आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढ्यात सीनापात्रातील ३२० विहिरी, बोअर, खड्डे ताब्यात- पिण्यासाठी वापरणार पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुर्डुवाडी- माढा तालुक्यात सीना नदीपात्रामध्ये शेतकऱ्यांनी घेतलेल्या ३२० विहिरी, बोअर खड्डे सार्वजनिक स्त्रोत म्हणून घोषित करण्यात आले आहेत. ते पिण्याच्या पाण्यासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. त्या माध्यमातून आवश्यक तेथे पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी मनीषा कुंभार यांनी सांगितले.

माढा तालुक्यात दुष्काळी स्थिती आहे. पाण्याअभावी पिके जळू नयेत म्हणून नदी, ओढे, नाल्यांच्या काठावरील परिसरातील शेतकरी त्यामध्ये विहीर, बोअर खड्डे घेऊन त्यांना पाणी देत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे तालुक्यातील अनेक गावांतील लोकांचे हाल होत आहेत. त्यामुळे टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन नियोजन आणि उपाययोजना करत आहे. भूजल अधिनियम २००९ प्रमाणे शासकीय जागेतील विहिरी बोअर ताब्यात घेण्यात येत आहेत. माढा तालुक्यातील सीना नदीलगतच्या २४ गावांमधील शतेकऱ्यांनी नदीपात्रामध्ये विहीर, बोअर खड्डे घेतले आहेत. तेथून शेतीसाठी होणारा उपसा प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर ते सार्वजनिक स्त्रोत म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या सर्व विहिरी बोअर संबंधित ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. त्यानंतर तेथून त्या गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याची सर्व जबाबदारी ग्रामसेवकांकडे सोपवण्यात आली आहे. ग्रामपंचायतींना याच्या सर्व नोंदी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

माढा तालुक्यातील सीना नदीपात्रातील विहीर
गावनिहाय सीना नदीपात्रातील विहिरी, बोअर खड्ड्यांची संख्या : कव्हे २, मुंगशी ५, शिंगेवाडी ६, लव्हे ५५, शिराळा ५, लोहारा १२, म्हैसगाव १, पापनस ४, तांदूळवाडी १, वडशिंगे २, निमगाव ८, महातपूर १, दारफळ २, रिधोरे १, नालगाव १, केवड ३०, उंदरगाव ६३, कुंभेज ९, वाकाव ११, मानेगाव ६, लोंढेवाडी ९०, खैराव ३०, खैरेवाडी १.

-जलसंपदा विभागानेसीना नदीपात्रातील विहीर बोअरवरील विद्युतपंप काढण्याच्या सूचना सर्व शेतकऱ्यांना दिल्या आहेत. अद्यापही कोणी विद्युतपंप काढले नसल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. मनीषा कुंभार, प्रांताधिकारी,माढा.
बातम्या आणखी आहेत...