आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टंचाईबाबत प्रभावी नियोजनाचा आदेश, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मागीलवर्षीच्या अडचणी त्रुटी लक्षात घेऊन टंचाई निवारणासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी. तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा अभियंता तालुका कृषी अधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी. त्याचा अहवाल पुढील बैठकीत सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पाणीटंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी, लाभक्षेत्रचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार आदी उपस्थित होते.
सर्व नागरिकांना, जनावरांना पिण्याचे पाणी वेळेवर परिणामकारकपणे पुरविले गेले पाहिजे, याबाबत नियोजन करावे. नदीकाठच्या गावातील विद्युत पुरवठा खंडित केला जाणार नाही. परंतु प्रकल्प नदीतील पाणी इतर प्रयोजनासाठी उपसा केला जाणार नाही किंवा वापरले जाणार नाही, याबाबत पाटबंधारे विभागाने विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मुंढे यांनी दिल्या.

जिल्ह्यात टंचाईसदृश ३२२ गावे...
अक्कलकोट २२, उत्तर सोलापूर २, दक्षिण सोलापूर ५५, करमाळा ९, माढा २७, बार्शी ४२, मोहोळ ५२, मंगळवेढा ४०, सांगोला ०२, पंढरपूर ८, माळशिरस ६३.

भूजल सर्वेक्षण विभागाने नियंत्रण ठेवावे
जिल्ह्याचा जून २०१६ पर्यंतचा पाणी टंचाईचा आराखडा तयार केला आहे. पाऊस स्थानिक पाणीस्त्रोताची परिस्थिती लक्षात घ्यावी. त्याचप्रमाणे टंचाई प्रतिबंधात्मक आराखडा तयार करावा. नवीन विहीर घेताना नियमानुसार परवानगी घेण्यात यावी. विंधन विहिरींची कामे करणाऱ्या सर्व संबंधितांची बैठक घेऊन परवानगी असल्याशिवाय कामे घेण्यात येऊ नयेत, याची कल्पना द्यावी. भूजल सर्वेक्षण विभागाने याकडे प्रभावी नियंत्रण करावे, अशा सूचना श्री. मुंढे यांनी दिल्या.

मांगी तलावात कुकडीतून पाणी
महाराष्ट्रजीवन प्राधिकरण जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला. योजना बंदची कारणे, दुरुस्तीसाठी निधी याबाबत माहिती जाणून घेतली. यामध्ये आंधळगाव, नंदूर, कासेगाव, भाळवणी, खर्डी कव्हे या योजना येत्या आठवडाभरात तर बोरगाव, कव्हे पानगाव या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्याबाबत तत्काळ अहवाल देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या. मांगी तलावामध्ये कुकडी धरणाचे पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. येत्या दोन दिवसांत हे पाणी मांगी धरणामध्ये येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...