आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर पाणीपुरवठ्याची सर्व कामे अर्धवटच, मनपाकडे नियोजन नसल्याने नागरिकांचे हाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापुर - शहरात पाणीटंचाई निर्माण झाली की, महापालिका पदाधिकारी अधिकारी जागे होतात. भविष्यकाळातील पाण्याचे नियोजन केले जात नाही. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती कारवाई सुरू केली जाते, परंतु ती अर्धवटच सोडून दिली जाते. उजनी मुख्य जलवाहिनीवरील पाण्याची चोरी शोधमोहीम, शहरात बोगस नळ शोधमोहीम अर्धवट सोडून देण्यात आली. शहर पाणीपुरवठ्यासाठी दररोज १३० एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. मात्र, उजनीतून पाणी उपासा किती आणि प्रत्यक्ष वाटप किती याची माहिती महापालिकेस अद्याप सांगता येत नाही. दरवेळी पाणीटंचाई निर्माण झाली की, महापालिका पदाधिकारी अधिकारी चर्चा करतात. त्यातून काहीच निष्पन्न होत नाही.
शहराला उजनी, औज बंधारा आणि हिप्परगा तलाव या तीन स्रोतातून पाणीपुरवठा होतो. हिप्परगा तलावात पाणी नसल्याने येथील पाणीपुरवठा तीन-चार महिन्यांपूर्वीच बंद झाला. सध्या औज बंधाऱ्यातील पाणी संपल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. विशेषत: हद्दवाढ भागातील नगरांना सर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा पोहोचत आहेत. उजनी धरण मायनसमध्ये गेल्याचे माहीत असतानाही मनपा अधिकारी आणि पदाधिकारी निवांत बसून राहिले. आता नागरिकांची ओरड सुरू झाल्यानंतर चर्चा करत आहेत. औजमध्ये दोन दिवसांत पाणी येईल. त्यानंतर पुन्हा दोन महिने या विषयाची चर्चा होणार आहे. टंचाई जाणवली तरच मनपा प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना जाग येते, अशी स्थिती आहे. पूर्णपणे उजनीवर अवलंबून राहण्यापेक्षा स्थानिक जलस्रोताचा शोध घेऊन उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
तेच प्रश्न तेच उत्तर : शहरातपाणीपुरवठा करण्यास किती पाणी लागते आणि किती पुरवठा होतो याबाबतची आकडेवारी मनपाकडे नाही. पाणीटंचाईवर तेच उत्तर अधिकारी देत राहतात अशी प्रॅक्टीस मनपाची आहे.

७८ एमएलडी प्रत्यक्ष उपलब्ध होणारा पाणीपुरवठा
१३० एमएलडी उजनी आणि औज येथील उपसा
१५ एमएलडी एमआयडीसी पाणीपुरवठा
४० एमएलडी गळती

पाण्याची गरज लक्षात घ्यावी
^शहरातील पाणीपुरवठ्याबाबत आराखडा तयार करतोय. पण आताची पाण्याची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागेल. पाण्याची गरज किती आणि आहे की यांची तपासणी होणे आवश्यक आहे. राजेंद्रहोलाणी, जल वितरण तज्ञ

पाण्याचे आॅडिट सभागृहापुढे ठेवू
^पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून शहरातील पाण्याचे आॅडिट तयार करून त्यात काही शिफारसी केल्या आहेत. तो अहवाल महापालिका सभागृहापुढे ठेवू त्यावर उपाय सुचवतील. विजयकुमार काळम-पाटील, मनपा आयुक्त

काय आहेत पर्याय
पाण्याचे आॅडिट - शहरास पाण्याची गरज किती, उजनी औज येथून पाणी उपसा किती, पाकणी सोरेगाव येथे पाेहोचते किती आणि पाण्याचे वाटप किती यांचे आॅडिट होणे आवश्यक.
शहरात नळांची संख्या किती - शहरात घरगुती, बिगर घरगुती नळांची संख्या किती, शहरातील घरगुती व्यावसायिक मिळकती किती यांची शोध घेतल्यास नळांची आकडेवारी समोर येईल.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण - महापालिका पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता, झोन अधिकारी, झोनमधील उपअभियंता, आवेक्षक, लिपिक, शिपाई, चावीवाले, मुकादम, विद्युत अभियंता यांना पाणीपुरठ्याबाबत प्रशिक्षण देणे आवश्यक.

स्रोत ताब्यात घेणे- शहरातील विंधन विहिरी विहिरी अधिग्रहण करून त्यातून पाणीपुरवठा करणे, हात पंप दुरुस्ती करणे, पाणी असलेल्या विहिरींचे पुनर्जीवन करणे.

बोगस नळ शोधमोहीम थांबली
शहरात २५ हजार बोगस नळ असल्याचा दावा महापालिका पाणीपुरवठा विभागाने केला होता. माजी आयुक्त अजय सावरीकर यांनी मोहीम हाती घेऊन बोगस नळ शोधण्याचा प्रयत्न केला. सावरीकर यांची बदली झाल्यानंतर ही मोहिम थांबली. त्यानंतर मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी २१ ते ३० आॅगस्ट दरम्यान बोगस नळ शोधण्याचा प्रयत्न केला. ही मोहीमही अर्धवट सोडून अभय योजना जाहीर केली. या योजनेलाही वारंवार मुदतवाढ देण्यात येत आहे. बोगस नळ शोधमोहिमेत ३५ हजार िमळकती तपासण्यात आल्या. त्यापैकी ४६५ बोगस नळ शोधून गुन्हे दाखल केले. त्याचा तपास शहर पोलिस करत आहेत.

पाण्याची गळती शोधमोहीम अर्धवट
पाण्याची गळती रोखण्यासाठी महापालिकेने उजनी, पाकणी, टाकळी, सोरेगाव, जुळे सोलापूर एमबीआर, पुणे नाका एमबीआर येथे मीटर फ्लो बसवले. मात्र, पाण्याचे मोजमाप घेतले जात नाही. एमआयडीसीला पाणी किती दिले जाते यांचा हिशेब नाही. उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी लक्ष वेधले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

उजनी जलवाहिनी कारवाई अर्धवट
उजनीजलवाहिनी वरून पाण्याची चाेरी होत असल्याने पाणी गळतीचे प्रमाण मोठे होते. तेव्हा अनधिकृत घेण्यात आलेल्या मुख्य जलवाहिनीवरील कनेक्शन शोधण्यासाठी महापालिकेच्या वतीने शोधमोहीम हाती घेतली. मोठे पथक आणि पोलिसांच्या फौजफाट्यात कारवाई करत २१ गुन्हे दाखल केले. त्यापूर्वी सात गुन्हे दाखल केले होते. अशा प्रकारे २८ गुन्ह्यांचा तपास टेंभुर्णी मोहोळ पोलिस करत आहेत. कारवाईनंतर पोलिसांना पत्र देऊन तपासचे काय झाले, याबाबत महापालिकेने विचारले नाही. एकाच कारवाईत मोठी पाणी चोरी आढळून आली. सुमारे १५ एमएलडी पाणी चोरी रोखण्यात यश आले. मोहीम पुढे चालू ठेवली असती तर आणखी पाणी चोरीचा शोध लागला असता. परंतु ही मोहीम अर्धवट सोडली.