आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागे व्हा! तब्बल ५० % बोअर आटले, मे महिन्यात आणखी बोअर बंद पडण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मागील पावसाळा कोरडा गेला. आता उन्हाळा भीषण पाणीटंचाई घेऊन आला आहे. जमिनीतील पाण्याची पातळी काही ठिकाणी खोलवर गेली आहे तर काही ठिकाणी जमिनीतील पाणीच आटल्याचा अनुभव येत आहे. परिणामी ग्रामीण भागासह शहरातील बहुतांश विहिरी आणि बोअर आटले आहेत. काही ठिकाणी बोअरमधील पाण्याची पातळी खोल गेली आहे. यासंदर्भात "दिव्य मराठी' चमूने काही परिसरातील पाहणी केली. खासगी आणि महापालिकेचे असे सरासरी ४० ते ५० टक्के इतके बोअर आटल्याचे "दिव्य मराठी'च्या पाहणीतून समोर आले आहे. एकीकडे विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करणे महापालिकेला जड चालले आहे तर दुसरीकडे जवळपास निम्म्या बोअरमधील पाण्याची पातळी खालावल्याने पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरू आहेत.
नईजिंदगी, स्वागतनगर आदी : नईजिंदगी, शिवगंगानगर, शशिकलानगर, चंद्रकलानगर, स्वागतनगर, भीमाशंकर नगर आदी प्रभाग क्रमांक ४१ मध्ये महापालिकेचे सुमारे २५० बोअर असून १२५ बंद आहेत. खासगी १५० पैकी ८० बोअर बंद आहेत. या परिसरात तीन इलेक्ट्रिक बोअर असून, पाणी साठवण्याची सोय करण्यात आली आहे. याद्वारे पाण्याची मुबलक सोय होत आहे. माधव नगर, साईबाबा नगर आदी : माधवनगर, साईबाबा चौक, संजय नगर, न्यू संजय नगर, इंदिरा नगर आदी भागात महापालिकेचे ६५ बोअर असून बंद पडले आहेत. या परिसरात कारखाने जास्त असून बंगल्यांची संख्याही जास्त आहे. येथे खासगी बोअर सुमारे १५०० असून ३०० ते ४०० बोअरचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
शांतीनगर, नीलम नगर आदी : शांतीनगर, नीलम नगर, बोळकोटे नगर, बत्तुल नगर आदी भागात महापालिकेचे सुमारे १०० बोअर असून फक्त १२ बोअर आटले आहेत. २०० खासगी बोअर असून यातील पंचवीस टक्के बोअरचे पाणी कमी झाले आहे. बोअर चालु केल्यानंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात पाणी संपत आहे.

जुळे सोलापूर, विजापूर रोड परिसर
जुळे सोलापूर, विजापूर रोड परिसरात बंगल्यांची संख्या जास्त आहे. या हद्दवाढ भागात सुमारे १९७ नगर असून बंगल्यांचे प्रमाण जास्त आहे. या परिसरात घरे बांधताना पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था होईल म्हणून बोअर घेण्यात आले असून १८ हजार खासगी बोअर आहेत. सध्या यापैकी हजार बोअर आटले आहेत. नव्याने होत असलेल्या बांधकामात अपार्टमेंटचा समावेश आहे. बोअरमधील पाणी घटल्याने अपार्टमेंटमधील सर्व फ्लॅटधारकांना पाणीपुरवठा होत नाही. महापालिकेच्या टॅँकरला पाइप आणि तोट्यांची सोय नसल्याने टॅँकरद्वारे पाणी भरणे शक्य नाही. यामुळे टॅँकर असून सुध्दा पाणी मिळत नाही.

सुनीलनगर, नीलमनगर भागांत अक्षरश: भटकंती
पूर्वभागातील कामगारांच्या वसाहती असणाऱ्या सुनीलनगर, नीलमनगर, विनायक नगरातील बहुतांश कूपनलिकांत पाणीच नाही. यंत्रमाग कारखानदार काही प्रमाणात पाणी द्यायचे. परंतु सूत रंगणीसाठीही पुरेसे पाणी नसल्याने तेही अडचणीत आहेत. अनेक कारखानदार टँकरने पाणी विकत घेत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी महिला आणि मुले अक्षरश: भटकत आहेत. सार्वजनिक नळांभोवती प्लास्टिक घागरींचा गराडा, सायकलींना अडकवलेले ड्रम, महिला मुलांची पायपीट असे चित्र आहे.

