आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिवळ्या पाण्यावरून रणकंदन, गरीब प्रजा अन श्रीमंत प्रशासन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शहराचा पाणीप्रश्न चांगलाच पेटला. शहराचे प्रश्न नियोजन समितीच्या बैठकीत मांडणार नसाल तर आम्हाला बोलावताच कशाला? असा आक्रमक पवित्रा शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतला. प्रश्न मांडतच सत्ताधारी पक्षाकडून थकबाकीच्या नावाखाली पाण्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप केला. यावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख यांनी तितक्याच आक्रमकतेने आमदार शिंदे यांच्या प्रश्नाला सामोरे जात याउलट आम्ही शासनाला पाणी सोडण्याविषयी विनंती केली आहे. पिवळसर पाण्याबाबतही पाण्याचा तपासणी अहवाल अद्याप आला नसल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागातील दुष्काळावर चर्चा झाल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी शहराच्या पाणीप्रश्नावर चर्चा करण्याची विनंती केली. त्यानुसार आमदार शिंदे यांनी शहराला उजनीतून पाणी कधी सोडणार आहे? थकबाकी असल्याचे सांगून पाणी सोडले जात नाही, पिवळसर पाण्याकडे शासन-प्रशासन दुर्लक्ष करीत आहे, आमच्यावेळी असे होत नव्हते, या सर्व गोष्टींचे सत्ताधारी पक्षाकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप केला.

यावर सुभाष देशमुख आक्रमक होत सुडाचे राजकारण आम्ही कधीच केले नाही, याउलट आम्ही सहकार्य करीत आहे. तुम्हीच राजकारण करीत असल्याचा आरोप करीत राजकारण करीत असल्याचे देशमुख म्हणाले. यावर पालकमंत्री देशमुख यांनी शहराला एक थेंबही पाणी कमी पडणार नाही, तुम्ही सत्तेवर असताना कॉलऱ्याने २२ जणांचा बळी गेला. त्यावेळी आम्ही राजकारण केले नसल्याचे सांगत शहराला मुबलक पाणी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पिवळसर पाण्याचा अहवाल आला नाही, अहवाल मिळताच जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्याचे ठोस आश्वासन पालकमंत्री यांनी दिले.

आमदार शिंदे यांच्या प्रश्नाला मनपा आयुक्त काळम-पाटील यांनी उत्तर देताना महापालिकेने चालू महिन्यापर्यंतची सर्व थकबाकी जलसंपदा विभागाकडे जमा केली आहे, औद्योगिक वसाहतीला जे पाणी दिले आहे, त्याचे दर अधिक आहेत. त्यानुसार आकारणी करून थकबाकी दाखविण्यात येत आहे. हा शासन स्तरावरील निर्णय अाहे. तसे शासनाला कळविण्यातही आल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

यावेळी नगरसेवक सुरेश पाटील यांनी कोणत्या कारखान्याचे पाणी मिसळते, ते तुम्ही सभागृहाला सांगाच, अशा सूचना केल्या. आयुक्तांनी जकराया कारखान्याचे नाव सांगितले असले तरी अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचे नगरसेवक पाटील यांन सांगितले.
नियोजन समितीच्या बैठकीत दुष्काळ पाण्यावरून खडाजंगीचे नाट्य रंगले. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वच्छता करणारी श्रमिक महिला न्याहारी करतानाचा हा प्रसंग, गरीब प्रजा श्रीमंत प्रशासनाचे वास्तव रूप दर्शवत आहे.
अहवाल मिळताच

कारवाई करणार
आमदार शिंदे यांनी पालकमंत्री देशमुख यांना मला तुमच्याविषयी आदर आहे, मी मांडलेले प्रश्न कोणीही वैयक्तिक घेऊ नका, मी शहराचे प्रश्न मांडत आहे, शहरातील समस्या मांडत असल्याचे स्पष्ट केले. पालकमंत्री देशमुख आमदार देशमुख यांनी पहिल्यांदाच शासनाची बाजू मांडत असल्याचे चित्र दिसून आले. शिवाय जे कारखाने प्रदूषण करीत आहेत, त्यांच्यावर अहवाल मिळताच कारवाईचे आश्वासनही पालकमंत्री यांनी दिले.

बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी शहरासाठी उजनीतून पाणी सोडावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये सोलापूरला सध्या पाणी नसल्याने भविष्यात ११ दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागण्याची भीती आहे. याचा विचार करून आपण शहराला तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी केली.पाणी सोडल्यास आंदोलनाचा इशाराही चंदनशिवे यांनी दिला. विभागीय आयुक्तांनी थकीत रक्कम भरल्याशिवाय पाणी सोडणार नाही,असे आदेश दिल्याने थकीत रक्कम भरावी लागणार असल्याचे जिल्हाधिकारी मुंढे यांनी स्पष्ट केले.