आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"जल है तो कल है' चा महापौरांनी दिला नारा, टिळा होळीचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्र राज्यावर भीषण पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. सोलापूरही या टंचाईपासून वाचू शकला नाही. त्यामुळे सोलापूरकरांनी पुढे येऊन पाण्याची बचत करणे अत्यावश्यक बनले आहे. दरवर्षी होळी खेळताना मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. त्यासाठी सोलापूरकरांनी पाण्याचा अपव्यय टाळून टिळा होळी साजरी करावी, असे आवाहन महापौर सुशीला आबुटे आणि आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांनी केले आहे.

शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात होता. परंतु, पाण्याची टंचाई पाहता तीन दिवसांआड, चार दिवसांआड, आता पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. हद्दवाढ भागामध्ये तर आठ दिवसांआड पाणीपुरवठा होतो. काही ठिकाणी महापालिका टॅँकरने पाणीपुरवठा करते. एवढी टंचाई असताना अनेक ठिकाणी पाण्याचा अपव्यव होत असताना दिसतो. अनेक ठिकाणी नळांना तोट्या नाहीत. तर काही ठिकाणी नळ सुरू करून पाणी विनाकारण रस्त्यावर सोडले जाते. रंगपंचमीला चौकाचौकात पाण्याचे पिंप भरून रंगाची उधळण केली जाते. काही सोसायट्यांमध्ये तर सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत इलेक्ट्रिक बोअरचे पाणी सुरूच असते. दरवर्षी आपण रंगाची मुक्तपणे उधळण तर करतोच मात्र सध्या पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन रंगपंचमीत होणारा पाण्याचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे.

पाणी जपून वापरणे गरजेचे
महापौर सुशीला आबुटे : "जल है तो कल है'. पाणी जपून वापरणे महत्त्वाचे आहे. काटकसरीने वापरल्यास तेच पाणी उद्या आपल्याला मिळेल. पाणी हे आयुष्य आहे. पाण्याला जपले नाही तर आयुष्य गमवावे लागेल. रंगपंचमीमध्ये सोलापूरकरांनी टिळा होळी साजरी करायला हवी. त्यात इको फ्रेंडली रंगांचाच वापर करावा. जेणेकरून केमिकल कलरमुळे त्वचेवर परिणाम होऊ नये. महिलांनी मुलांना सावरणे अत्यावश्यक आहे.

रंगपंचमीत पाण्याचा वापर टाळा
आयुक्त विजयकुमार काळम -पाटील : रंगपंचमीमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. परिस्थिती पाहून सण साजरे करणे महत्त्वाचे. सध्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. घरातील महिला भगिनी आणि ज्येष्ठांनी मुलांची समजूत काढावी. टंचाईबद्दल माहिती द्यावी. शहरवासीयांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, सर्वांनी मिळून टिळा होळी साजरी करावी, जेणेकरून पाण्याचा अपव्यय होणार नाही.

बातम्या आणखी आहेत...