गावठाण भागात टँकरने केला जातोय पाणीपुरवठा
प्रभाग १४ मध्ये पूर्वी मनपाचे २९ बोअर होते. सध्या ३१ नवे बोअर मारले आहेत. पाण्याची पातळी खालावल्याने पूर्वीच्या २९ बोअर पैकी २० तर नव्या ३१ पैकी बोअर बंद आहेत. ज्या भागातील बोअर बंद पडले आहेत त्या भागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तेथे टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गावठाण भागातील जुने विठ्ठल मंदिर, बाळीवेस, उत्तर कसबा, दक्षिण कसबा, मसरे गल्ली, किरीटेश्वर मठ आदी भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या परिसरातील सुमारे ४०० बोअर खासगी असून यापैकी २०० बंद पडले. गावठाण भागातील सोमवार पेठ, शुक्रवार पेठ, सावरकर मैदान परिसर, पाणीवेस तालीम या परिसरातील सुमारे ७० टक्के बोअर पाणी नसल्याने बंद पडले. मनपाच्या पूर्वीच्या ५० पैकी ४० बोअर बंद पडलेआहेत. या परिसरात सुमारे १०० खासगी बाेअर असून त्यापैकी ४० बोअर बंद पडले.

हैदराबाद रोड, अक्कलकोट रोड ७० टक्के बोअर बंद
विडीघरकुल येथील प्रभाग क्रमांक १७ मध्ये महापालिकेचे सुमारे ५० बोअर असून त्यातील ते १० बंद आहेत. ३० बोअर खासगी असून त्यातील बंद आहेत. या प्रभागात फक्त सग्गमनगर येथे टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. येथीलच प्रभाग क्रमांक १८ येथे महापालिकेचे सुमारे १०० बोअर असून त्यातील ८० बंद आहेत. खासगी बोअर ४० असून ३० बंद आहेत. इच्छेनुसार येथे टॅँकरने पाणीपुरवठा होतो. अक्कलकोट रोड येथील प्रभाग क्रमांक १९ मध्ये महापालिकेचे ८० बोअर असून ५० बंद आहेत. खासगी बोअर १०० असून ६० बंद आहेत. या प्रभागात काही ठिकाणी अद्याप जलवाहिनीचे काम झाले नसून पाणीपुरवठा वेळेवर होत नाही. यामुळे पाण्याचा ठणठणाट आहे. ४५ ठिकाणी टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

देेगावपरिसरात ६६ चालू तर १४ बोअर बंद
देगावपरिसरात महापालिकेचे आणि खासगी असे एकूण ८० बोअर आहेत. त्यापैकी १४ बंद पडलेले आहेत. औसे वस्ती, हब्बू वस्ती या परिसरात शेजारीच ओढा असल्याने तेथील बोअर अटत नाहीत. तरी या भागातील बोअर बंद पडले आहेत. देगाव परिसरातील देशमुख वस्ती, लाड वस्ती, बाळे स्टेशन या परिसरातील बोअर बंद पडले आहेत. या भागात ६० बोअर असून, पाण्याअभावी १० बंद आहेत.

अमर्याद उपसा अन् पुनर्भरणाकडे दुर्लक्ष
^शहरातील भूजलपातळी खालावण्यास अमर्याद उपसा, वाढते काँक्रिटीकरण कारणीभूत आहे. पाणी उपशाच्या तुलनेत पुनर्भरणाचे प्रयत्न फारच तोकडे आहेत. भूगर्भामध्ये असलेल्या तीन स्तरांमध्ये अनेक वर्षांपासून साठवलेलेे पाणी असते. परंतु त्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा करून ते बाहेर खेचण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. चांगला पाऊस असल्यास साधारणपणे १०० फुटांपर्यंत भूगर्भात थोडेफार पाणी जाते. पण उपसा जास्त असल्याने त्याचा फायदा होत नाही. शहरात पाणी जमिनीत मुरण्यासाठी मोकळ्या जागांचे प्रमाण कमी आहे. काँक्रिटीकरण, रस्त्यांचाही परिणाम होतो. डॉ. श्रीनिवास वडगबाळकर, भूगर्भशास्त्राचे अभ्यासक

बोअर आटल्याने टँकरची मागणी
^शहरात बोअर आटल्याने नागरी वसाहत भागात पाण्याची टँकरची मागणी वाढतोय. मनपाकडे पाइपचे टँकर नसल्याने अपार्टमंंेटला मनपा टँकरची मागणी तूर्त नाही. उन्हाची तीव्रता पाहता बोअर आटत असून, त्यामुळे मनपाकडे पाण्याची मागणी वाढत आहे. राजकुमार रेड्डी, प्र.सार्वजनिक आरोग्य अभियंता, मनपा

बोअरचे पाणीही नाही
^आठ-आठदिवसपाणीपुरवठा होत नसल्याने बोअरचे पाणी प्यायचो. त्यालाही आता पाणी उरले नाही. काही हातपंप जड झाले आहेत. खासगी बोअरला तर पाणीच नाही. टँकर येत नाही. आला तरी पाणी मिळवण्याच्या स्पर्धेत टिकणेही अवघड झाले. रेणुका तुम्मा, नीलमनगर

टँकरचे निम्मे पाणी वाया
^नळाला वेळेवर पाणी येत नाही. शेजारील खासगी बोअर मधून पाणी घेत होतो. आता त्यातील पाणीही आटले आहे. टॅँकरने पाणीपुरवठा हाेत आहे. पंरतु टॅँकरचे निम्मे पाणी वायाच जाते. टॅँकरमधून पाणी घेण्यासाठी कसरत करावी लागते. अंबिका माळी, शांतीनगर