैसे मोजण्याची वेळ आली.

किती दिवस हे सहन करायचे
आम्ही कमवायचे की पाण्यासाठी जागरण करत बसायचे. खूप चिडचिड होते. नगसेवकांना सांगूनही त्यांना अडचण दूर होत नाही. त्यांच्या हातीही काही नाही. आयुक्तांनी यात लक्ष घालून जर काही केले तर समस्या सुटेल असे वाटते.” पुष्पा पिस्के, नीलमनगर
पाच दिवसांआड का होईना पुरेसे तरी द्या!
पाचदिवसांआड पाणी देताना महापालिकेने ते स्वच्छ आणि भरपूर दिले पाहिजे. मात्र आपल्या प्रशासनाने नागरिकांचे हाल करण्याचेच ठरवले आहे. नागरिकांचे विशेषत: महिलांचे खूप हाल होतात. रात्री-अपरात्री पाणी येते. कधी पाणी कमी दाबाने, कधी कमी वेळ तर कधी गढूळ येते. ते फार त्रास देणारे ठरत आहे, अशा भावना नागरिकांची आहे. त्याच्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया.

कमीवेळेमुळे जीव कंटाळला
मंगळवार पेठेत पाण्याच्या वेळा पहाटेच्या आहेेत. कमी वेळ आणि कमी दाबाने येत आहे. त्याने अनेक तास बसूनही पाणी कमी मिळते. उन्हाळ्यात पाणी खूप लागते. त्याच्या उलट पाणी कमी येते. बायकांना सहसा पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते.”
चित्रा हिरेमठ, मंगळवारपेठ

मध्यरात्रीत हाल होताहेत
मध्यरात्री पाणी येते, किती हाल सहन करायचे. त्यामुळे संपूर्ण दिवसाचे नियोजन बिघडते. मात्र ज्यासाठी आम्ही एवढे जागतो ते पाणी पुरेसे मिळत नाही. त्याने अतिशय हाल होतात. रोजच्या घरच्या सदस्यांसाठी पाणाी पुरेल एवढेही पाणी नीटसे येत नाही. त्यात जर का पाहुण्यांचे वऱ्हाड आले तर अतिशय अवघड होते. त्यामुळे दिवस प्रचंड कठीण जात आहेत.” रुक्मिणी रणशृंगारे, दमाणीनगर

पाणीगढूळ आणि कमीच
एकतर अतिशय गढूळ पाणी येते. त्यात कमी दाबाने येते. सुरुवातीचे अर्धा तास हे पाणी खाली टाकण्याच्या लायकीचे असते. त्यामुळे पाणी कमी मिळते. त्यात पुन्हा अलीकडे पाणी कमी येते आहे. साठवण्यास पाणी पुरेसे यावे लागते. तेच मुळात येत नाही त्यामुळे अितशय अडचण होते आहे.” लक्ष्मी धायगुडे, आमराई
आवक कमी, एक दिवस पाणीपुरवठा पुढे ढकलला
औजउजनीतून आवक कमी झाल्याने पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. तो सहा दिवसांआड करण्यात येत आहे. गरजेचे प्रमाणे झोन कार्यालयाकडून टँकर दिले जात आहे. पाणी किती आले माहीत नाही. आलेले सर्व पाण्याचे वाटप करण्यात आले.” राजकुमार रेड्डी, प्रभारीसार्वजनिक आरोग्य अभियंता